अक्षरचिंतनरूपी गणेशु !
- डॉ. आर्या आशुतोष जोशी
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥
प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधिनां त्वा निधिपतिं हवामहे वसो मम ।
अहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् ॥ ऋग्वेद २.२३.९
भारतीय ज्ञान परंपरेत नित्य पूजनीय श्री गणपती ! पण तो केवळ गणांचा पती नाही तर प्रियजनांचा अधिपती आहे. तो समृद्धीचा स्वामी आहे. भक्त त्याची प्रार्थना करतात आणि त्याचे ध्यान करतात.
ओम् ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्ता
सूक्तस्य बोधि तनयं च जिन्व।
विश्वं तद् भद्रं यदवन्ति देवाः
बृहद् वदेम विदथे सुवीराः।। ऋग्वेद २.२३.१९
ब्रह्मन म्हणजे वाणी. ऋग्वेदामधे वाणीचा अधिपती असलेल्या ब्रह्मणस्पतीला गणपती असेही म्हटले गेले आहे. तो मंत्रविद् म्हणजे मंत्र जाणणारा देव आहे. हा सर्व जगाचा नियामक मानला गेला आहे. तो देव इ. गणांचा म्हणजे समूहांचाही अधिपती आहे. सर्व ज्ञानी लोकांमधेही तो सर्वश्रेष्ठ आहे.
गणपती हा विद्येची, ज्ञानाची श्रेष्ठ देवता मानली गेली ती ही याच कारणामुळे. विद्यारंभी ज्ञानदात्या गजाननाचे आदरपूर्वक स्मरण केले जाते ते यासाठीच. या गणेशाचे तात्विक रूप समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी अभ्यासावे लागते अथर्वशीर्ष. ती केवळ प्रार्थना नाही. गणेशविद्या उलगडून सांगणारे ते एक महत्त्वाचे उपनिषद आहे. गणपती या जगाचा निर्माता आहे. तो सृष्टीचे आदितत्व आहे. तो आपल्या भक्तांचे रक्षण करणारा आहे. तो वक्त्याचे म्हणजेच जो गणपतीचे गुणवर्णन करणाऱ्या अशा भक्ताचे रक्षण करतो. ते गुणवर्णन ऐकणाऱ्या श्रोत्यांचेही रक्षण करतो. तो सर्वांचे मंगल करणारा आणि स्वतः मंगलस्वरूप असा आहे.
भारतीय परंपरेत ज्ञानाला विशेष महत्त्व आहे. ज्ञाननिर्मिती करणारे गुरू आणि ते स्वीकारणारे शिष्य यांचेही तो रक्षण करणारा आहे. आपल्या भक्तांवर सर्व दिशांनी तो कृपादृष्टी ठेवणारा आहे. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतांमधेही गणेशतत्व व्यापून आहे.
अथर्वशीर्षात गणपतीला गुणत्रयातीत म्हणजे सत्व, रज, तम या तीन गुणांच्या पलीकडचा देव मानले आहे. सात्विक, राजसिक आणि तामसी वृत्ती आपल्या प्रत्येकामधेच असतात. पण आपली सात्विकता वाढावी यासाठी आपणही गणेशाच्या उपासनेतून विशेष प्रयत्न करावा, असे यातून सूचित होते.
गणपतीच्या उपासनेसाठी वेगवेगळ्या ग्रंथांची रचना झालेली आहे. अथर्वशीर्ष आणि गणपतिस्तोत्र हे सामान्यतः महाराष्ट्रात घरोघरी म्हटले जाते त्यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे असते. त्याव्यतिरिक्त सिद्धिविनायकस्तोत्र, विज्ञानगणराजस्तोत्र, गणेशहृदयस्तोत्र, शंकराचार्य विरचित गणेशपंचरत्नस्तोत्र, पंचश्लोकी गणेशपुराण अशी विविध स्तोत्र गणपती देवतेच्या उपासनेसाठी रचली गेलेली आहेत. केवळ एवढेच नाही तर अथर्ववेदाशी संबंधित गणेशपूर्वतापिनी उपनिषद आणि गणेशउत्तरतापिनी उपनिषद या दोन उपनिषदांमधे गणपतीविषयक तत्वज्ञान या उपनिषदांनी मांडलेले आहे. गणेशाशी संबंधित गणेशयंत्र, विनायकयंत्र अशा यंत्रांची माहिती यामधे दिलेली आहे. उत्तरतापिनी उपनिषदात गणपती म्हणजे ओंकार अशा आशयाची मांडणी केलेली आढळते.
हेरम्बोपनिषदात गणेशाशी एकात्म पावल्याने भक्ताचे कल्याण होते, असे नोंदवत गणेशाची उपासना कशी करावी, याचे मार्गदर्शन केले आहे.
गाणपत्य संप्रदायाचे अधिष्ठान मानले गेलेले श्रीगणेश पुराण, मुद्गल पुराण हे ग्रंथ तर गाणपत्य उपासकांचे कंठमणीच आहेत. याखेरीज शिवाशी संबंधित लिंग पुराण, शिव पुराण यामधेही गणेशवर्णन आढळते. नारदपुराण, सौर पुराण, अग्नि पुराण अशा विविध पुराणग्रंथांमधे गणेशाचे महात्म्य, उपासना, विधिविधान यांचे वर्णन केलेले दिसून येते.
गणेशगीता ही गणेशाच्या उपासनेशी संबंधित रचनाही उपलब्ध आहे. गणेश पुराणाच्या क्रीडाखंडामधे गणेशगीतेचा समावेश आहे. वरेण्य नावाच्या राजाला प्रत्यक्ष गणपतीने केलेला उपदेश गणेशगीतेमधे समाविष्ट आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशगीतेचा पाठही करावा असा संकेत रूढ आहे.
गाणपत्य उपासकांपैकी मोरगाव येथील अंकुशधारी योगींद्र महाराज रचित योगींद्रविजय नावाचा ग्रंथ हा गणेश अद्वैत सिद्धान्ताचा बोध करून देणारा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे.
या साऱ्या ग्रंथांचा आढावा घेतला, अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की गणपतीचे बाह्य रूप जसे बदलत गेले तसाच त्याच्या तात्विक रूपातही बदल होत गेला. देवता विकासाच्या या प्रवासात त्याच्या विविध आख्यायिका विकसित झाल्या. त्यांच्या माध्यमातून त्याला वेगवेगळी विशेषणे जोडली गेली. जनमानसात या कथा लोकप्रिय झाल्या. या साऱ्यातूनच प्रत्येकाच्या मनात गणपती विराजमान झाला. प्रत्येकालाच तो आपला वाटू लागला.
गणेशाच्या रूपाशी जोडलेल्या विविध कथांच्या माध्यमातून विविध रूपके मांडली गेली आहेत. विनायक हे गणपतीचं एक प्रसिद्ध नाव. शान्तिमयूख ग्रंथात विनायक नावाच्या सहा गणांचा उल्लेख येतो. मित, संमित, कटंकट, कूष्मांड, राजपुत्र आणि शाल हे ते सहा गण होत. हे विनायक गण लोकांच्या कामात बाधा आणत, त्यांचा लोकांना त्रास होत असे. वराह पुराणातील आख्यायिका आहे की ऋषींच्या यज्ञकार्यात नेहमी बाधा येत असे. ती दूर करण्यासाठी ते शंकराकडे गेले आणि त्यांनी त्याची प्रार्थना केली. शंकराने स्वतःच्या सामर्थ्याने शस्रधारी, निळ्या रंगाचे, हत्तीचे तोंड असलेल्या अशा विनायक गणांची निर्मिती केली. स्वतःच्या मुखापासून तयार केलेल्या कुमाराला त्याने या गणांचा मुख्य म्हणून नेमले आणि त्याला वर दिला की तुला गणेश, विनायक अशी नावे लाभतील. तेव्हापासून उपद्रवी असे विनायक हे गणेशाच्या आधीन राहू लागले. शंकराने दिलेल्या वरामुळे विनायकांचा अधिपती असलेल्या गणेशाचे कार्यारंभी विघ्नहर्ता म्हणून स्मरण, पूजन होऊ लागले.
पाशांकुशवरद हस्त। एके करी मोदक शोभत।मूषकावरि अति प्रीत। सर्वांगी सिंदूर चर्चिला।। असे गणपतीचे मोहक रूप. गणपतीचा मोठा आकार पाहता तो एका चिमुकल्या उंदरावर स्वार होतो ही कल्पना आश्चर्यकारक वाटते. पण तरीही बालगोपाळांना गणपतीसह असलेल्या या उंदीरमामाचे विशेष आकर्षण असते. गणेश पुराणात एक आख्यायिका आहे. एक गंधर्व होता. त्याचं नाव क्रौंच. इंद्रदेवाच्या सभेत एकदा तो फिरत असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. वामदेव लगेच रागावून त्याला म्हणाले की ‘तू उंदीर होशील.’
उंदीर झालेला तो गंधर्व पराशर ऋषींच्या आश्रमात आला आणि तिथले सगळे पदार्थ खायला त्याने सुरुवात केली. हे पाहुन पराशर ऋषी गोंधळले.
या संकटातून सोडविण्यासाठी नंतर पराशरांनी गणेशाची प्रार्थना केली. गणेश प्रकटला आणि त्याने उंदराला वर मागण्यास सांगितले. पण उन्मत्त उंदराने गणपतीलाच सांगितलं की तूच मला वर माग. हे ऐकून गणपती रागावला आणि आजपासून तू माझे वाहन हो असा आदेश त्याने उंदराला दिला. उंदीर हा गणपतीचे वाहन कसे बनला असावा, याची या प्रातिनिधीक आख्यायिकेच्या आधारे कल्पना येते.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदीरमामाला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धतीही लोकसंस्कृतीत रूढ असलेली दिसून येते. चंचल, सतत इकडून तिकडे धावणारा असा हा मूषक अज्ञानाचे प्रतीक. ज्ञानाची, विद्येची देवता असलेला गणपती त्यावर आरूढ होतो. ज्ञानाने अज्ञानावर मिळविलेला विजय हे गणपतीचे गुणवैशिष्ट्य या रूपकातून दिसून येईल. ज्ञानाची उपासना करायची असेल तर भौतिक वस्तूंचा मोह टाळत, एकाग्र चित्ताने, स्वस्थपणाने, एका जागी बसून अभ्यास करणे, मनाची धावपळ कमी करणे, चिंतन करणे फार महत्त्वाचे आहे हे या रूपकातून शिकण्यासारखे आहे.
गणेशाने आधात्मिक उपासनेत रमलेल्या संत मंडळींनासुद्धा आकर्षित केले आहे. कला आणि विद्यांचा अधिष्ठाता असलेला गणेश एक उत्तम नर्तकही आहे. आपलं लंबोदर आणि तुंदिलतनु रूप सांभाळून तो स्वतःच्या नृत्यकलेतील प्राविण्य जोपासतो आहे. नटराज शिवाचा पुत्र अशी त्याची पुराणग्रंथातली ओळख आहेच. त्यामुळे कधी तो आपल्या पित्याच्या नृत्यात त्यांना वाद्याची साथ करताना दिसतो तर कधी स्वतः नृत्यात मग्न होतो. कर्नाटकातील बदामीच्या प्रसिद्ध लेण्यांमधे नृत्यात मग्न शिव आणि त्याच्यापुढे वाद्य हाती घेतलेला गणपती आपल्याला दर्शन देतात. ब्रह्म पुराणातील आख्यायिकेनुसार गणेशाने शंकर आणि पार्वती यांच्यासमोर नृत्य करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यामुळेच शंकरांनी त्याला कौतुकाने स्वतःच्या डोक्यावरील चंद्र बहाल केला.
शिल्पशास्रातही नृत्यगणेशाची विविध रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात. नृत्य करताना कधी तो आपल्या हातात सर्पही धरतो. समर्थ रामदासांनी दासबोधामधे नृत्यगणेशाचे सुरेख वर्णन केलेले आहे.पहिल्या दशकाच्या दुसर्या समासात समर्थ म्हणतात.
सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥
चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।
साजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥
अत्यंत नटून सजून, चपळाईने तरीही लालित्यपूर्ण नृत्य करणारा गणेश हा सर्व कलाकारांचा आदर्शच आहे.
गणेशाचं तात्विक रूप महाराष्ट्रमनात सोप्या शब्दात ठसवलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी !
ओम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। देवा तुचि गणेशु। सकलमतिप्रकाशु। म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी।। अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कळवले। ते मिया श्रीगुरुकृपा नमिले। आदिबीज।।
ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या प्रारंभीच गणेशाच्या तात्विक रूपाचे वर्णन करताना माऊली म्हणतात तरी तर्कु तोच फरशु। नीतिभेदु अंकुशु।वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे।। गाणपत्य संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक मोरया गोसावी म्हणतात- अहो, येई तू मोरया,हो त्रयलोक विसावया। जडडीव तारावया हो तूचि।। संसाराचा भवसागर पार करून जड, मूढ, भक्तांचे तारण करणारा गणेश त्रैलोक्याला स्थिरता देणारा आहे. भक्तिरंगात रंगलेला गणेश शाहिरांच्या कवनातूनही डोकावला आहे.शाहीर प्रभाकरांच्या कवनात गीताच्या रचनेची आज सिद्धी करण्यासाठी हे गणराया तू ये अशी विनंती केलेली दिसते. गौरीसुता सभे लंबोदरा ये।सांदुरमर्दन विघ्नहरा ये।गीत प्रसंगी रे करी आज सिद्धी।गातो आधी तुला विघ्नहरा ये। पूजाप्रसंगी वंदनीय गणेश कलेच्या सादरीकरणाप्रसंगीही अग्रस्थानी स्मरणीय आहे. त्याच्या आशीर्वादानेच शाहिरांची कला जनमानसात पोहोचली आहे.
चतुर्थी आणि गणपती हे असेच एक समीकरण आपल्याला माहिती असते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया या तीन तिथींच्या नंतर येणारी ही चौथी तिथी. गणपतीला चतुर्थी तिथी प्रिय आहे अशी धारणा आहे. गणपती या देवतेच्या उपासनेसाठी केले जाणारे उपवासही चतुर्थीलाच केले जातात.
जागृती म्हणजे जागेपणीचा काळ. अविरत कार्य करीत राहण्याचा काळ. दिवसभराच्या शारिरिक श्रमानंतर शरीराला विश्रांती देण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची असते.
स्वप्नावस्था म्हणजे झोपेमधे आपल्याला जी स्वप्ने पडतात तो काळ. काही स्वप्ने आपल्याला सकाळी उठल्यानंतरही आढळतात. काही स्वप्नांची मालिकाच आपण झोपलेल्या अवस्थेतही अनुभवतो. सुषुप्ती म्हणजे यापलीकडची अवस्था. गाढ झोपेचा काळ. या अवस्थेचा अनुभव हा स्वप्नावस्थेच्या पलीकडचा असतो. याच्या पुढची अवस्था म्हणजे तुरीयावस्था. मनाची उन्मनी अवस्था. तुरीयावस्था ही आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची मानली जाते. ही चौथी म्हणजे चतुर्थ अवस्था. गणेशाच्या उपासना परंपरेत या चतुर्थ अवस्थेला महत्त्व दिले गेले असल्याने आपोआपच चतुर्थी या तिथीलाही गणपतीच्या व्रतांमधे महत्त्वाचे स्थान दिले गेलेले दिसते.
सर्वांच्या कल्याणासाठी, अमंगलाचा नाश करण्यासाठी गणपती सदैव भक्तावर दृष्टी ठेवून आहे. मात्र भक्ताची भक्तीही डोळस हवी. उपास्य दैवतावर श्रद्धा ठेवताना तिच्याकडेही चिकीत्सक दृष्टीने पाहण्याची प्रेरणाही गणपती आपल्याला देतो आहे. विद्येची, ज्ञानाची आणि अर्थात संघटनेची देवता असलेला हा गणपती. संघटनेचा नायक म्हणून तो कुशल नेताही आहे. त्याचा सेनानायक किंवा गणांचा नायक हा गुणविशेष आत्मसात करण्यासारखा वाटतो.
गणेशाच्या रूपामागील तत्वज्ञान, त्याचा देवता म्हणून विकास, त्याच्या रूपकांमागील आशय, त्याची गुणवैशिष्ट्ये असे विविध विषय आपल्यासमोर या लेखातून आले आहेत. यानिमित्ताने- गणेशाशी संबंधित विविध ग्रंथ शोधावेत व त्यांचा अभ्यास करावा. आपल्याला माहिती नसलेल्या एखाद्या नव्या स्तोत्राचा शोध घ्यावा व ते शिकावे आणि इतरांनाही शिकवावे. भारतातील नवयुवक आणि युवतींनी गणेशाचा हा गुण अंगिकारत देशाच्या कल्याणासाठी स्वत:मधील नेतृत्वशक्ती जागी करण्याचा संकल्प या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जरूर करावा.
शुद्ध भक्ती, निर्मळ श्रद्धा आणि चिकीत्सक अभ्यास यासाठी मंगलमूर्ती आपल्याला आशीर्वाद देवो.
गणपतीचे हे कधीही नाश न पावणारे अ-क्षर चिंतन आपल्या शरीर-मन-बुद्धीला स्थिरता प्रदान करो.
(लेखिका धर्मशास्त्र विषयाच्या संशोधक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.