पुणे, ता. ७ : गणरायाच्या आगमनासाठी घराघरांत तयारी सुरू असतानाच मंगलमय मंत्रोच्चारात गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या गुरुजींचीही लगबग वाढली आहे. घरगुती गणपती, सोसायट्या आणि सार्वजनिक मंडळांकडून प्राणप्रतिष्ठा, गणेशपूजा, तसेच सत्यनारायण पूजेसाठी गुरुजींचे आगाऊ बुकिंग करण्यात येत आहे.
एका दिवसात अनेक ठिकाणी जाण्याचे वेळापत्रक जुळवताना गुरुजींची धावपळ होत असल्याने ऑनलाइन बुकिंग, व्हिडिओ कॉलवरून पूजा सांगणे आणि ‘स्वयं पौरोहित्य’ यांसारखे पर्यायही पुढे आले आहेत. पुण्यात यापूर्वीही गणेशोत्सवाच्या काळात मोबाइल ॲपद्वारे गुरुजींच्या बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे नोंदवले गेले आहे.
आचमन, संकल्प, शुद्धीमंत्र, प्राणप्रतिष्ठा, अथर्वशीर्ष, षोडशोपचार पूजा आणि मंत्रपुष्पांजली अशा विधींनी गणरायाची पूजा केली जाते. त्यासाठी चौरंग, अष्टगंध, नारळ, आंब्याची डहाळी, दूर्वा, सुपारी, पंचपात्र, समई, जानवे, पत्री, शेंदूर, फुले आणि मोदक आदी साहित्याची तयारीही भाविकांकडून सुरू आहे. त्यासाठी गुरुजींची वेळ घेणे, पूजेचे साहित्य आणि वस्त्रे अशी कामे करण्यास भाविक, तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. पौरोहित्य करण्यात महिलांची संख्या वाढू लागली आहे.
‘‘गणेशोत्सवाच्या काळात प्राणप्रतिष्ठा, पूजाविधी आणि इतर धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवासाठी माझे वेळापत्रकही आधीच ठरवावे लागत आहे. अनेक ठिकाणी एकाच वेळेत पूजा असल्याने सर्वत्र प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आवश्यक मार्गदर्शनासह ऑनलाइन पूजा सांगण्याचा पर्यायही नागरिक स्वीकारत आहेत,’’ असे गुरुजी सुनील साठे यांनी सांगितले.
पौरोहित्य करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. स्त्री-पुरुष असा भेद न करता महिला पुरोहितांनाही पूजेसाठी बोलावले जात आहे. ही सकारात्मक सामाजिक बदलाची बाब आहे. धार्मिक विधींमध्ये महिलांना मिळणारी ही संधी महत्त्वाची आहे.
- डॉ. मनीषा शेटे, समन्वयक, ज्ञानप्रबोधिनी
गेल्या चार वर्षांपासून मी पुरोहित म्हणून कार्यरत आहे. पुरोहित होण्यासाठी दीड वर्षांचा अभ्यासक्रम असतो. या अभ्यासक्रमात विविध पूजाविधींसोबत संस्कृतचेही शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी इंटर्नशिपही दिली जाते. आतापर्यंत मी प्रामुख्याने विवाहसंस्कार केले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठीही चार ते पाच कुटुंबांनी गणपतीच्या पूजेसाठी माझ्याशी संपर्क साधला आहे.
- जान्हवी ओक, पुरोहित
सत्यनारायण पूजेचेही बुकिंग
गणेशोत्सवाच्या काळात केवळ गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठीच नव्हे, तर सत्यनारायण पूजेसाठीही पुरोहितांचे आगाऊ बुकिंग केले जात आहे. गणपती स्थापनेनंतरच्या सुट्टीच्या दिवसांत किंवा विसर्जनापूर्वी सत्यनारायण पूजा आयोजित करण्याचा कल अनेक कुटुंबांमध्ये दिसतो. त्यामुळे एकाच कुटुंबाकडून गणपतीची पूजा, त्यानंतर सत्यनारायण पूजेसाठी पुरोहितांची उपलब्धता आधीच विचारली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.