पुणे

मंगलमयी वातावरणात गणराय विराजमान

CD

पुणे, ता. १४ : सकाळच्या प्रसन्न वातावरणात दरवळणारा फुलांचा गंध... आकर्षक रांगोळ्यांनी फुललेले रस्ते... आसमंतात निनादणारा ढोल-ताशांचा गजर... फुलांनी सजलेले रथ व पालख्या... पारंपरिक वेशभूषेत नटलेले पुणेकर आणि गणरायाच्या जयघोषाने भारलेले वातावरण! गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मंगल क्षणाची भाविक आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आज आला. आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे चैतन्य फुलले आणि पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला दिमाखदार सुरुवात झाली.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोमवारी भक्तिमय वातावरणात सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तसेच घरोघरी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या आनंदसोहळ्यामुळे शहरात सर्वत्र उत्साहाला उधाण आले होते. सकाळपासूनच रस्त्यांवर गणरायाच्या आगमनाची लगबग दिसत होती. कुठे फुलांनी सजविलेल्या वाहनातून गणरायाची मूर्ती घराकडे निघाली होती; तर कुठे पारंपरिक वेशभूषेत कुटुंबीय मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. छोट्या-मोठ्या घरांच्या उंबरठ्यांवर रांगोळ्यांची नक्षी, तोरणांची आरास आणि फुलांची उधळण होत होती. मंगलमय वातावरणात विधिवत पूजाअर्चा, आरती आणि मंत्रोच्चारांच्या साथीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पारंपरिक पद्धतीने मिरवणुका
सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तर उत्साहाला उधाण आले होते. मानाच्या पाच गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढल्या होत्या. पारंपरिक मंगलवाद्यांची सुरावट, त्याला मिळणारी ढोल-ताशांची लयबद्ध साथ यामुळे वातावरणात उत्साह संचारला होता. सकाळी आठ वाजेपासून विविध ठिकाणी मिरवणुकांना सुरुवात झाली. दुपारी दोनपर्यंत श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झाली. मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.

मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना
मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ :
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी ११.४५ वाजता वेदमूर्ती देवव्रत रेखे गुरुजी यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकातून मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्या निवासस्थानापासून मिरवणूक काढण्यात आली. अपोलो सिनेमा चौक, दारूवाला पूल, फडके हौदामार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. परंपरेप्रमाणे श्री कसबा गणपती पालखीत विराजमान झाले होते. मिरवणुकीत प्रभात बँड, ज्ञानप्रबोधिनी पथक, शौर्य पथक आणि संघर्ष पथक सहभागी झाले होते.

मानाचा दुसरा गणपती ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ :
ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून सुरुवात झाली. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौकामार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक यांच्या वादनाने मिरवणुकीत रंग भरले. चांदीच्या पालखीत विराजमान श्रीगणरायाची प्रतिष्ठापना दुपारी १२.१५ वाजता योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांच्या हस्ते झाली. यंदा मंडळातर्फे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम गणपती मंडळ :
श्री गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली. स्वप्निल सरपाले व सुभाष सरपाले यांनी तयार केलेल्या फुलांच्या आकर्षक रथात गणराय विराजमान झाले होते. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकामार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत जयंत नगरकर यांच्या नगारावादनासह अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान पथक, शिवतेज, शिवरुद्र, शिवताल, रुद्रतेज, कलावंत ढोल-ताशा पथक आदींचा सहभाग होता. दुपारी दोनच्या सुमारास श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली. यंदा मंडळाने पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ :
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने भव्य ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सुमारे ३२ फूट रुंद, ३५ फूट उंच आणि १०० फूट लांबीच्या या भव्य मंदिराच्या संपूर्ण रचनेमध्ये १० आकर्षक खांब उभारण्यात आले आहेत. मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. गणपती चौक, लक्ष्मी रस्ता, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक, लक्ष्मी रस्त्यामार्गे उत्सव मंडपात आली. दुपारी १२.३० वाजता श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती मंडळ :
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सकाळी ९ वाजता रमणबाग चौकातून सुरुवात झाली. परंपरेप्रमाणे पालखीतून मिरवणूक निघाली. ही मिरवणूक रमणबाग चौकातून शिंदेपार चौक, ओंकारेश्‍वर मंदिर, वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकी, न. चिं. केळकर रस्त्याने उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत बिडवे बंधू यांचा सनई-चौघडा, श्रीराम व कलावंत ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. सकाळी ११.४५ वाजता रौनक टिळक यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भाविकांच्या साक्षीने झाला. सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगणात श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. तत्पूर्वी, सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून आगमन मिरवणूक काढण्यात आली. गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड मिरवणुकीत सहभागी झाले होते.

अखिल मंडई गणपती मंडळ :
फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून अखिल मंडई गणपती मंडळाच्या श्री शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघाली होती. अखिल मंडई मंडळ ते मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, मेट्रो स्टेशनमार्गे उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीत समर्थ आणि तालचक्र पथकांसह न्यू गंधर्व बँड सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. यंदा मंडळातर्फे ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीच्या हरिहर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट :
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टचे गणराय यंदाची सजावट असलेल्या ‘श्री गणेश सुवर्णधाम मंदिरा’त विराजमान झाले. ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी, आगमन मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शंखनाद या ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. मिरवणूक बुधवार चौकात पोहोचताच कसबा, पुणे दहीहंडी संघाच्या गोविंदांनी मानवी मनोरे रचून गणरायाचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT