उसाच्या अचूक वजनासाठी
मोफत वजनकाट्यांची सुविधा
औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार
ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर : उसाच्या अचूक वजनातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे आणि उसाच्या वजनातील संभाव्य तफावत टाळता यावी, यासाठी औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने परिसरात तीन ठिकाणी मोफत वजनकाट्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या उसाच्या वजनाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती नरसिंग बिराजदार यांनी केले आहे.
साखर कारखान्यांकडून उसाचे अचूक वजन केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही खासगी वजनकाट्यावर त्यांच्या उसाचे वजन करून घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या खर्चामुळे उसाचे वजन करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून बाजार समितीने मोफत वजनकाट्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
परिसरातील औराद शहाजानी येथील बाजार समितीचा वजनकाटा, लातूर ते बिदर मार्गावरील देवणे यांचा वजनकाटा, तसेच तगरखेडा मोड येथील श्री काशीनाथ यांचा वे-ब्रिज या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत वजनाची सुविधा मिळणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले. साखर परिसरातील शेतकरी कोणत्याही कारखान्याला ऊस विक्रीसाठी घेऊन जाताना बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांवर आपल्या वाहनाचे मोफत वजन करून घेऊ शकतात. यामुळे कारखान्याच्या वजनकाट्यावरील वजन आणि बाजार समितीच्या वजनकाट्यावरील वजन यांची पडताळणी करता येणार आहे. वजनकाट्यांवरील वजनात तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी तातडीने बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन बिराजदार यांनी केले आहे.
शेती करताना आणि शेतमालाची विक्री करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. उसाच्या वजनाबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही बिराजदार यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.