पुणे

युवा दिन- डॉ. सतीश करंडे

CD

पान १२ - ११ साठी
-----------------------
स्लग ः जागतिक युवक दिन
------------------------------------
कष्ट करून मोठे होऊ! परंतु पर्याय कुठे आहेत?
------------------------------------------------
शिक्षण, नोकरी, उपजीविका, शेती आणि शेती प्रश्नांचा मोठा गुंता, लग्न न होणे अशा सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्ग चक्रव्हुवामध्ये अडकलेल्या अभिमन्यू सारखा वाटतो. त्यांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय अशी चर्चा सुरू करून त्यांच्या ऊर्जेला दिशा देणे हेच आपले व्यवस्था म्हणून कर्तव्य असले पाहिजे. परंतु तशी चर्चा सुद्धा होत नाही, हेच मोठे दुर्दैव!!
--------------------------------
डॉ. सतीश करंडे
---------------------
जगभरातील अर्थतज्ज्ञांची एक मान्यता अशी आहे, की कोणत्याही देशाला विकसित अर्थव्यवस्था व्हायचे असेल तर त्या देशांमधील लोकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. शेतीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते. म्हणजे आज शहरांमध्ये असणाऱ्या लोकांचे मूळ हे कधीतरी शेतीमध्ये होते. त्यांना उपजीविका साधनांचे पर्याय मिळतात आणि ते शेती सोडून शहरांमध्ये वास्तव्यास जातात. उपजीविका साधनांचे पर्याय हे चांगले शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग व्यवसाय अशा मार्गातून वाढत असतात. तशी प्रक्रिया देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्याला दिसून येते. आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर राज्याचे नागरीकरण जवळपास ५० टक्यांपर्यंत पोहचले आहे.
परंतु एक आकडेवारी अशी सांगितली जाते, की २०२० नंतर शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या ही देशपातळीवर सुमारे आठ कोटींनी वाढलेली आहे. त्याला जोडून दुसरी एक आकडेवारी अशी आहे, की एकूण पदवीधर झालेल्या युवा वर्गापैकी ५० टक्के युवकांनासुद्धा काम उपलब्ध नाही. काम उपलब्ध नाही, याचा अर्थ त्यांना केवळ नोकरी नाही असे नसून त्यांना उपजीविका साधनांचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पदवीधर झालेला ग्रामीण युवक अगदी पोलिस भरती, स्पर्धा परिक्षेची तयारी करतो, त्याचा नोकरीची शोध सुरू राहतो. त्यामध्ये अपयश आल्यानंतर त्याला उपजीविका करण्यासाठी कोणताही पर्याय राहत नाही. त्यामुळे तो शेतीमध्ये ढकलला जातो. त्या आठ कोटींमध्ये असे शेतीमध्ये ढकललेले अनेक युवक असतील. जर ते बागायती शेतीमध्ये गेले तर ठीक, परंतु कोरडवाहू शेतीमध्ये जाणे म्हणजे एका चक्रव्ह्युवामध्ये अडकणे असेच ठरते. त्यातून सुटका म्हणजे शहरात जाऊन किडा, मुंगी सारखे जीवन व्यतीत करणे. काही संघर्ष करतात, प्रयोग करतात त्याला साथ मिळाली तर यशस्वी होतात, नाही तर अपयश निश्चित मिळते. हे सर्व अपयश हे पर्याय नसल्यामुळे आलेले असते. चांगले शिक्षण उपलब्ध असणे, कौशल्ये विकास, विकासाला पूरक इकोसिस्टीम आकाराला येण्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, सिंचन सुविधा निर्माण करणे या मार्गाने पर्याय निर्माण होत असतात आणि ते सरकारचे काम असते.

कोरडवाहू शेतकऱ्यांची व्यथा ः
कोरडवाहू ग्रामीण भागातील युवकांची समस्या हा विषय आपण तुळशी (ता. माढा, जि.सोलापूर) या गावशिवारातील युवकांच्या उदाहरणावरून समजून घेऊयात. माढा तालुक्यामध्ये उजनी धरण तसेच तीन साखर कारखाने आहेत. म्हणजे उसाखाली मोठे क्षेत्र आहे. असे सर्व असताना तुळशी हे दुष्काळी गाव. काही वेळी शेतीला नव्हे तर पिण्याला आणि जनावरांनासुद्धा पाणी उपलब्ध नसते. या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन. नावावर शेती म्हणून शेतकरी, परंतु खरे शेतमजूर असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गावातील अनेक तरुण हे इतर गावांमध्ये शेतमजूर म्हणून कामासाठी जातात.
या गावातील महेश बोचरे हा तरुण, घरची तीन एकर शेती. मोठा भाऊ सिद्धेश्वर. महेश सध्या वाहन चालक म्हणून काम करतो. त्याला बीएससीच्या प्रथम वर्षानंतर शिक्षण सोडावे लागले. भाऊ सिद्धेश्वर यास परिस्थितीनुसार सातवीतून शिक्षण सोडावे लागले. महेश नववीत असताना वडिलांचा मृत्यू झाला. घरी तीन एकर शेती, परंतु सिंचनाची मोठी समस्या. अशा सर्व पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर यांना मजुरी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तर महेश याने शिक्षण सोडून ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना फळबागेतील मोठे कौशल्य, ते परिसरातील अनेक फळबागांची कामे कंत्राट पद्धतीने करून द्यायचे. त्यांना फळबागेतील उत्पादन वाढीचे सर्व तंत्रज्ञान आत्मसात झाले होते. मात्र पाणी टंचाईमुळे त्यांना स्वतःच्या फळबाग करता आली नाही. मुलांना चांगले शिक्षण देता आले नाही. थोडे पाणी असले असते तर भाजीपाला शेतीकरून गुजराण करता आली असती, मात्र तेवढेही पाणी नाही. म्हणजे कोणताच पर्याय नसल्याने दोघे भाऊ शेती आणि मजुरीमध्ये ढकलले गेले. सिद्धेश्वरला सातवीतून शिक्षण सोडावे लागणे आणि महेशला सुद्धा बीएससी पूर्ण न करता येणे याचे मूळ हे त्यांचे वडील कोरडवाहू शेतकरी असण्यात आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
कदाचित महेश इंजिनिअर सुद्धा झाला असता. ही भाषा केवळ जर-तरची नाही, कारण त्यांचे वडील शेतमजूर होते. त्यामुळे त्यांना शिक्षणावर खर्च करणे अजिबात शक्य नसणार, हे त्या गावातील इतर उदाहरणावरूनसुद्धा आपल्या लक्षात येते. आज ते दोन गायी सांभाळतात, त्यांना गाईची संख्या वाढवता येत नाही. कारण विकत वैरण आणून गाईचे संगोपन हे न परवडण्यासारखे आहे. त्याच बरोबर पेंड आणि इतर संगोपन खर्च सुद्धा वाढत आहे. त्या प्रमाणात दुधाचे भाव वाढत नाहीत. याचाच अर्थ, की त्यांचे पर्याय आक्रसत जात आहेत. त्यामुळे पुढच्या पिढीत सुद्धा त्यांचे शेतमजूर म्हणून असणे निश्चित होत आहे आणि ती निश्चिती करण्यामध्ये आपल्या व्यवस्थेचा अपयश हे मुख्य कारण आहे, असे नक्की म्हणता येतं. त्या गावात मागील दहा वर्षांमध्ये पाच तरुणांना सुद्धा चतुर्थ श्रेणी ते प्रथम श्रेणी अशी नोकरी मिळालेली नाही. काही तरुण भरतीची तयारी करतात. मात्र त्यामध्ये अपयश आले, की शेतमजुरी शिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहत नाही. गावात किमान दोनशे तरुण आहेत. की ज्यांचे लग्न होत नाही. सिंचन सुविधा असत्या तर त्यांना काही पर्याय उपलब्ध नक्की झाले असते. यावर काही जणांचे असे मत असेल, की अगदी कोरडवाहू भागातील सुद्धा मुलं क्लास वन अधिकारी होतात, नोकरी करतात. अशा अपवादांना उल्लेखून पुढे जाणे हीच फसगत आहे. त्या शाळेत शे पाचशे विद्यार्थी शिकत असतात आणि त्यातील एखादा क्लास वन झाला म्हणजे शिकण्यास गरिबी आडवी येत नसते, असे मानले जाते. परंतु व्यक्ति विकासामध्ये गरिबी किती प्रकारे आडवी येत असते, याचे मोठे संशोधन उपलब्ध आहे. परंतु आपल्याला अपवाद हे प्रातिनिधिक मानण्याची मोठी सवय झालेली आहे.
तुळशी गावातील रणजीत बोचरे हा दुसरा युवक, तो सुद्धा सध्या शेती आणि शेतमजुरी करतो. त्याची सुद्धा समस्या तीच, की शेतीला पाणी नाही. तो आणि त्याचा भाऊ तेजस, हे दोघेही शेतीमध्ये आहेत. तरुण असल्यामुळे त्यांनी द्राक्ष बाग लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळतील ही आशा. परंतु यावर्षी त्या गावांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे त्यांची चिंता खूप वाढलेली आहे. म्हणजे मी पाहिलेले स्वप्न भंगते, की काय असा घोर त्यांना लागलेला आहे. पाणी विकत आणून देण्याची तयारी त्यांना करावी लागेल. या गावातील अनेक शेतकरी शेजारच्या ऊस असणाऱ्या गावातून पाणी विकत आणतात. थोडक्यात शिकून मोठे होणे, शेतीत कष्ट करून मोठे होणे, ही दोन्ही स्वप्नं ते युवक बघू शकत नाहीत. हे व्यवस्था म्हणून आपले मोठे अपयश. असे अनेक रणजीत आणि महेश तुळशी गावात आहेत. गावाची शीव ओलांडली, की त्यांना समृद्धी दिसते आणि गावात गरीबी! समन्यायी पाणी वाटपाची चर्चा सुद्धा त्यांना ऐकू येत नाही. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम आणि उत्पादक वापर हा पर्याय त्यांना मिळणे आणखी कठीण.
आज जागतिक युवक दिन! देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती असते असे मानले जाते. त्या युवकांची अशी अवस्था झाली आहे ,की मला कष्ट करून मोठे व्हायचे आहे, हे स्वप्न सुद्धा ते पाहू शकत नाहीत. त्या आठ कोटींमध्ये अशा युवकांची संख्या मोठी असणार आहे हे नक्की!
--------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. सतीश करंडे, ८८०५२९२०१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

Indian Student Crime: २० वर्षीय भारतीय तरुणानं गर्लफ्रेंडला संपवलं, अमेरिकेतून जर्मनीला पळाला; विमानतळावर उतरताच अटक

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT