खोडद, ता. २९ : दुर्मीळ असलेल्या गोदन वनस्पतीचे खोडद (ता. जुन्नर) येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी आपल्या शेतात संवर्धन केले आहे. राजस्थानसारख्या दुष्काळी भागात तग धरणारी आणि औषधी गुणधर्म असलेली ‘गोदन’ (शास्त्रीय नाव - कॉर्डिया घ्राफ) ही वनस्पती कुचिक यांच्या शेतात बहरली आहे.
मे-जून महिन्यात पक्व होणाऱ्या या झाडाला यावर्षी सध्या ऑक्टोबर महिन्यातच गर्द नारंगी रंगाची, मधुर चवीची फळे लगडली असून, ती खाण्यासाठी आणि पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, नगर, बीड, जळगाव, नंदुरबार, नाशिक या अवर्षणप्रवण भागात आढळणाऱ्या नैसर्गिक अधिवासाचे हे झाड जिवंत उदाहरण आहे. साधारणपणे भोकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुळातील झाडांमध्ये गोदन ही वेगळी आणि दुर्मीळ प्रजाती आहे. हे झाड ३ ते ४ मीटर उंच व बहुखोड पद्धतीने वाढते व झुडूप वर्गात मोडते.
संशोधनानुसार या वनस्पतीची मुळे आणि सालीचा उपयोग मलेरिया, आतड्यांचे विकार आणि डोळ्यांच्या आजारांवर केला जातो. कच्ची फळे भाजी आणि लोणच्यासाठी वापरली जातात. फळे बलवर्धक, शक्तीवर्धक
तर आतड्यामधील आजारासाठी अतिशय उपयुक्त आहेत. सध्या या फळाची व्यावसायिक शेती केली जात नसली तरी रानमेवा म्हणून त्याला मोठी मागणी आहे. राजस्थानातील बिकानेरच्या बाजारात या फळाची विक्री १८० ते २०० रुपये प्रति किलो दराने होते, असे पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले.
भोकर आणि गोदन यामध्ये फरक काय
भोकराची फळे बोराएवढी, बेचव, अतिशय चिकट व फिकट गुलाबी रंगाची असतात तर गोदनाची फळे मोत्याएवढी, चवीला मधुर, तुलनेने कमी चिकट व आकर्षक गर्द नारंगी रंगाची असतात. त्यामुळेच लहान मुले, पक्षी, खारी, वटवाघळे, माकडे यांना ती अधिक आकर्षित करतात. पानांचा आकार दंडगोलाकार व रंग मध्यम हिरवा असून पाने वरून खडबडीत तर खालून मऊ असतात.
ग्रामीण भागात जुन्या दगड-मातीच्या वाड्यांच्या परिसरात पक्ष्यांच्या विष्ठेतून ती नैसर्गिकरित्या वाढत होती, मात्र जुन्या घरांच्या पुनर्बांधणीमुळे तीही नष्ट होत चालली आहे. जैवविविधता आणि अन्न साखळीतील महत्त्वाच्या या झाडाचा अधिवास धोक्यात आल्याने ती दुर्मीळ झाली आहे.
- सुभाष कुचिक, पर्यावरण अभ्यासक, खोडद (ता. जुन्नर)
02496
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.