फायनल
-------------------------------------------
(लेखातील बोलीभाषेतील शब्द तसेच ठेवावेत. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाण बदलून घेऊ नयेत.)
जेन्झी फार्मर...
------------------
लीड- ........
-------------------
राजकुमार लक्ष्मणराव तांगडे
--------------------
काळ किती झपाट्याने निघून जातो. शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन सुद्धा अंदाजे अकरा अब्ज सेकंदाजवळ जवळ वेळ निघून गेली. काळ चिमटीत धरताच येत नाही. इतकं काही घडून जातं, की आपल्या स्वतःच्या जीवनाचा पट सुद्धा सिनेमाच्या ट्रेलर इतकाच आठवणीत राहतो. आपल्या आयुष्यातल्या आठवणी आपल्यापेक्षा आपण ज्या समाजात राहतो त्यातल्या लोकांना जास्त आठवतात. आपल्याला विसरण्याचा रोग आहे. आपण शॉर्ट मेमरी आहोत. आपल्या पूर्वजाचे सुद्धा अपवाद वगळता चार-पाच पिढ्यांच्या वरची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. राज्य व्यववस्था सांभाळणाऱ्यांचे पण ठळक ठळक कामं करणाऱ्यांचेच नावं आपल्या नजरे समोर येतात. काल सकाळी काय खाल्लं ते सुद्धा आठवत नाही. कालचा पाऊस आठवत नाही, नापिकी आठवत नाही, कालचे खताचे भाव आठवत नाहीत, दहा वर्षांपूर्वीचे सोयाबीनचे भाव आठवत नाहीत, रस्त्याचे खड्डे आठवत नाहीत... असे आहोत आपण. शरीराच्या जखमा जरी जुळल्या तरी व्रण मात्र राहतात. आठवणीचं तसं नाही.
आताची पिढी मात्र तशी नाही. त्यांनी मेंदूला आठवणी आठवणीत ठेवायचा ताणच ठेवला नाही. त्यांना समाजमाध्यम (सोशल मीडिया) पटकन अपडेट देतं. आज वर्षापूर्वी या तारखेला, या दिवशी, या वेळी तुम्ही हे हे करत होता. तुमच्या आठवणी स्टोअर करायचं काम माध्यम करतं म्हणून “काश हमारी यादे भी कोई ऐसे ही स्टोअर करके हमे याद दिलाता तो...”
सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मन-मेंदूमध्येच निसर्गाने एखादी अशी चिप बसवायला हवी होती; ज्यात मागच्या जन्माच्या नसायनात का पण किमान मागे जगलेल्या आयुष्याचा डाटा लोड असेल. त्यात गेल्या वर्षी या या ठिकाणी तुम्ही आजच्या दिवशी घरची फवारणी सोडून माननीय साहेबांची सभा ऐकायला गेला होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला शेतीमालाच्या भावाबद्दल हे हे आश्वासन दिले होते... अशी नोंद असेल. जसं फेसबुक तुम्हाला सांगतं, की आज आमुक तमुकचा वाढदिवस आहे, तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. तसं गेल्या वर्षी या मेळाव्यात, या अंदोलनात, या जाहीर सभेत माननीय साहेबांनी तुम्हाला अमुक अमुक अश्वासन दिले होते. कृपया त्यांना आठवण करून द्या. आणि तुम्हीही जसे जेवढ्या आत्मीयतेने प्रेमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देता, तेवढ्याच धाडसाने तुम्ही मतदान केलेल्या साहेबांना, त्यांच्या पक्षांना जर आठवणीने विचारलं, एवढच काय रोज विचारलं तर किती भारी होईल. जशी आजची आपली जेनझी विचारते तसं.
जेनझी वरून आठवलं, अजून हे प्रकरण वेगळंच... आमच्या शेजारच्या समा काकूंसारखं ज्याच्या त्याच्या तोंडी जेनझी, जेनझी ऐकून इतका धसका घेतली, की दोन दिवस जेवणच नाही केलं. तिला पोथी-पुराण ऐकायची आवड, महाराज बोलता बोलता म्हणले हे कलियुग आहे, आता जेनझीचा काळ आलाय. काकूनं दैत्य, राक्षस ऐकलं होतं हे नवी, पण हे नवीन व्हर्जन ऐकून तिला धक्का बसला. त्यात सरकार जेनझीवर तावातावाने बोलत होतं, तिचा पक्का समज झाला, की हे काहीतरी भयंकर प्रकरण आहे. पण तिला जवा कळलं जेनझी मंजी दुसरंतिसरं कोन्ही नाही, तर आपला गोट्या, चैत्या, पिंट्या, समी हेच हायेत, तवा तिच्या जिवात जीव आला. कारण हीच पोरं तिचं आधार अपडेट करून देतात, बसता येत नसलं तरी मोटार सायकलवर दोघाच्या मध्ये बसवून कदम डाक्टरकडून सलाइन लावून आनतात, चष्म्याची दांडी बसवतात, तिचा बंद पडलेला पगार चालू कराण्यासाठी तीन वर्षांपासून झटतात, तिचा थम उमटत नव्हता तर दिवाळीत ऊरलेल्या साबणानं बोटं घासून थम आनला. त्यामुळे तिच्या जिवात जीव आला की बुवा ही तर आपलीच नातवंड आहेत. तशी प्रत्येक घरात, गल्लीत, गावात, राज्यात, देशात, जगात अहो प्रत्येक क्षेत्रात जेनझी अवतरली. अगदी शेतीत सुद्धा. तर ही शेतीत उतरलेली जेनझी ‘एल निनो’सारख्या वातावरणात आज कुठं बसून नेमका कसा काय विचार करत असेल याचं कुतूहल जागं झालं. आणि मनात विचार आला. आपण भेटूच गावातल्या जेनझीला. कुठं भेटतील आपल्याला ते? क्रिकेटच्या ग्राउंडवर? गावातल्या ओट्यावर? ढाब्यावर? कावड यात्रेत? बाइक रॅलीमध्ये? दौडमध्ये? ढोल-ताशे पथकात, डीजेच्या समोर, अभ्यासिकेत, आंदोलनात, की भाऊ-दादाच्या बॅनरवर? गावातली जेनझी नेमकी कुठं भेटेल? त्यांचा नेमका पत्ता कुणाला विचारावा म्हणून विचार करत करत गाडी काढली आणि निघालो शोध घ्यायला.
......
एका पंपाजवळ आलो. आमचे मित्र बापूराव घुमरेला फोन लावला आणि मासेगावला यायलो म्हणून सांगितलं. गावाचं नाव मासेगाव पण विरोधाभास इतका, की भर पावसाळ्यात तिथं टँकरनं पाणीपुरवठा करावा लागेल. पंपावर गेलो. डिझेल टाकायचं होत, तिथं थोडी रांग दिसली. आम्ही गावाकडची माणसं कुठे ही प्रतिष्ठेची स्पर्धा करतो... एक हायवा आणि एक सुंदर फॉर्च्यूनर नंबराला लागली होती. मी त्यांना मुद्दाम नंबर तोडून पुढं जायला वाट दिली. त्यांनी गाडीत पोटभर डिझेल टाकलं आणि ती गेल्यावर मी माझं पाचशे रुपयाचं डिझेल टाकलं, त्यात त्या पंपावरल्या जेनझीनं माझी हराशमेंट करायची म्हणून की काय पण दोनदा विचारलं, किती? मी आपलं जास्त लांब आवाज जाणार नाही याची काळजी घेऊन ‘पाचशे'' म्हणालो. तेवढ्यात काही तरी प्रॉब्लेम झाला आणि माझे फोन पेचे पैसे जात नव्हते. स्क्रीन वरच्या पाचशेच्या आब्रूचं हे प्रदर्शन लांबतच चाललं. खरं तर दहा वर्षांपूर्वी सोयाबीन पाच हजार रुपये होतं तेव्हा मोठ्या ऐटीत गाडीचा काच खाली करून पाचशे रुपयाची नोट लांबवायचो. मी पाचशे रुपायचं डिझेल टाकतोय हे सगळ्या पंपावरल्यांना माहीत व्हावं अशी माझी आतून इच्छा असायची. दहा वर्षांनंतरही पाव्हण्याच्या गावाला त्याच कपड्यावर यावं तस वाटाय लागलं आज पंपावर डिझेल टाकताना. पाचशे रुपयाची किंमत कमी झाली, पण सोयाबीनला तर किंमतच ऊरली नाही म्हणून मनात अस्वस्थ वाटत होतं. तेवढ्यात चारदोन मोटारसायकल आल्या, विशीच्या आसपासची मुलं रिकाम्या कँड घेऊन आलेले. कुणी बाराशाचं, कुणी चौदाशाचं डिझेल आपल्या ट्रॅक्टरसाठी घेऊन जात होते. एवढ्या कमी पैशाचं डिझेल न्यायला ट्रॅक्टर परवडत नाही म्हणून कँड. जाता जाता मोटार सायकल मधे टाका पन्नासचं (पेट्रोल) म्हणत होते. मला बरं वाटलं. कुणीतरी आपल्या सारखं आहे. आणि मी पंप सोडला. मुलंही सुसाट निघून गेली.
रस्त्याने चालताना अधुन मधुन रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली सोयाबीन, कापूस, तुरीची शेतं एखाद्या दुर्धर आजारानं खंगावी तशी खंगलेली दिसतं होती. खरं तर या दिवसांत गावं ओस आणि शिवारं फुलून जातात पण आज उलटं पाहायला मिळत होतं. मे महिन्यात जसा शेतात शुकशुकाट असतो तसा शुकशुकाट सप्टेबरमध्ये...! माणसं तर सोडा पाखरं सुद्धा पोट भरायला पुण्या-मुंबईला गेली की काय कुणास ठावुक.. इतकी चिरशांतता..
गाडी चालवत होतो. वाटेत अर्धवट अर्धवट झालेले रस्ते दिसले. मध्येच कामे शेतकऱ्यांनी अडवलेली. कारण ही तसंच. काहींच्या तर सातबारावर रोडच नाही, तरी रस्त्याचं काम सुरू. मोबदला शून्य. अशा रोडच्या बाजूला गाडी उभी केली. निमित्तही तसंच. अशा बकाल वातावरणात एक आजोबा एक भाकड गाय चारत होते. आमचा रामराम शामशाम झाला मी म्हणलं, बाबा कसा झाला पोळा? म्हणाले, की पोळाच झाला नाही. काल तुम्ही पोळ्याला वेशी जवळ येवून पहायचं होतं. डोळ्याला दाखवायला पण बैल नव्हते. माणसापेक्षा जास्त असणारी बैलं-गाई-वासरं आता फुटूतच पहायची. पाव्हने दहा वर्सं व्हायले मानकऱ्यानं येशीत येऊन तोरणं तोडणं बंद केलय.. मी विचारलं का हो? बाबा सांगत होते, “मानकऱ्याला बैलंच रहिले नाही. तेव म्हणला मला हेव मान नकुच. एक काळ असा होता ह्या मानापाई येशीत रक्ताचा सडा पडायचा..ह्या बाजूच्या गावचा मानकरी पोट भरायला गेलाय आळंदीला.. गावात तुरळक शेतकऱ्याकडं बैलं हाईत, त्याच्या शेतीत ट्रॅक्टर आलाय पण डिसेलचे भाव असे... आमच्या गावात चारदोन जनाकडं बैल हाईत, तेबी रोजानं हानायला. पेरपाळीला भाड्यानं देण्यासाठी मजूर लोकायनं बैलं घेतलेत रोजगार म्हणून.
आख्या गावात मोजून पाच-पंचीस जोड्या असत्यान..मी तर म्हणतो आजून दहा पाच वर्सांत गाय, बैल चित्रातच पहावां लागलं येळचं तशी हे...”
मी म्हंटलं की, मंग ट्रॅक्टर म्हणल्यावर चांगलंच ना? ‘‘बाबा, लांबून तर सगळचं चांगल वाटतं हो.. ते तरी कुठं शेतकऱ्याचे राहिलेत बँकीवाले कव्हानुक वढुन नेहतेन सांगता येत नाही. जुन्या काळात सावकार शेतकऱ्याच्या दावणीचे बैलं वढुन नेहत होता. आताचे हे सावकार ट्रॅक्टर वढुन नेहतेत.’ आम्ही शाळेत असताना पोळ्याच्या ओढीने गावाकडं यायचो.आज आमच्या कुणाच्याच दावणीला जनावर नाही. गुरंढोरं पाहायला गो शाळेत नाहीतर प्राणी संग्रहालयात लवकरच मुलांना घेऊन जावं लागेल. मी तिथून निघालो. हे मी पण ऐकलं, की जवळ जवळ सगळ्याच मानकऱ्यांनी पोळ्याच्या तोरणाचे बैल मिरवण्याचे मान सोडायला सुरुवात केली. हे म्हणजे आपल्या देशाने कृषिप्रधान हे स्थान गमावल्याचे हे संकेत. पण भरमसाठ लोकसंख्या सोडली तर आपण दुसरं काहीच कमावलेलं नाही. मी ज्या रोडने निघालो त्या रोडच्या गुत्तेदाराला जर कमिशन नसतं, तर या रस्त्यावरचं जेव्हढ म्हणून तुकड्या-तुकड्या मधे कामं झालं, तेही झालं नसतं. असा विचार करत असताना मासेगावच्या चौकात आलो आणि इथली जेनझी सक्रिय असल्याची मला जाणीव झाली. कारण चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसला. हल्ली ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी आणि इतर पुतळे दिसतात. शिवाय त्या गावातल्या बहुसंख्य जात वास्तवाचे गणित कळून चुकते. वेगवेगळ्या महापुरुषांचे वेगवेगळ्या चौकात पुतळे दिसले की आपण त्या गावातील जात प्रभाव समजून घ्यायचे.
मी मंदिराजवळ पोहोचलो होतो. त्या दिवशी गोदरी (छोटासा आठवडी बाजार) भरली होती. जवळ जवळ सगळेच माश्या मारत बसले होते. मी विचारलं कसा काय धंदा? दुकानदारानं वर आभाळाकडं बोट दाखवलं होतं. एका दुकानावर एक ग्राहक ऊधार द्या म्हणून हट्ट करून बसला होता.. तो काही त्याला देत नव्हता. तो म्हणत होता सरकारी अनुदान आलं की देईल, दुकानदार म्हणला लबाडाच्या आवतन्यावर जेऊ घालता का आम्हाला? मी म्हटलं येईल ना अनुदान, दुकानदार म्हणला पाव्हणे, आहो, अजून गेल्या वर्षीचंच आलं नाही तर हे चालू वर्षीचं बोलायलेत. आहो, आजून डिक्लेरच झालं नाही. तो म्हणला मला बी शेती हाई.
मी विचारल्यावर दुकानदार सांगत होता, पाऊस नाही, यांचे सगळे पिकं करपलेत, रब्बीचं काही खरं नाही. बरं जरी पैसे आले तर हे आमचे थोडेच देणारहेत? दुखनंभान, शाळा, बिल भरणं, उधारी अशा लाख भानगडी. पहिले त्यांचेच देतेन. यांची काही फिक्स पगार नाही, की आपुन त्यांना तिच्या भरवशावर ऊधार द्यावा आणि मग ते आपल्याला अमुक तारखेला आनुन देतील. सरकारी अनुदानाचं काय खरं? त्या दुकानदारानं त्याचा माल विकण्याच स्वातंत्र्य आबादित ठेवलं. तेवढ्यात बापूराव बरोबर आमचे जुने मित्र माउली दादा आनंदे आले. दादा त्या गावातले प्रतिष्ठित. त्यांच्या आग्रहाने आम्ही त्यांच्या घरीच बसलो, त्यांच्या दारात भल्या मोठ्या पाच-पाच हजार लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या दिसल्या. मला वाटलं गावोगावी झाला तसा वॉटर फिल्टरचा प्रोजक्ट असेल. माउली सांगत होते. शेतात एक विहीर आहे. ह्या दोन टाक्या अगोदर भरून ठेवतो, उरलेल्या पाण्यात मंग थोडा फार गव्हू करायचा. अगोदर पिण्याची व्यवस्था मंग खान्याची. माऊली दादाचा मुलगा सुदर्शन शेती करतो. साधारण सव्वीस वर्षांचा. व्हेटरनरीचा (lss) कोर्स केलेला. सुदर्शन सांगत होता, या वर्षी खत-बीयानं म्हणलं तर किमान तीन एक लाखापर्यंत खर्च केला असेल, बाकी मशागत तर अक्कल खती. शेतीतून आता परत येण्याची आशा मावळली. त्यांच्याकडे ऊसतोडणी मशिन आहे. पण या वर्षी पाऊसच नसल्याने मशिनला कामच असणार नाही. लोकांनी आपले बांद कोरू नये म्हणूनच शेती वहीती करायचा कार्यक्रम चालू आहे. उरत काहीच नाही. त्यांच्याकडे गव्हू काढणीचे मशिन पण आहे. या वर्षी त्याला पूर्ण आराम मिळणार...
दादा बोलत असताना शिवाजी आला. अतिशय होतकरू तरूण. आई-वडिलांनी ठेवलेल्या नावाची बुज राखतं संसार खेटणारा, माउलीदादांनी मुद्दाम फोन करून बोलावून घेतलं होतं. आम्ही गावखुरीच्या शेतात डोकावलं तेव्हा पूर्णपणे पिवळं पडलेलं सोयाबीन दिसलं. मला वाटलं, की शेंगा लागून काढणीलाच आलंय, म्हणून एक झाड ऊपटायला खाली वाकलो, तर तर नुस्ती काडी आणि पिवळी पडलेली पानं..
एवढा जथ्था घेऊन आपल्या शेतात कोण शिरलं म्हणून सचिन लगबगीने आला. तो ही बीएस्सी झालेला. वय असंच पंचवीस. शिवाजीनं ही हॉर्टिकल्चर सायन्सची डिग्री घेतलेली. त्यात सुसक्षित बे-रोजगार म्हणून कर्ज काढून फवारणीचा ड्रोन घेतलेला. पंधरा एक्कर जमीन पण शेतात नुस्तंही जावं वाटत नाही. पिकांच्या वाढीने जमीन झाकली तरच शेतकरी फवारणी साठी ड्रोनचा वापर करतात. या वर्षी शून्य कार्यक्रम...बळीराज्य, राजू ही सगळी शिकलेली मुलं- आपण ज्यांना जेनझी म्हणतो ती मला एकगठ्ठा भेटली... या गावात खूप मुलांना रेशीम ऊद्योग करायचा म्हणून तुतीची लागवड केली पण पावसाअभावी वाढच झाली नाही. बरं ह्यांचे पूर्वज अशा ठिकाणी येऊन राहिलेतं जिथं जमिनीच्या वरपासून अगदी दोन फुटांवर काळा पाषाण सुरू होतो, तर दुसऱ्या ठिकाणी दहा फुटावर, वीस फुटावर पाषाण सुरू होतो, त्यामुळे विहिरीला मर्यादा येतात. दोन पावसात विहिरीला पाणी तर लगेच विहिरी कोरड्या. पूर्वजांना दोष देऊन ऊपयोग नाही कारण सगळ्यांनीच एका ठिकाणी राहीलं तर जगाची मुंबई, पुणे होईल. खरं तर जिथं आहेत तिथं आनंदानं आणि सन्मानानं राहता यायला हवं. ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यात सरकार म्हणून जिम्मेदारीही आलीच पण आपल्याकडे सरकार मंजी बड्याबड्या बाता आणि... खाई लाथा. हजारो कोटीच्या खाली त्यांची जीभ येतच नाही... बीएस्सी झालेला भरत आनंदे हा तरुण सांगत होता, ‘‘पूर्ण कामधंदा सोडून या सरकारी योजनाच्या मागे पळावं लागतं.. गोडाऊन साठी गेल्या वर्षी फाइल टाकलेली आहे. काहीच नाही. सर्वसामान्यांच्या कुठल्याच फाइल मंजूर होत नाहीत, सगळ्या योजना या राजकारणी लोकांच्या घशात जातात. आमचं गाव पोखरात होतं. ठिबकच्या पलीकडे शेतकऱ्याची मजलच जात नाही. एखाद्या गावातले काही खाते थकीत असले तर बँक पूर्ण परिसरातील गावेच ब्लॅक लिष्ट मधे टाकते. आता आपण जरी क्लिअर असलो तरी ते आपल्याला ब्लॅक लिष्टमध्ये टाकतात. अगदी इंग्रजांचा डीएनए यांच्या विचारात उतरलाय. समाजातील काही लोकांनी गुन्हा केला की त्या पूर्ण समाजाला गुन्हेगारी समाज म्हणून घोषित करायचं, आमच्याकडची गावंच्या गावं बँकेने प्रतिबंधित केलीत. या सरकारी आणि बँकेच्या कामांमध्ये एका माणसाचा पूर्ण वेळ जातो...
नाहीतरी आता यांच्याकडे वेळच वेळ असणार आहे. परतीच्या पावसाची थोडी फार आशा होती तीही मावळली. एक मुलगा चिडून सांगत होता, की पक्षासारख्या बोकाळलेल्या ह्या हवामान तज्ज्ञाना थोडं आवरायला पाहिजे. ते ज्या कॉन्फिडन्सने सांगतात त्यामुळे भोळे भाबडे शेतकरी फशी पडतात. अलनिनो बीलनीनो काही नाही, या वर्षी चांगला पाऊस आहे असा यांचा अंदाज होता, म्हणून शेतकऱ्यांनी बिनधास्त बियानं खते घेतली आणि आता हे असं झालंय. बरं यांचे व्हिडिओ येतात पुढील चार दिवस धो-धो पाऊस पडणार आमचे लोकं पुन्हा भेटणार नाही म्हणून खतं घेऊन बसले. काय करावं. पाऊसच नाही पडला. घरात तसंच खत पडून आहे. बरं तालुक्यात सगळ्या मोठं-मोठी दुकानं याच गावात आहेत. पण काय करणार.. करावं तरी काय... आता सगळ्यांचे सूर
नकारात्म लागत असतानाच चहा-पाणी झालं आणि माऊली म्हणाले चला आमच्या गावचं कामं पाहु.. आणि आम्ही तळ्यातल्या मारोतीकडे निघालो. पिकाची अवस्था तर अजून भयंकर दिसत होती. कुणीच माणूस शेतात नाही. चार-दोन शेळ्यावाले तेवढे दिसले. गावापासुन एक-दीड किलोमिटर आल्यावर लक्षात आलं- आता माती संपली, थेट खडक, काळा पाषाण सुरू झाला. माणसाच्या डोक्यावरचे केस जावेत आणि चकचकीत त्वचा दिसावी असं शिवार... मध्येच कुठंतरी खडकावर दहा-पाच इंचाचा मातीचा थर. लडाखमधील लेह किंवा सियाचीन सारख्या मायनस डिग्री तापमानात शस्त्र हातात घेऊन देश संरक्षणासाठी उभ्या असलेल्या सैनिकाइतकाच चिवट वाटला इथला शेतकरी. मूठभर मातीत आभाळातून पडणाऱ्या दोन थेंबांमध्ये घामाचे चार थेंब मिसळून एका दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराजाचा वारस इथे पिढ्यान् पिढ्या तग धरून आहे याचं कौतुक वाटलं.
आपल्याकडे प्रत्येक गावाचं एक दैवत असतं. ते त्या गावचं स्फूर्ती केंद्र असतं. नाही तर अशा आतबट्ट्याच्या धंद्यात माणसं टिकतात कशी... हा तळ्यातला मारोती यांच जगण्याचं आशादायी स्फूर्तिस्थान. गावातल्या आणि परिसरातल्या ऊर्जेने तरुण असणाऱ्यांनी मिळून या मारोती भोवताली खडकावर बाहेरून माती आणून झाडं लावली. ते कुठल्याही एक कोटी वृक्ष लागवडीचा हिस्सा नाहीत. बहुतेक साठ सत्तर एक्करवर असावा हा परिसर. त्यातली बरीच झाडं वयात आली. पण आता माणसांनाच प्यायला पाणी नाही.. लोक सहभागातून सत्तर ऐंशी लाख रुपये खर्च करून लावलेली झाडं भर पावसाळ्यात सुकायला लागली.. हे दाखवत दाखवत बोलताना माउलीचा घसा सुद्धा कोरडा पडला होता. दोनशे मिलि लघवी केल्यावर ती साफ करण्यासाठी एका फ्लश बरोबर पाच लिटर पाणी उडवणाऱ्या समाजाची जास्त काळजी व्यवस्था घेते, तेव्हा इथं जन्मून आपलंच चुकलं ह्याची जाणीव अजूनही ह्या माणसांच्या मनाला शिवली नाही, याचं आश्चर्य वाटतं. त्यांचा निरोप घेऊन निघालो. भारतात दडलेला इंडिया बघायला. तुलना करायची म्हणून श्रीमंत विरूध्द गरीब, छोटे विरुद्ध मोठे, बागायतदार विरुद्ध कोरडवाहू, सरंजामदार विरुद्ध सामान्य...
------
डॉक्टर सूरज यांना विचारलं गंगथडीचं (गोदा पट्ट्यातलं) एखादं गाव सांगा. डाव्या कालव्याच्या आणि बंधाऱ्याच्या मधला पट्टा. त्यांनी टाकळीचे माजी सरपंच डिगंबरराव आर्दड यांच्याशी संपर्क साधून भादलीच्या अशोकराव तौर यांचा नंबर दिला. अशोकरावचा फोन डायल केला की लगेच ट्रु कॉलर वर देशमुख आलं. मला करेक्ट पार्टी मिळाल्याचा आनंद झाला. मला तुलनाच करायची होती, त्यामुळे बरं वाटलं. मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांना डिगुनानाचा अगोदरच फोन गेला होता. गुगलवर भरोसा न ठेवता मी त्यांनाच रस्ता विचारला. अशोक दादांनी सांगितलं नाथनगरवरून टकाटक रस्ता आहे. नाथनगर म्हणजे जसं दक्षिण कोरियातल साँगडो नावाच नवीन बसवलेलं अत्याधुनिक शहर आहे, तसं इकडचं नाथनगर. मागच्या तीस-चाळीस वर्षांपूर्वी राजा-टाकळी, मूर्ती, ऊक्कडगाव, गुंज, शिवणगावच्या शिवेवर दुष्काळी भागातून येऊन बत्तीस नंबर चारीवर नव्यानं बसवलेलं गावं.(पूर्वीची गावं नदीच्या कडेला बसत. हे गाव चारीच्या कडेला वसलेलं आहे.) जायला यायला खूप लांब म्हणून सगळ्याच गाववाल्यांनी त्यांना जमिनी विकलेल्या. तिथंच हे वस्तीचं रूपांतर गावात झालं. भादली तिथून पाच किलोमीटर. दादांनी सांगितला अगदी तसाच टकाटक रस्ता. एका वेळी फक्तं दोनच चाकं खड्ड्यात जातात. उर्वरित दोन रोडवर. खड्ड्याचा आकार थोडा लहान होता. त्यात पाइपलाइनचे खड्डे जागोजाग. समोरून येणाऱ्या वाहनाला जो पहिले आप म्हणेल तोच पुढे सहीसलामत जाऊ शकतो, नाही तर घासाघासी किंवा भांडण अटळच, एवढा अरुंद रस्ता. पाऊलवाटेला डांबर टाकलं की काय असं वाटावं. तिथली घरं नजरेत भरावी अशी.
नाथनगर सोडून मी भादलीच्या दिशेने निघालो तर वाटेत ऐतिहासिक वारसा सांगावा अशी नावं दिलेले ओळीने तीन ढाबे लागले. तेही अशा जंगलात? पण मन लगेच तयार झालं. या लोकांनी थोडंही मनमौजी जगायचं नाही का? त्यांनाही कधीतरी जगावं वाटत असेलच ना? पांढरपेशी नाही का रविवारी झाडुन पुसुन सगळं घरदार घेऊन बाहेर जेवायला जात. इथं तर बिचारे पुरुष मंडळीच जातात. तेही मोजकेचं जण. अशी मनाची समज काढून मी पुढे निघालो तर पुढे डांबर, खडी, मुरूम सगळचं गायब झालेलं. आता मात्र एका शेजारी एक यावेत इतके दाट खड्डे. तसा या दशकात भारतात विविध भाषांमध्ये समानार्थी विक्रमी वापरलेला शब्द जर कुठला निघेल तर तो खड्डे हा. खर तर नागरीपेक्षा समान खड्डा कायदा जास्त प्रभावीपणे राबवला तर शारीरिक आणि मानसिक वेदना कमी होतील. मी आता खड्ड्यांनी विचलीत केलेलं माझं लक्ष रोडवरून आजुबाजूच्या शेताकडे वळवलं. दो तरफा उसाची, मध्ये मध्ये सोयाबीनची आणि कापसाची हिरव्या रंगात काव मिसळावी तशी हिरवट तपकिरी रंगाची शेतं. एखाद्या स्पेशल तज्ज्ञाकडे जसं एकाच रोगाचे रूग्ण येतात आणि सगळे सारखेच वाटतात तशी रोगमल पिकं दिसत होती. सगळ्याच पिकांची वाढ खुंटलेली. रस्त्यानं फारशी माणसं दिसत नव्हती, कारण जिल्ह्याची सरहद्द असलेलं हे गाव गोदावरीच्या काठावर असल्यानं हे गाव ओलांडून येणारा जाणाराची संख्या शून्याजवळ. चुकून एखाद्या माणसाचा रात्रभर शेतातल्या मातीत पाय फसला तर त्याला कोंब फुटतील, अशी काळीची जमीन. अतिशयोक्तीचा भाग सोडला तर फेकलं तरी उगवेल अशी कसदार माती.
मी भादलीत पोहोचलो. अशोकदादा दारातच उभे होते. बैठकीत अगोदरच मंडळी जमली होती. मी आत डोकावलं तर झेडच्या ऐवजी सगळे जेनएक्स जमलेले. जवळ जवळ सगळ्यांच्या कपाळाला गंध आणि गळ्यात माळ. चेहऱ्यावर रापलेपण. मी विचारलं पाण्याची काय स्थिती आहे? दादा बोलले सगळी कडून पडतुय फक्त आम्हालाच सोडलं. म्हणलं गोदावरीला पाणी कसं आहे?. मदन तौर सांगू लागले, “थेंब नाही. आमच्या गावावर होणारा बंधारा चार-पाच किलोमीटरवर नेहला आणि खाली गुंजाला होणारा बंधारा सादोळ्याच्या लोकांनी खाली नेहला.” मी म्हंटलं, “तसं कसं?” तर ते म्हणले, ‘‘सादोळकर मेळ्यानं ऊठले अन् अजितदादाकडं जाऊन बसले. त्यांचं वजन जास्त पडलं. त्याच्यामुळं आमच्या गावाचा बंधारा खाली लांबला अन् वर दोन बंधाऱ्यातलं अंतर चांगल बारा पंधरा किलोमीटर पडलं.’’
या गावाला पैठण डाव्या कालव्याची बत्तीस क्रमांकाची वितरिका, पण मुख्य कॅनॉल पासुन वळसे घालतं चांगल वीस किलोमिटरचं अंतर कापून येते. फक्त वितरीका तेवढी आली, पाणी वरच आटते. त्यात तिच्यात मुलूखभर झाडं-झुडपं. वाळु ऊपशाचा फायदा सांगणारे नवनाथ चौधरी म्हणाले, ‘‘नदीतली वाळु ऊपसुन नेहल्याने झालेल्या खड्ड्यामुळे मागं गोदावरीला जे पाणी सोडलं त्यानं खड्डे तेवढे भरले. पण लाईट नसती. काय करणार..वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, सगळा नन्नाचा पाढा.’’ कैलास तौर सांगत होते, ‘‘हजार बाराशेचं शिवार असेल. स्वतःची तीन एक्कर जमीन आहे. काही ठोक्याने (भाडेतत्त्वावर) तर बटाईने काही करून कसंतरी पोट भरायचं.’’
भेटलेल्या शेतकऱ्यांत जवळ जवळ सगळेच अल्पभूधारक. जमिनीचे भाव विचारले तर एकरी वीस-पंचविस लाखा पर्यंत गेलेत. पण गावातलं कुणीच घेणारं नाही. सगळे बाहेरचे. बाराशे एकराच्या शिवारातली शंभरेक एक्कर जमीन बाहेरच्या लोकांनी घेतली.. खरं तर हे खूप विदारक चित्र आहे. एकूण गावाचा विचार केला तर त्याच्या पाचशे-सातशे वर्षाच्या आयुषात ‘क्या पाया क्या खोया’ तर शंभर एकर जमीन गमावली. गोदावरीच्या पट्ट्याचा खूप मोठा इतिहास आहे. सुपीक भूभागावर वसलेली ही वस्ती अतिशय सधन. ऊक्कडगाव नावाच्या गावात हेमाडपंथी ऊत्तरेश्वर महादेवाच मंदीर आहे. हे गाव तेराव्या शतकात वसलं असावं. या गोदापट्ट्यात एकाच आडनावाची भावबंदकी साडेबावीस गावात बसलेली. त्यातल्या ह्या पाच-सात गावात अलीकडं तीस-चाळीस वर्षात येऊन एक नाथनगर सारखं स्वतंत्र गाव वसलं. तेही बहुतांश दुष्काळी भागातून आलेल्या लोकांनी. सोप्या भाषेत ही पाच-सात गावं शेपुटखाऊन जगली म्हणायला हरकत नाही. एखाद्या देशाने एखादा भू-भाग विकावा तसा या पाच-सात गावांनी मिळून एका गावाचं शिवारच विकलं म्हणायला हरकत नाही.
भास्करराव सांगत होते, “बहात्तर पेक्षा भयान दुस्काळ हाई हेव. आहो त्या साली गोदावरी वहात होती यंदा कोरडीठाक पडली.” प्रामुख्यानं पावसावर येणारं पीक म्हणजे कापूस. “सरासरी सात-आठ क्विंटलचा उतारा येतो, पण यंदा एक्करी कुंटलभर कापुस पिकवणाराचा सत्कार करावं लागलं. सात-सात फवारण्या केल्यात. बळजबरी हाईनाही ते पाणी देऊन वाढ केली कापसाची (जीम करणाराला जसा सप्लीमेंट प्रोडक्ट मधुन खुराक देतो तसा) पण ते पण खंगलेत. डुक्करं खालुन खातेतं अन् रुई वरून खाती. हरणं, मोरं, वान्हेरं (काळ्या तोंडाची वानरं) सगळेच मिळुन फस्त करतेत...” इंदरराव सांगत होते.
ऊसाला चाळीस-पंचेचाळी हजार रुपये खर्च झाला, पण वाढच नाही. दहा-वीस कांड्याच्यावर कांडे नाहीत. सगळे रोग पडलेत. पाचशे रूपये एक्कर ड्रोन फवारणीच भाडं हे.. औषध वेगळंच, मजूर एक पोतं फेकायला शंभर रूपये घेतंय. बिडी वढुस्तोवर टाकून होतंय. एक्करी पंधरा पोते.फक्तं घालणाराची मजुरी दीड हजार.. ऊसाला किमान एक्करी पंचेचाळीस हजार रूपये खर्च झालाय. आणि वीस टनाच्या पुढं उत्पादन होत नाही. बरं हा सुरूचा. खोडवा तर दहा टनाच्या पुढं जात नाही... इंदररावांनी सांगितलं.
बोलता बोलता विषय सौर पंपावर आला. ते दुखण्यापेक्षा इलाज भयंकर झालाय. पाऊस नकाका पडायना पण ढग नित्येनेमानं ड्युटी करतेत. तीन महिन्यांपासून सूर्यदर्शनच नसल्यान त्याचा काय ऊपयोग? सौरची तक्रार जरा अजून गंभीर आहे. विज मंडळाचा भार कमी करण्यासाठी ही योजना आहे की सरकारला स्वतःची जिम्मेदारी झटकून पळून जाण्यासाठीची युक्ती आहे, हेच कळत नाही. जिथे सौरपंप बसला तिथली लाईट हळुहळु कट केली जाते (पोल तारा गुंडाळण्यासह ), म्हणजे एकदा सौर दिला की विज मंडळाच्या लाईटची गरज नाही. बरं शेतकऱ्यानं सौर पंपाचे पैसे भरले की आपल्याला ज्या निवडायच्या त्या कंपन्या कधीच उपलब्ध नसतात. काही सुमार पण काही लोकांच्या मर्जीतल्या कंपन्या उपलब्ध. म्हणजे आपल्या निष्क्रीय मुलाचं लग्न व्हावं म्हणून चुनचुनीत होतकरू मुलगा लपवून ठेवायचा असा कार्यक्रम. त्यात पैसे भरल्यानंतर वर्षवर्षं पंपच येत नाही. त्यात पंप एकाचा, सौरच्या पाट्या दुसऱ्या कंपनीच्या, बसवणारे तिसरेच. किमान पहिलं सामान शेतकऱ्याकडं येऊन पडल्यावर शेवटचं सामान येऊन पंप बसवायला तीन-चार महिने तरी लागतात. त्यात ते सगळे सरकारचे जावई. त्यामुळे तक्रार कुणाकडे करणार? सासरे घेऊन देऊन मिंधे. पंप सुरू झाल्यावर बिघाड झाला तर मग मात्र तुमच्या पायाकडूनच आली समजा. तक्रार घ्यायला महिना आणि दुरुस्तीला सहा महिने. खरिपाच्या पेरणीत बंद पडलेला पंप रब्बीच्या पेरणीत दुरुस्त करून मिळाला तर तुम्ही जिंकले..
पुन्हा या शिस्टिमच्या साथीला चोर धावून येतात. सौर पंपाचे केबल चोरून ने, मोटार चोरून ने. कुठे कुठे आणि कुणाकुणाशी लढणार तुम्ही? मग तर कपाळावर मारून घेण्याच्या पलिकडे तुम्ही काहीच करू शकत नाहीत. पण आता पारावर, ओट्यावर बसून हे असले गाऱ्हाणे ऐकुन फ्रस्टेड होण्यापेक्षा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला देश किती प्रगती करणार आहे, हे साहेबाच्या तोंडून ऐकत खुशाल टिव्ही पुढं बसावं वाटतं. नाहीतर एखादं कीर्तन ऐकून कर्माचे फळ म्हणजे काय ते भोगावं.
मला बऱ्याच वेळची खटकत होती ती जेनझीची उपस्थिती. मी शाळेकडे वळलो. गावात जिल्हा परिषदेची शाळा. मास्तर चांगले आहेत म्हणून कळलं. गावात चार- पाच मुलं एम.बी.बी.एस झाली. एका लेकराच्या बापाने तर आख्खं रान विकलं अन् पोराला एम.डी केलं. पण सगळ्याचं बापांकडं विकायला थोडंच असतंय? बँकेच्या कर्जाबद्दल आख्खं गाव एकमेकांच्या जामीनात अडकलेलं. या धंद्यावाल्याचं भारी असतं, कर्ज देताना प्रॉपर्टी तारणं ठेवायची आणि वरून दोन जामीनदार घ्यायचे. गावा-गावात आणि नात्यात दरवर्षी भांडण लावून देण्याचं कामं बँका करतात. दहा लोकांनी कर्ज काढलं तर वीस जामीनदार म्हणजे तीस लोकं गुंतले. बरं तरी दुःखातही विनोद बुद्धी जिवंत ठेवणारे मामा म्हणाले, “बरं तरी बँकाना लग्न जमवण्याचा परवाना नाही. नाहीतर गॅरंटर लोकायलाच नांदायला पाठवलं असतं.” दुःख विसरायला यांच्याकडे गप्पाशिवाय दुसरं माध्यम नाही. मला इथल्या जेनझीला भेटायचं होतं, पण जवळ जवळ सगळ्यांची मुलं काहीतरी वेगळा धंदा शोधायला गेलेली.. खरं काय करणार? अडीच आणि तीन एक्करात माणसांचं ना पोट भरतं ना पाठ झाकते.
---------
सरकारी मदतीवर डोळे लागून राहिलेल्या भाबड्यांना कसं खिशात घालायचं हे सरकारी धुरीणांना चांगल कळतं. शब्दांच्या जाळ्यात गुरफटायचे, एकीकडे सर्व कर्जमुक्ती केली म्हणायची आणि दुसरीकडे बँकाची वसुली बंद करणार म्हणून सांगायचं, यातलं नेमकं खरं काय हे त्यांनाच माहीत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीस माफ. शाळा कॉलेजच्या फिसचं काय? त्यांच्या हॉस्टेलचं काय? त्यांच्या दवाखान्याचं काय? शेतसारा माफ करून काय होणार? आमच्या लहानपणी कुठलातरी एक हिंदी सिनेमा आला होता. त्यातला तो नाना स्पॉट नावाचा खलनायक म्हणतो, “मुर्देका मुंढण करणेसे ऊसका बोज हलका नही हो जाता.” तो सिनेमा तेवढ्याच डायलॉग साठी सरकारला दाखवायला पाहिजे. चारा छावन्या देऊन वंचित कार्यकर्त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था करणार, गो-शाळा वाल्यांची चांदी. दुष्काळी कामं काढणार, मजुरांसाठी ठिक पण स्वतःच्या रानात कामं करणारांच काय ? पाणी टँकर या सगळ्या गोष्टी फार्स आहेत. हे आम्हाला कळलंय. तुम्ही केलेल्या घोषणेचं तुम्हाला आणि तुमच्या वाहकांना कौतुक. पण आमचं काय? आप्पा पोट तिडकिनं सांगत होते, “आहो साहेब, ह्या सगळ्या योजना मंजी तीरडीचे बांबु, गाडगं, सुतळी ईकणाऱ्या दुकानदारां सारखं काम झालंय सरकारी लोकायचं. ते कसं गिऱ्हाईक आलं कि खुष होतंय, तशी गत हे.”
त्यांचे विचार ऐकून मनात आलं हजारो वर्ष उगीच नाही टिकले हे. यांना भोळं-भाबडं समजणं चूक आहे. कित्येक राजे आले, शाह्या आल्या आणि गेल्या पण हे टिकून आहेत. हे सरकार नावाच्या यंत्राला जरी वाटत असलं की आपण यांना बोलून, ढकलून गुंडाळतोय पण यांनीच सर्वांना गुंडाळलंय. म्हणून तर आजही ते टिकून आहेत. इथं शासन करायला आज पावेतो कित्येक शासक आले-गेले, पण कुणाचाच लवलेष शिल्लक नाही.. एकाधाच असतो यांच्या काळजात जपलेला राजा शिवाजी... आपण शिवाजी व्हायचंय की मोगल, हे ज्या त्या सरकारांनी ठरवायचं. रयतेसाठी काम केलं तर शिवराय होता येतं आणि बगलबच्चांसाठी काम केलं तर आपोआप मोगलांच्या दावणी उभा करतात लोकं. आणि मूल्यांकन स्वतः नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत नाही तर जनमानसाच्या मनःपटलावर होत असतं.
विचार करत करत बाहेर पडलो तर आविष्कार आणि सिद्धू भेटले. विशीतली मुलं. सिद्धू बुरंगेच्या पाठीवर फवारा होता. मी थांबून विचारलं की काय फवारायला तर तो म्हणाला कापूस. मी- कितवी फवारणी? असंन सातवी, तो म्हणाला. मी म्हटलं खर्च, तर तो म्हणला आपलं दुखायल्यावर खर्च मोजत बसतो का आपण.. इतक्या बारीक गोष्टी पहात गेल्यावर तर माणूस चक्रम होईल.. आणि कळलं शेती अजून का जिवंत आहे..
--------
(लेखक रंगकर्मी आहेत.)