३३५ क्विंटल बियाणे खरेदी; ६५० क्विंटलची ऑर्डर
वैरण विकास कार्यक्रम; शेतकऱ्यांना बांधावर मिळणार मोफत बियाणे
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ ः दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ९८५ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी एक कोटी रुपयांतून बियाणे खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ३३५ क्विंटल बियाणे खरेदीचे आदेश दिले असून, आणखी ६५० क्विंटल बियाण्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर मोफत बियाणे पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील बियाणे येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांना वितरित करण्याचा पशुसंवर्धन विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे वैरण लागवडीला वेळेत सुरुवात करून पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यास मदत होणार असल्याचेही येवले म्हणाले. पावसातील अनिश्चितता आणि चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता, बियाण्यांचे वेळेत वितरण महत्त्वाचे ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील बियाणेही ऑक्टोबरअखेरपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. वितरणाचा वेग आणि वैरण लागवडीला मिळणारा प्रतिसाद यावर या कार्यक्रमाचे यश अवलंबून राहणार आहे. पहिल्या टप्प्यातील ३३५ क्विंटल बियाणे वाटपातून ७० हजार टन तर दुसऱ्या टप्प्यातील ६५० क्विं. बियाणे वाटपातून १.४० लाख टन चारा उपलब्ध होणार आहे.
तीन महिने पुरेल इतका चारा...
पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऊस, मका व चारा पीकांच्या माध्यमातून जिल्ह्यात जानेवारी २०२७ अखेर पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. ऊस पीक काही गाळपास गेला तरी भीमा नदीकाठ व कॅनाल पट्यात चारा उपलब्ध होणार आहे. यामुळे फेब्रुवारी ते जून या कालावधीत चाऱ्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय जमिनी व तलावाशेजारील जमिनीवर प्रशासनाकडून चारा लागवड करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
चौकट...
प्रशासन करणार चारा लागवड...
रब्बी हंगाम सुरू असून जिल्ह्यातील जे कोरडवाहू वा कमी पाणी आहे, अशा शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे तर पाणी असलेल्या शेतकऱ्यांना मका बियाणे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार क्विंटल बियाणे वाटपातून २ लाख टन चारा उपलब्ध होणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत चारा उपलब्ध राहिल, त्यानंतर मार्च ते जून या कालावधीचे स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातून चारा मागणीसह जिल्ह्यात ज्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे, त्याठिकाणी चारा लागवड करणे आणि त्याचे वाटप करण्यावर अधिक भर राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.