‘‘ स्वतःचा शोध, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, मानसिक ताण, सामाजिक विषमता आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेचे प्रश्न ‘जेन-झी’ समोर उभे आहेत. या प्रश्नांकडे पाहताना संतसाहित्य केवळ भक्तीचा विषय न राहता आत्मसंवाद, विवेक, कृतज्ञता, प्रयत्नशीलता आणि मानवतेचा विचार देणारे साहित्य म्हणून समोर येते. आजच्या ‘जेन-झी’ला संतांचे विचार नव्या संदर्भात समजून घेण्याची गरज आहे,’’ असे मत संतसाहित्याच्या अभ्यासकांनी चर्चासत्रामध्ये व्यक्त केले.
‘जेन-झी’च्या काळामध्ये संतसाहित्याची गरज आहे का?’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुकुंद दातार, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. अभय महाराज टिळक आणि फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. रूपाली शिंदे सहभागी झाल्या होत्या. डॉ. स्वामिराज भिसे यांनी चर्चासत्रात समन्वय साधण्याचे काम केले. डॉ. दातार म्हणाले, ‘‘संतांच्या विचारांमध्ये कृतज्ञता आणि प्रयत्नशीलता होती. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी त्यासोबत नैतिकता, कृतज्ञता आणि मानवतेची जाणीवही असली पाहिजे. ज्या वयात आजची ‘जेन-झी’ आहे, त्या वयात अनेक संत हे कीर्तन आणि समाजप्रबोधन करत होते. त्यामुळे तरुणांनी स्वतःचा शोध घेताना आपली उद्दिष्टे काय आहेत, आपण त्यासाठी किती प्रयत्नशील आहोत, याचा विचार करावा.’’
-------
प्रतिक्रिया
संतांनी ज्या वयामध्ये साहित्य निर्माण केले, त्याच वयाचा विचार केला तर त्यांच्या काळातही आजच्या तरुणांसारखे अनेक प्रश्न होते. संत ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांवर तसेच संत तुकारामांवर कठोर टीका झाली. मात्र त्यांनी त्या वयातही अनेक प्रश्नांना धैर्याने सामोरे जात विचार मांडले. आजच्या ‘जेन-झी’समोर मानसिक ताण आणि अनेक प्रकारचे दबाव आहेत. मात्र या पिढीने त्यातून प्रेरणा घेऊन प्रश्नांना सामोरे जाण्याची प्रवृत्ती विकसित केली पाहिजे.
- ह.भ.प अभय महाराज टिळक
मनोरंजन खासगी झाले असून संतसाहित्यावर आधारित कार्यक्रमही अनेकदा अभिरुचीपूर्ण मनोरंजनाच्या कार्यक्रमांकडे झुकताना दिसतात. समाजमाध्यमांचा प्रभाव वारकऱ्यांवर झाला आहे. त्यामुळे काही वेळा कीर्तनाचे स्वरूप मनोरंजनाकडे झुकलेले दिसते. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे शिवीगाळ नव्हे. संतांनी केलेल्या बंडखोरीचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. धर्मचिकित्साही संतपरंपरेचा महत्त्वाचा भाग आहे.
- प्रा. डॉ. रूपाली शिंदे, मराठी विभागाच्या प्रमुख, फर्ग्युसन महाविद्यालय
फोटो क्रमांक ः PNE26W65369
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.