पाचगणीच्या घाटजाई शहर विकास आघाडीची नोंदणी
नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह १५ अपक्ष नगरसेवकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
भिलार, ता. ३० : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह १५ अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत श्री घाटजाई शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. या नवनिर्वाचित १६ सदस्यांनी आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन आपल्या आघाडीची अधिकृत नोंदणी पूर्ण केली. या नोंदणीमुळे पाचगणी नगरपालिकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत घाटजाई शहर विकास आघाडीची सत्ता अधिकृतपणे प्रस्थापित झाली आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट करण्याचा निर्धार या वेळी सर्व सदस्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया पार पडताना खासदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाहीच्या प्रक्रियेनुसार, आघाडीची अधिकृत नोंदणी ही सत्तास्थापनेतील महत्त्वाची तांत्रिक बाब असून, यामुळे आता पालिकेच्या कामकाजाला कायदेशीर गती मिळणार आहे.
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे, नगराध्यक्ष दिलीप बगाडे नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, महेश खांडके, आकाश बगाडे, अमित कांबळे यांसह माधुरी कासुर्डे, परवीन मेमन, सुप्रिया माने, विमल भिलारे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने आदी उपस्थित होते.
आघाडीच्या नोंदणीनंतर खासदार पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधला. पाचगणी हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने या शहराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष आणि आघाडी अध्यक्षांनी शहराच्या प्रलंबित कामांसाठी मोठ्या निधीची मागणी केली असता, ‘‘तुम्ही शहराच्या शाश्वत विकासाचा ठोस आराखडा तयार करा, निधीसाठी मी आणि मकरंद पाटील कुठेही कमी पडणार नाही,’’ अशी ग्वाही खासदार पाटील यांनी या वेळी दिली.
तत्पूर्वी पाचगणी पालिका सभागृहात नगराध्यक्ष बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. पाचगणीकरांनी मोठ्या विश्वासाने ही सत्ता हाती सोपवली असून, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हेच आपले प्राथमिक ध्येय असल्याचे बगाडे यांनी स्पष्ट केले. सर्व सदस्यांनी वज्रमूठ बांधून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा ठराव यावेळी संमत केला. शेखर कासुर्डे, मंत्री पाटील आणि राजेंद्र राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीत एक स्थिर आणि पारदर्शक प्रशासन दिले जाईल. केवळ रस्ते किंवा पाणी नव्हे, तर तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याला आमचे प्राधान्य असेल.
07051
सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना नोंदणी कागदपत्रे सुपूर्त करताना नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे शेजारी नितीन काका पाटील व इतर नगरसेवक दुसऱ्या छायाचित्रात आनंद व्यक्त करताना सर्व नगरसेवक. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)