पुणे

... अन् मालकाच्या प्रेमापोटी बैलाने गिळलेले सोने केले परत

गजेंद्र बडे

पुणे : शेतकरी म्हटले की बैल हाच त्याचा जीव की प्राण असतो. त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांपेक्षाही बैलांवर अधिक प्रेम करत असतात. पण मालकाचे आपल्यावरील एवढे प्रेम पाहून, चक्क गिळलेले सोने बैलाने मालकाला परत केले आहे. या बैलाने रवंथाच्या माध्यमातून हे सोने परत करत, मालकावरील प्रेमाची परतफेड केली आहे. या घटनेने पुणे जिल्हा परिषदेचे पशूवैद्यकीय अधिकारी अचंबित झाले आहेत. 

भारतीय संस्कृतीत पोळा हा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण खूपंच म्हत्वाचा असतो. सर्व शेतकरी या दिवशी बैलांसह सर्व गुरा-ढोरांना स्वच्छ पाण्याने धुऊन (आंघोळ घालणे) शिंगांची रंगरंगोटी, अंगावर विविध रंगांची चित्रे रंगवणे, गळ्यात चंगाळे, घंटा बांधणे, नवीन सर, वेसन  व मोरकी घालून सजवत असतात. शिवाय यादिवशी दिवसभर सुग्रास व हिरवा खाऊ घालत असतात. या दिवशी संध्याकाळी बैलांना हनुमान मंदीराच्या भोवती मिरवून, त्यानंतर बैल आणि गाईचे रितसर लग्न लावण्यात येते. शिवाय गाई-बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्यात येते. बैलांची पुजा करताना त्यांचे रितसर औक्षण करणे, अंगावरील सोने काढून ते बैलावरून ओवाळण्याचे काम शेतकरी महिला करत असतात. एकंदरीत पोळा हा शेतकऱ्यांच्यादृष्टीने सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे बैलांचे लग्न लावल्यानंतर "चाहूर चाहूर चांग भलं, पाऊस आला घरला चला, असं म्हणत थाळ्या वाजवत बैलांचे आदरातिथ्य करत असतात. 

याच आनंदाला पुणे जिल्ह्यातील न्हावरा येथील एका शेतकऱ्याला ऐन पोळ्याच्या दिवशीच गालबोट लागले. गृहिणीने बैलाला ओवाळण्यासाठी अंगावरुन काढलेले ५० हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र नजरचुकीने बैलाने खाऊन टाकले. यामुळे या कुटूबांच्या आनंदाचे क्षणात दुःखात रुपांतर झाले. 
कारण बैलाने सोने खाल्ले हे मालकाला माहिती नव्हते. मग ओवाळणीसाठी काढून ठेवलेले सोने अचानक गेले कुठे? याचीच रुखरुख मालकाला लागली. बैल सोने खाईल, याची खात्री  मालकाला न्हवती. शेवटी सोने बैलानेच खाल्ले असावे, यावर सर्वांचे एकमत झाले आणि शेवटी पशुवैद्यकांच्या सलल्याने बैलाचा (एक्सरे) काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानुसार हा बैल शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा (जिल्हा पुणे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आला. येथे बैलाचा एक्स रे   काढण्यात आला. या एक्स रेमध्ये नंतर बैलाच्या पोटात  मंगळसूत्र असल्याचे निदान झाले. हे मंगळसूत्र पोटातून बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया केल्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील पशूवैद्यकीय केंद्रातील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष भारती हे या बैलावर  शस्त्रक्रिया करणार होते.  पण या घटनेने बैलाचे मालक दादासाहेब झानजे हे बैलाच्या प्रेमापोटी खुपच अस्वस्थ झाले. त्यांना सोने महत्त्वाचे नव्हते तर, बैल महत्त्वाचा  होता‌. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की, साहेब सोने महत्त्वाचे नाही. ते बैलाच्या पोटात राहिले तर राहू द्या. पण शस्त्रक्रिया केल्यानंतर बैल अधू होणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया नको. समाजातील अगदी श्रीमंत माणसंही सोन्याला जीव की प्राण मानतात. अन् हा गरिब शेतकरी सोन्याला मातीसमान मानून बैलावर सोन्यापेक्षा अधिक प्रेम करत असल्याचे पाहून मांडवगण फराटा पशुसंवर्धन केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक अवताडे अचंबित झाले. 

या बैलाचे मालक दादासाहेब झानजे हे मुळचे मराठवाड्यातील बीड  जिल्ह्यातील वायरा (ता. आष्टी) येथील आहेत. ते कामाधंदयानिमित्ताने शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे आलेले आहेत.

पण मालकाएवढेच या बैलाचेही त्या मालकावर प्रेम असावे, हेच या बैलानेही त्याच्या कृतीतून दाखवून दिले आहे. पोटातलं सोनं बाहेर काढण्यासाठी आपल्यावर शस्त्रक्रिया  होणार असल्याच्या कारणाने मालक अस्वस्थ झाल्याचे पाहून, या बैलाने रातोरात रवंथाद्वारे हे मंगळसूत्र बाहेर काढले आणि दुसऱ्या दिवशी होणारी शस्त्रक्रिया टळली. अशा पद्धतीची ही पहिलीच दुर्मिळ घटना असल्याचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले. ते म्हणाले, "जड वस्तू पोटात खाली बसते. ती रवंथाद्वारे कधीच बाहेर येत नाही. क्वचितप्रसंगी ती बाहेर येण्याची शक्यता असते. पण या घटनेने बैलाचे मालकावरील प्रेम दाखवून दिले आहे."

एखाद्या पशुपालकाचे आपल्या बैलावर किती प्रेम असते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शस्त्रक्रिया करावी लागणार म्हटल्यावर मालकाच्या डोळ्यात पाणी आले. आवाज गहिवरला, हे बैलावरील प्रेमाचे खुप मोठे उदाहरण आहे. बैलावरील खरे प्रेम काय असते, हेच या घटनेतून या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. - डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT