गोकुळ तर्फ हेळवाक गटात बहुरंगी लढत
राजाभाऊ शेलारांचे कसब पणाला; मतांच्या विभाजनाचा फायदा कुणाला?
जालिंदर सत्रे ः सकाळ वृत्तसेवा
पाटण, ता. २५ : पाटण तालुक्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाचा आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा एकेकाळचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा गोकुळ तर्फ हेळवाक जिल्हा परिषद गट यावेळी हायव्होल्टेज लढतीचा साक्षीदार ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत पाटणकरांचा हा बालेकिल्ला ढासळल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या गटात भाजप, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने येथे चौरंगी-बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राजाभाऊ शेलार पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात आहेत. १९९५ पासूनचा काळ पाहता, हरीश भोमकर यांचा अपवाद वगळता राजाभाऊंनी या गटावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. पाटण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशी महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या शेलारांना यंदा मात्र सर्वपक्षीय उमेदवारांनी वेढले आहे. विशेषतः स्वपक्षातील नाराजी आणि येराड गणातील वनकुसवडे पठारावरील विरोध यांमुळे शेलारांची कसोटी लागणार आहे.
जिल्हा परिषद गटासाठी राजाभाऊ शेलार यांच्या विरोधात पारंपरिक विरोधक अशोक पाटील (शिवसेना), माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि राजकीय मित्र म्हणून ओळखले जाणारे विक्रमबाबा पाटणकर (राष्ट्रवादी), नरेश देसाई (राष्ट्रवादी- शरद पवार गट), महेश शेलार (शिवसेना- उबाठा), संतोष कदम (काँग्रेस) यावेळी विरोधात उभे ठाकले आहेत. यांच्याव्यतिरिक्त इतर सहा उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे.
गोकुळ तर्फ हेळवाक गणात प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात काट्याची लढत आहे. भाजपने माजी पंचायत समिती सदस्य बबन कांबळे यांच्या पत्नी वैशाली कांबळे यांना संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या (शिंदे गट) मंगल माने, तसेच वैशाली कारंडे, पूनम माने (काँग्रेस) आणि रेखा चव्हाण (शिवसेना ठाकरे गट) नशीब आजमावत आहेत. मात्र, मुख्य लढत वैशाली कांबळे आणि मंगल माने यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. येराड गणात शिवसेनेच्या विद्या शिंदे आणि भाजपच्या वंदना शिंदे यांच्यात चुरस असली, तरी राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे आणि शिवसेना ठाकरे गट गटाच्या रिया कांबळे यांच्या उमेदवारीमुळे ही लढत चौरंगी झाली आहे.
चौकट
वनकुसवडे पठाराची नाराजी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वनकुसवडे पठारावरील राजेंद्र शिंदे यांनी उमेदवारी डावलल्याच्या रागातून शिवसेनेचे अशोकराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने सोशल मीडियावर मोठे वादळ उठले आहे. ही नाराजी दूर करण्यात राजाभाऊ शेलार आणि पाटणकर पिता-पुत्र यशस्वी होतात की राजाभाऊ आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर नवा पर्याय शोधतात, यावर भाजपचे या गटातील भवितव्य अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.