एफआरपी थकवली तर कारखान्याची धुराडी बंदच
शंभर टक्के ऊस बिल चुकते केल्याशिवाय गाळप परवाना नाही; १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : शेतकऱ्यांची एफआरपी थकवून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्याच्या प्रयत्नांना चाप बसणार आहे. मागील हंगामातील उसाची एफआरपी शंभर टक्के अदा केल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवानाच मिळणार नाही. २०२६-२७ हंगामासाठी गाळप परवान्याची प्रक्रिया कडक करण्यात आली असून, कारखान्यांना १ ते ३० सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन प्रस्ताव सादर करून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. एफआरपीची पूर्ण रक्कम न देणाऱ्या कारखान्यांच्या अर्जावर परवाना देताना अडचण येणार आहे. तसेच परवाना न घेता गाळप सुरू करणाऱ्या किंवा परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिला आहे. त्यांनी २१ ऑगस्ट रोजी याबाबतचा आदेश काढला आहे.
केंद्राच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ तसेच महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊसपुरवठा) नियम १९८४ नुसार परवाना मिळाल्याशिवाय साखर उत्पादन करता येत नाही. यंदाचा गाळप हंगाम नेमका कधी सुरू करायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत होणार आहे.
परवाना शुल्काबाबत स्वतंत्र सूचना
गाळप परवान्यासाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. मात्र, गाळप परवाना शुल्क, गाळप सुरक्षा अनामत रक्कम, मुख्यमंत्री साहाय्यता निधी, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ निधी आणि साखर संकुल निधीबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे या शुल्कांबाबत पुढील सूचना नंतर देण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.