नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार दराडे यांना मोठा धक्का
---
अपक्ष गोकुळ गिते विजयी; महायुतीत ‘क्रॉस मतदान’
---
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अनपेक्षित पराभव करत दणदणीत विजय मिळवला.गिते यांनी पहिल्याच फेरीत ३५७ मते मिळवून विजयासाठी आवश्यक असलेला ३०३ मतांचा कोटा पूर्ण केला. तर दराडे यांना अवघ्या २४८ मतांवर समाधान मानावे लागले.तिसरे उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही.
या निवडणुकीत एकूण ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले होते.त्यापैकी १३ मते अवैध ठरल्याने ६०५ वैध मतांच्या आधारे निकाल घोषित करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी पार पडली.
निवडणुकीत भाजपमधील बंडखोरी हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरला. गोकुळ गिते हे नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे बंधू असून,ते अप्रत्यक्षपणे भाजपशी संबंधित होते. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये अनेक बैठका घेतल्या. दुसऱ्या बाजूला भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र गिते निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले. महायुतीतील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा फटका उमेदवार नरेंद्र दराडे यांना बसला. उमेदवारीवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील स्थानिक नेते नाराज होते. याच परिस्थितीचा फायदा घेत अपक्ष उमेदवार गिते यांनी प्रभावी रणनीती आखत महायुतीच्या मतांमध्ये मोठे खिंडार पाडले आणि विजय मिळवला.
राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, संख्याबळ अनुकूल असतानाही दराडे यांचा झालेला पराभव हा महायुतीमधील अंतर्गत फुटीचा परिणाम आहे. महायुतीमधील विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गट काही प्रमुख नेत्यांनी आणि सदस्यांनी गोकुळ गिते यांना छुप्या पद्धतीने मोठी मदत केल्याची आणि ''क्रॉस मतदान'' घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे.
-------
"माझा विश्वासघात झाला": नरेंद्र दराडे
पराभवानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. "माझा विश्वासघात झाला," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.त्यांनी महायुती आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडे रोख ठेवत कोणाचेही नाव न घेता आपला संताप व्यक्त केला. त्यास दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनीही नाशिकमधील मतफुटीवर संताप वक्त केला आहे.
-------
बॉक्स:
नाशिक मतदारसंघाची अंतिम आकडेवारी:
एकूण मतदान...६१९
एकूण झालेले मतदान...६१८
वैध मते...६०५
अवैध मते...१३
विजयाचा कोटा..३०३
------
उमेदवारांना मिळालेली मते:
गोकुळ गिते(अपक्ष):३५७ मते (विजयी)
नरेंद्र दराडे (महायुती):२४८ मते
प्रसाद हिरे:०० मते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.