घोडेगाव, ता. १ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सालोबा मळा येथील शेतकरी यांना मागील तब्बल ८ दिवसांपासून १०० केव्हीचे ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने सुमारे ३० हेक्टर क्षेत्रावरील पिके जळून खाक झाली आहेत. शेतीमालाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही दाहीदिशा भटकावे लागत आहे. महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सालोबा मळ्यातील १५ ते २० शेतकरी त्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी पिके जगवण्यासाठी आणि जनावरांची तहान भागवण्यासाठी धडपड करत आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या ढिम्म कारभारामुळे आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे. वीज नसल्याने विहिरी आणि कूपनलिकांवरून पाणी उपसणे अशक्य झाले आहे. डोळ्यांसमोर उभी पिके करपून जात आहेत. या गंभीर समस्येबाबत बाधित शेतकऱ्यांनी घोडेगाव विद्युत उपविभागीय कार्यालय येथे संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या उपकार्यालयात सध्या १०० केव्हीचे डीपी शिल्लक नसल्याचे सांगितले.
‘‘मंचर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे नवीन डीपीची मागणी नोंदवण्यात आली आहे. तेथून डीपी उपलब्ध होताच तात्काळ बसवून वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल,’’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, मंचर येथील मुख्य कार्यालयाकडून वेळेवर डीपी का उपलब्ध करून दिले जात नाही? असा संतप्त सवाल बळीराजा विचारत आहे. मंचर कार्यालयाच्या या दिरंगाईमुळे ३० हेक्टरवरील शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले असून, महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
गेल्या ८ दिवसांपासून महावितरणचे उंबरठे झिजवूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. ३० हेक्टरवरील पिके वाळून गेली आहेत, जनावरे पाण्यावाचून तडफडत आहेत. मंचर कार्यालयाने तात्काळ डीपी उपलब्ध करून दिले नाही, तर महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,’’ असा इशारा उपसरपंच स्वप्निल घोडेकर, तुकाराम घोडेकर, गणेश घोडेकर, विठ्ठल घोडेकर, दिलीप झोडगे, भगवान घोडेकर, प्रकाश घोडेकर, युवराज घोडेकर, शिवाजी घोडेकर, महेंद्र घोडेकर, भगवान भास्कर, महादेव घोडेकर, रोहिदास घोडेकर यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
मंचर येथे डीपीची मागणी नोंदवली आहे .उद्या डीपी आल्यानंतर काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-राजू भोपळे, उपविभागीय अभियंता, घोडेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.