टाकळी हाजी, ता. २२ : घोडनदीवरील टाकळी हाजी, आमदाबाद, फाकटे, रोहिलेवाडी यांसह विविध ठिकाणचे बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे घोडनदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असून, नदीला पाणी कधी येणार, याची शाश्वती नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
घोडनदीकाठावरील काठापूर, पिंपरखेड, फाकटे, चांडोह, साबळेवाडी, कवठे येमाई, रावडेवाडी, मलठण, निमगाव दुडे, आमदाबाद, डोंगरगण आणि आण्णापूर या गावांतील नागरिकांना आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी नदीकाठच्या बंधाऱ्यांमधील विहिरींचा आधार घेतला जातो. मात्र, बंधारे कोरडे पडल्याने या योजनांच्या पाणीपुरवठ्यावरही संकट निर्माण झाले आहे.
घोडनदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा करून शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेत उपसा सिंचन योजना उभारल्या. या योजनांमुळे दुष्काळी भागाला मोठा आधार मिळाला. ऊस, कांदा आणि डाळिंबासारख्या पिकांच्या बागा फुलल्या. मात्र, यंदा डिंभे धरण भरलेले असतानाही परिसरात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाण्याची बचत करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, शासनाने संभाव्य टंचाईचा गांभीर्याने विचार करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीसाठीही पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
सिंचनाचे नियोजन कोलमडले
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शासनाने नदीत पाणी न सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नदीला पाणी कधी सोडले जाणार, याबाबत निश्चितता नसल्याने सिंचनाचे नियोजन कोलमडले आहे.
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची धडपड
पाण्याअभावी शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे विकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे रोपांना ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. दुसरीकडे, उभा ऊस पाण्याअभावी वाळण्यापूर्वी तो साखर कारखान्याला कसा पाठवता येईल, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. डाळिंबासह अन्य फळबागा वाचविण्याचेही मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
पाणीटंचाईत केबल चोरीचे दुहेरी संकट
एकीकडे पाणीटंचाईचे संकट तर दुसरीकडे शेतीपंपांच्या केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. पिंपरखेड येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी २० शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. या घटनेचा तपास लागलेला नसतानाच दसऱ्यापूर्वी पुन्हा काही शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या.
केबल चोरीच्या घटनांचा तपास लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त करत, न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
- देवराम ढोमे, शेतकरी, पिंपरखेड
00977
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.