घाटघरला विक्रमी पावसाची नोंद
आतापर्यंत ४१०३ मिलिमीटर पाऊस; भंडारदरा, नीळवंडे धरणे भरली
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या घाटघर परिसरात यंदा आतापर्यंत पावसाची ४ हजार १०३ मिलिमीटर नोंद झाली आहे. भंडारदरा, नीळवंडे धरणे भरून पाणी विसर्ग सुरू आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भाग वगळता जिल्ह्यातील अन्य भागात मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, नीळवंडे धरणांचे पाणलोट क्षेत्रात यंदा महिनाभराने उशिरा पाऊस सुरू झाला. त्यानंतर मात्र सतत जोरदार पाऊस झाल्याने ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा व साडेआठ टीएमसी क्षमतेचे नीळवंडे धरण महिनाभरापूर्वी भरले. त्यामुळे पाणी विसर्ग सुरू आहे. हरिश्चंद्रगड परिसरात सव्वीस टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, आतापर्यंत पावणे पंचवीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या घाटघरला यंदा आतापर्यंत विक्रमी ४ हजार १०३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ रतनवाडी येथेही सुमारे ३ हजार ७७१ मिलिमीटर, पांजरे येथे २ हजार ६४९ मिलिमीटर, भंडारदरा येथे २ हजार ३४३ मिलिमीटर, वाकी येथे १ हजार ९६० मिलिमीटर, नीळवंडे येथे ९२० मिलिमीटर, तर अकोले येथे ४४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आढळा धरण क्षेत्रातही पावसाची नोंद सुरू आहे. अजूनही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे.
पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे मुळा धरणात पाण्याची आवक वाढत आहे. नीळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरण जवळपास पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करीत असून, सायंकाळच्या सुमारास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
चौकट -----
जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा
अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील पाऊस सोडला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अन्य भागात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अल्प पावसावर खरीप हंगामातील पिके जोरदार आहेत. मात्र पाणी साठवणूक करणारा पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.