PNE26W66210 - सोलापूर ः श्रीमज्जिनेंद्र आदिनाथ भगवानांच्या माता मरूदेवी -पिता नाभिराय यांच्या गोदभराईचा सोहळ्यात सहभागी इंद्र-इंद्राणी.
गर्भातील जीवाचे रक्षण हाच अहिंसेचा खरा संस्कार; मुनिश्री सुप्रभसागर महाराज
माता मरूदेवी व पिता नाभिराय यांची गोदभराई; मानस्तंभ स्थापना ; आज भगवान आदिनाथांचा जन्मोत्सव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता.१६ : अहिंसा केवळ जिवंत प्राण्याला त्रास न देण्यापुरती मर्यादित नाही, तर गर्भातील जीवाच्या अस्तित्वाचा आदर आणि त्याच्या संरक्षणातूनही ती व्यक्त झाली पाहिजे. गर्भपाताच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार असल्याचा संदेश परमपूज्य मुनिश्री सुप्रभसागरजी महाराज यांनी दिला. कुमठे येथे सुरू असलेल्या श्रीमज्जिनेन्द्र आदिनाथ भगवान जिनबिंब पंचकल्याणक एवं मानस्तंभ प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गर्भकल्याणक उत्तरार्धात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रतिष्ठाचार्य मुकेश पंडितजी व अखिलेश पंडितजी यांच्या उपस्थितीत यागमंडल विधानासह गर्भकल्याणकाच्या धार्मिक क्रिया पार पडल्या. यावेळी भगवान आदिनाथांची माता मरूदेवी व पिता नाभिराय यांच्या गोदभराईचा विधी झाला.
----------------------------------
पहिले महत्वपूर्ण कल्याणक म्हणजे गर्भकल्याणक
जैन धर्मपरंपरेत पंचकल्याणकांतील पहिले महत्त्वपूर्ण कल्याणक म्हणून गर्भकल्याणकाला विशेष स्थान आहे. तीर्थंकर आत्म्याचा गर्भात अवतार हा विश्वकल्याणाच्या आध्यात्मिक प्रवासाचा प्रारंभ मानला जातो. तीर्थंकरांच्या माता गर्भधारणेपूर्वी शुभ स्वप्ने पाहतात. ही स्वप्ने भावी तीर्थंकरांच्या आगमनाची मंगलसूचक चिन्हे मानली जातात. मातृत्वाचा सन्मान, जीवाचे अस्तित्व आणि अहिंसेची भावना या कल्याणकातून अधोरेखित होते
----------------------------------
प्रवचनात मुनिश्रींनी जैन आगमातील अहिंसा व जीवदयेच्या तत्त्वांचा संदर्भ देत गर्भातील जीवाबद्दल संवेदनशीलता बाळगण्याचे आवाहन केले. गर्भातील जीवाचे संरक्षण, मातृत्वाचा सन्मान आणि प्रत्येक जीवाप्रती करुणा आचरणात आणण्याची गरज त्यांनी विशद केली. सांस्कृतिक कार्यक्रमातून गर्भकल्याणकाच्या विविध धार्मिक क्रियांचे सादरीकरण करण्यात आले. पहाटेच्या मंगल वातावरणापासून गर्भकल्याणकातील विधींपर्यंतचे प्रसंग साकारताना पंचकल्याणकातील धार्मिक परंपरा समजण्यास मदत झाली.
-----------------------------------
आज जन्मकल्याणक; १० हजार लाडूंचे वाटप
भगवान आदिनाथांचा जन्मकल्याणक सोहळा आज सकाळी ठीक ८ वाजून १२ मिनिटांनी होणार आहे. यानिमित्त संपूर्ण गावात १० हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून दीपप्रज्वलनातून जन्मोत्सवाचे स्वागत केले जाणार आहे.
--------------------------------------
दुपारी १ वाजता मिरवणूक; पांडुकशिलेवर जन्माभिषेक
जन्मकल्याणकानिमित्त दुपारी १ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर पांडुकशिलेवर भगवानांचा जन्माभिषेक होणार असून, सौधर्म इंद्र व सर्व श्रावक या मंगल अभिषेकात सहभागी होणार आहेत. जन्मोत्सवासाठी कुमठे नगरी सज्ज झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.