पान ३
--------------------
फळ पीकविमा योजनेबाबत
केळीविमाधारक संभ्रमात
हवामानमापक यंत्रांची माहिती प्रसारित करण्याची मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांना सदोष हवामानमापक यंत्र व हवामानाच्या चुकीच्या माहितीमुळे थंडी व अधिक तापमान यासंबंधीच्या नुकसान भरपाई किंवा परताव्यांपासून वंचित राहावे लागल्याची स्थिती यंदा यावल, पाचोरा, भडगाव आदी भागांत आहे.
जिल्ह्यात मागील कालावधीत सुमारे २२ नवी महसूल मंडळे तयार झाली. या मंडळांत विमा कंपनी व कृषी विभागाने हवामानमापक यंत्रे बसविली आहेत का, त्यात हवामानाची नोंद झाली का, नोंदी योग्य की अयोग्य, असे प्रश्न विमाधारक उपस्थित करीत आहेत.
हवामानमापक यंत्रांच्या आधारावरच ही योजना कार्यरत आहे. फळपीक विमा योजनेत २०२५-२६ च्या हंगामात जिल्ह्यातील सुमारे एक लाख केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेची कार्यवाही हवामान म्हणजेच तापमान, वारा, गारपीट याबाबतच्या नोंदी व माहितीच्या आधारे विमा कंपनी करते. केळी पिकाला कमी व अधिक तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट या समस्यांबाबत विमा संरक्षण आहे. हवामानाची माहिती घेण्यासाठी विविध महसूल मंडळांत हवामानमापक यंत्रे कार्यरत असणे अनिवार्य आहे. एका खासगी कंपनीकडून हवामानमापक केंद्रांचे संचलन केले जाते. याच कंपनीकडून हवामानाची माहिती (डाटा) विमा कंपनी व शासन घेतात आणि त्यानुसार परतावे देणे, नुकसानभरपाई देणे याची कार्यवाही केली जाते.
जिल्ह्यात बसविलेली हवामानमापक केंद्रे सदोष असल्याने अनेक महसूल मंडळांतील शेतकरी कमी तापमान (थंडी) व अधिक तापमानासंबंधीच्या परताव्यांपासून वंचित आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील हंगामातही याबाबत तक्रारी आल्या होत्या.
हवामानमापक केंद्रांकडून माहिती (डाटा) घेऊन विमा कंपनी नुकसानभरपाई देते. मात्र, हे हवामानमापक यंत्र कुठे आहे, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. अनेक भागांत हवामानमापक केंद्रांची दुरवस्था झाली आहे. त्याभोवती वृक्ष, काटेरी झुडपे आणि आडोसा आहे. यामुळे तापमान, थंडी व वारा यांची नेमकी व अचूक नोंद होत नाही. त्यामुळे अनेक केळी विमाधारकांना मागील हंगामात अधिक तापमानाच्या भरपाईपासून वंचित राहावे लागले होते. यंदाही यासंबंधी तक्रारी येत आहेत.
भालोद, बामणोद भागांतील शेतकरी नाराज
थंडी किंवा कमी तापमानामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी यावल तालुक्यातील बामणोद आणि भालोद ही महसूल मंडळे यंदा पात्र ठरली नाहीत. मात्र, काही महसूल मंडळे अधिक तापमान आणि थंडीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पात्र ठरली आहेत. जिल्ह्यात यापूर्वी ८८ महसूल मंडळे होती. त्यात २२ नव्या महसूल मंडळांची भर पडली. या २२ महसूल मंडळांतील हवामानाच्या नोंदी तसेच कमी तापमानाच्या भरपाईतून वगळलेल्या मंडळांच्या नोंदी उपलब्ध करून देण्याची मागणीही पुढे आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.