खेड शिवापूर, ता. २८ : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर परिसरातील अनेक उद्योग कंपन्यांतील कामगारवर्ग मोठ्या संख्येने आपापल्या गावी गेला आहे. त्याचा मोठा फटका या भागातील अनेक लहान-मोठ्या उद्योग व्यावसायिकांना बसतो आहे. कामगारवर्गाशिवाय उद्योग व्यवसाय चालविणे ही उद्योग व्यावसायिकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. कोणी कामगार देता का कामगार, असे म्हणण्याची वेळ अनेक उद्योग व्यावसायिकांवर आली आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर वेळू आणि खेड शिवापूर भागात औद्योगिक पट्टा आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. काही महिन्यांपूर्वी इस्राईल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता. या परिस्थितीत जेवण बनविण्याचा मोठा प्रश्न या कामगारांसमोर उभा राहिला. त्यामुळे गॅसपुरवठा सुरळीत होईपर्यंत आपापल्या गावाला जाण्याचे अनेक कामगारांनी पसंत केले. त्यामुळे अनेक कंपन्यांमधील कामगारवर्ग मोठ्या संख्येने आपापल्या घरी गेला आहे. त्यातच भर म्हणजे पश्चिम बंगालमध्ये निवडणुका असल्याने पश्चिम बंगालमधील अनेक कामगारही गावाला गेले आहेत. त्याचाही फटका उद्योग व्यवसायांना बसला आहे. तसेच हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिकांनाही सध्या कामगार समस्येचा प्रश्न भेडसावत आहे. या परिस्थितीत उद्योजक व्यावसायिकांना कामगार मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
युद्धामुळे मध्यंतरी गॅसटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्याचा फटका आमच्या उत्पादन क्षमतेवर होतो आहे. कामगारांची समस्या असल्याने वेळेत ग्राहकांपर्यंत माल पोचविणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान झाले आहे. तसेच नवीन कामगार मिळविण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- पराग मेंगाळे, संचालक, सिन्यूमेरो कंपनी, शिंदेवाडी (ता. भोर)
अनेक कंपन्यांनी सुरू केली कामगार भरती
कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक उद्योग व्यवसायांवर त्याचा परिणाम झालेला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कुशल तसेच अकुशल कामगारांची भरती सुरू केली आहे. या संधीचा फायदा घेऊन गरजू तरुण-तरुणींनी आपल्या भागातील कंपन्यांमध्ये रोजगार शोधावा," असे आवाहनही अनेक उद्योजक गावागावांतील तरुणांना करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.