पुणे

वजन कमी करणारी औषधे घेताय? जरा थांबा...!

CD

विशेष
००००००
वजन कमी करणारी औषधे घेताय? जरा थांबा...!
- डॉ. प्रणिता अशोक
००००००
लीड-
जीएलपी-१ रिसेप्टर औषधे म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक शक्तिशाली शस्त्र नक्कीच आहे, परंतु ते अज्ञानाने वापरल्यास, ती एक दुधारी तलवार ठरू शकते. ‘वजन कमी होणे’ आणि ‘निरोगी होणे’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्नायू आणि पोषण ययांच्याकडे दुर्लक्ष करून कमी केलेले वजन शरीराला अपंगत्वाकडे नेऊ शकते.
००००००

आज जागतिक स्तरावर लठ्ठपणा आणि अनियंत्रित मधुमेह या समस्यांवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात एका नवीन क्रांतीची चर्चा आहे, ती म्हणजे जीएलपी-१ रिसेप्टर अगोनिस्ट (जीएलपी-१ Receptor Agonists) गटातील औषधे. सध्या या औषधांनी जगभरातील वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हॉलीवूडच्या कलाकारांपासून ते गल्लीबोळातील सामान्यांपर्यंत या औषधांची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. परंतु, ही औषधे जितक्या वेगाने वजन कमी करतात, तितक्याच वेगाने ती शरीरातील महत्त्वाच्या पोषणमूल्यांचा आणि स्नायूंचा ऱ्हास करतात, या वास्तवाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या औषधांच्या वापरामागील वैद्यकीय विज्ञान, त्यांचे दुष्परिणाम, त्यांच्यामुळे शरीराची होणारी हानी आणि योग्य पोषणाचे महत्त्व समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जीएलपी-१ औषधे कशी काम करतात?
आपल्या शरीरात आहाराचे पचन होताना लहान आतड्यांमधून जीएलपी-१ (ग्लुकेगॉन-लाइक-पेप्टाइड-१) नावाचे संप्रेरक स्रवते. हे संप्रेरक मेंदूला ‘पोट भरले आहे’ असा संदेश देते आणि स्वादुपिंडाला इन्सुलिन स्रवण्यास प्रवृत्त करते. काही औषधे या नैसर्गिक संप्रेरकाची हुबेहूब नक्कल करतात.
या औषंधांमुळे -
* पोट रिकामे होण्याचा वेग मंदावतो. अन्न पोटात जास्त वेळ राहिल्यामुळे व्यक्तीला दीर्घकाळ भूक लागत नाही.
* मेंदूतील भुकेच्या केंद्रावर नियंत्रण मिळवता येते. मेंदूतील हायपोथॅलॅमस भागावर परिणाम करून तृप्तीची भावना निर्माण केली जाते.
* इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने नियंत्रित केले जाते.
या सर्वांचा परिणाम म्हणून व्यक्तीचा कॅलरी ग्रहण करण्याचा दर ५० ते ७०टक्क्यांनी घटतो व वजन वेगाने कमी होऊ लागते.

पण या नाण्याला दुसरी बाजूसुद्धा आहे, ती म्हणजे याचे दुष्परिणाम व शरीराची होणारी हानी. वजन वेगाने कमी होत असताना शरीरावर याचे अत्यंत गंभीर परिणाम दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन डायबेटिस असोसिएशन यांच्या अलीकडील संशोधनानुसार, या औषधांचे खालील दुष्परिणाम होऊ शकतात व हानी संभवते :

१. स्नायूंचा वेगाने होणारा ऱ्हास : जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत कमी कॅलरीज घेते, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी केवळ चरबी वापरत नाही, तर स्नायूंमधील प्रथिनांचे विघटन करू लागते. अभ्यासानुसार, जीएलपी-१ औषधांमुळे वजन कमी होते, पण त्यातले २५ ते ४० वजन स्नायूंचे असते. स्नायू घटल्यामुळे शरीराचा चयापचय दर कायमचा मंदावतो.

२. हाडांची घनता : कमी आहारामुळे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांचे प्रमाण घटते, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

३. तीव्र पचनसंस्थेचे विकार : अशा प्रकारची औषधे सुरू करताना ८० टक्के लोकांना मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होतो. आतड्यांची हालचाल अत्यंत मंदावल्यामुळे अन्न पोटात कुजते व गॅस्ट्रोपॅरेसिसचा (आतड्यांचा पक्षाघात) धोका संभवू शकतो. तसेच मूळव्याध किंवा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने बद्धकोष्ठतेचा गंभीर त्रास होऊ शकतो.

४. त्वचा सैल पडणे : अचानक वजन कमी झाल्यामुळे चेहऱ्यावरील आणि शरीरावरील चरबीचा थर वेगाने वितळतो त्यामुळे त्वचा सैल पडते, सुरकुत्या पडतात आणि व्यक्ती वयापेक्षा जास्त वृद्ध दिसू लागते.

५. सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता : कमी आहारामुळे शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे (बी१२, डी, सी) आणि खनिजे (लोह, जस्त, मॅग्नेशियम) मिळत नाहीत. परिणामी, केस गळणे, थकवा, नैराश्य आणि प्रतिकारशक्ती क्षीण होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

पोषणाचे नवीन आव्हान
या औषधांमुळे रुग्णाची खाण्याची इच्छा जवळजवळ संपुष्टात येते. अशा वेळी ‘न्यूट्रिअंट-डेन्स-मायक्रो-मील्स’ हेच एकमेव उत्तर आहे. एकाच वेळी मोठे ताट भरून जेवण्याऐवजी दिवसातून ४ ते ५ वेळा अतिशय पोषक, लहान प्रमाणात आहार घेणे गरजेचे आहे.

१. प्रथिनांना सर्वोच्च प्राधान्य
स्नायूंचा ऱ्हास रोखण्यासाठी आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवणे अनिवार्य आहे. प्रतिकिलो वजनामागे १.२ ते १.६ ग्रॅम प्रथिने मिळायला हवीत. पनीर, टोफू, मूग, मटकी, चवळी, मसूर, सत्तू, ग्रीक योगर्ट, सोयाबीन आणि चीज हे शाकाहारी पदार्थ आणि उकडलेली अंडी (विशेषतः पांढरा भाग), चिकन ब्रेस्ट, मासे असे मांसाहारी पदार्थ प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. आहारात या पदार्थांचा समावेश होत नसल्यास किंवा होऊनसुद्धा प्रथिने कमी पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चांगल्या दर्जाच्या प्रोटीन सप्लिमेंट्स वापरू शकता.

२. मायक्रोन्यूट्रियंट्स
पालक, मेथी, ब्रोकोली अशा हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या बेरीज, डाळिंब, सफरचंद अशा फळांमध्ये पोषक घटकांचा मोठा साठा असतो. बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, तीळ आणि जवस यांतून निरोगी चरबी (Omega-3) आणि खनिजे मिळतात.

३. फायबर आणि आतड्यांचे आरोग्य
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर गरजेचे आहे. यासाठी आहारात इसबगोल (Psyllium Husk), ओट्स आणि भाज्यांचे सूप असावे. सोबत आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियासाठी ताक, दही, किंवा कांजी यांसारखी प्रोबायोटिक्स घेऊ शकता.


कमी अन्न, जास्त पोषण : केवळ उदाहरणादाखल एक नमुना देत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीने काय व कसे खावे याचा एक सल्ला. अर्थातच सर्वांनी, विशेषतः काही आजार असलेल्यांनी आपल्या दैनंदिन आहारात कोणताही बदल करताना आधी आपल्या डॉक्टरांचा न चुकता सल्ला घ्यावा व मगच बदल करावेत.

वेळ
काय घ्यावे?
पोषणमूल्य आणि फायदा

सकाळी उठल्यावर
१ पेला कोमट पाणी + ५ भिजवलेले बदाम + २ अक्रोड
ओमेगा-३ आणि मेंदूला पोषण

२. न्याहारी
२ उकडलेली अंडी / १ वाटी बेसन-पालक धिरडे + १ वाटी दही
उच्च प्रथिने आणि जीवनसत्त्वे

३. दुपारचे जेवण
१ लहान नाचणी/ ज्वारीची भाकरी + १ वाटी घट्ट डाळ किंवा नीर + १ वाटी पालेभाजी
फायबर, कॅल्शियम आणि प्रथिने

४. संध्याकाळचा नाश्ता
सत्तूचे पीठ पाण्यात/ ताकात कालवून + १ चमचा भोपळ्याच्या बिया
ऊर्जावर्धक आणि पचनास हलके

५. रात्रीचे जेवण
१ वाटी मिक्स व्हेजिटेबल + चिकन/ टोफू सूप किंवा १ वाटी मुगाची खिचडी + तूप
पचनास सोपे आणि पोषक

मधुमेही आणि इतर आजारी व्यक्तींसाठी सूचना

जीएलपी-१ औषधे केवळ वजन कमी करण्याचे साधन नसून, ती मूळची टाइप-२ मधुमेहासाठीदेखील दिली जाणारी औषधे आहेत. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर मधुमेही रुग्ण या औषधांसोबत इन्सुलिन किंवा इतर औषधे घेत असतील आणि आहार फार कमी झाला, तर रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत खाली जाऊ शकते. थरथरणे, घाम येणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांमध्ये बदल करू नयेत. तसेच या औषधांमुळे स्वादुपिंडाला सूज येण्याचा धोका असतो. जर पोटात तीव्र वेदना होऊन ती पाठीमध्ये जात असेल, तर त्वरित औषध बंद करून डॉक्टरांशी संपर्क साधावा. याबरोबरच उलट्या आणि अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते, त्याचा थेट ताण मूत्रपिंडावर पडतो. म्हणूनच दिवसातून किमान अडीच ते तीन लिटर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (नारळ पाणी, लिंबू पाणी) घेणे बंधनकारक आहे.

सध्याचा सर्वोत्तम आणि शाश्वत पर्याय काय?
जीएलपी-१ औषधे ही काही जादूची कांडी नाहीत. औषध बंद केल्यानंतर ८० टक्के लोकांचे वजन पूर्ववत होते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे औषधांवर कायमस्वरूपी अवलंबून राहणे हा योग्य पर्याय नाही. सर्वोत्तम पर्याय म्हणजे जीवनशैलीत मूलभूत बदल करणे, पोषणमूल्ये असलेला आहार घेणे, योग्य स्ट्रेंथ ट्रेनिंग घेणे, पुरेशी झोप घेण, ताण नियंत्रण करणे आणि महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रण करणे.

वजन कमी करण्यासाठी औषधांवर अवलंबून राहण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. प्रथिनांवर आधारित संतुलित आहार घेणे महत्त्वाचे ठरते. रिफाइंड कार्बोहायड्रेट्स (मैदा, साखर) पूर्णपणे बंद करावीत. औषधे घेत असताना किंवा नसतानाही, आठवड्यातून तीन ते चार दिवस वजनाचे व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे स्नायूंचा ऱ्हास थांबतो, हाडे मजबूत होतात आणि चयापचय सुधारतो. तसेच आतड्यांमधील संप्रेरकांचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवणेसुद्धा फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी फायबरयुक्त आहार (ओट्स, इसाबगोल, भाज्या) घेतल्यास नैसर्गिकरित्या जीएलपी-१ संप्रेरक स्रवते व कृत्रिम औषधांची गरज भासत नाही.

जर अतिलठ्ठपणामुळे (बॉडी मास इंडेक्स ३५हून जास्त असल्यास) ही औषधे घेणे अत्यंत गरजेचे असेल, तर ती केवळ आणि केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या थेट देखरेखीखालीच घ्यावीत. स्वतःच्या मनाने दुकानातून औषधे विकत घेऊन वापरणे प्राणघातक ठरू शकते.

जीएलपी-१ रिसेप्टर औषधे म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक शक्तिशाली शस्त्र नक्कीच आहे, परंतु ते अज्ञानाने वापरल्यास, ती एक दुधारी तलवार ठरू शकते. ‘वजन कमी होणे’ आणि ‘निरोगी होणे’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्नायू आणि पोषण ययांच्याकडे दुर्लक्ष करून कमी केलेले वजन शरीराला अपंगत्वाकडे नेऊ शकते. त्यामुळे, जर तुम्ही या औषधांचा वापर करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल, तर वजनाच्या आकड्यापेक्षा पोषणाची गुणवत्ता आणि स्नायूंची ताकद जपणे अधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे. कमी अन्नात जास्तीत जास्त पोषण, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैली हाच निरोगी आरोग्याचा खरा मंत्र आहे!

लेखिका पुणेस्थित आहारतज्ज्ञ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT