गणेशोत्सवात पोलिसांना घेता येणार नाहीत रजा
पोलिस महासंचालक कार्यालयाचे आदेश; ग्रामीणमध्ये चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : यंदाचा गणेशोत्सव १२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सोलापूर ग्रामीणमधील ११४४ गावांमध्ये यंदा तीन हजार २१५ लहान-मोठी मंडळे गणपतीमूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. गणेशोत्सवात पोलिस अंमलदारांच्या रजा बंद करण्यात आल्या असून, त्यांना १२ दिवस बंदोबस्ताची ड्युटी करावी लागणार आहे. अत्यावश्यक कारणांशिवाय कोणत्याही अंमलदारास रजा दिली जाणार नाही, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये यंदा २४९ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ असणार आहे. यंदा गणेशोत्सवात ‘डीजे’ लावणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई होणार असून, तशा सक्त सूचना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी २५ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी मागविण्यात आली आहे. यातील तीन तुकड्या (प्लाटून) बार्शी, अक्कलकोट व पंढरपूर येथे पाठविली जाणार आहे. १९०० पोलिसांच्या मदतीला बाहेरील ११०० होमगार्ड असणार आहेत. १२० अधिकारी देखील बंदोबस्त आणि गणेशोत्सवावर लक्ष ठेवून असतील. दंगा नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) तीन तुकड्या, जलद प्रतिसाद पथकाच्या (क्युआरटी) चार तुकड्या आणि स्ट्राईकिंगच्या दोन तुकड्या देखील गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी मैदानात असणार आहेत.
---------------
ग्रामीणमध्ये बंदोबस्त असा...
पोलिस अंमलदार
१९०१
पोलिस अधिकारी
१२०
होमगार्ड
११००
‘एसआरपीएफ’ तुकडी
१
विशेष तुकड्या
९
---------------------
चौकट
...तर जागेवरच जप्त होणार ‘डीजे’
गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत निश्चित झालेल्या आवाजाचे पालन सर्व मंडळांना करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट आदेश काढले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सर्वांना करावी लागणार असून तशा सूचना सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी मंडळांना दिल्या आहेत. आदेश मोडून ‘डीजे’ लावला तर तो जागेवरच जप्त केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.