स्वरसम्राज्ञीच्या भेटीचे ते सुवर्णक्षण
चित्रपट समीक्षक शिरीष कणेकर यांचा एक लेख वाचनात आला. शीर्षक होते ‘एक वेडापीर लताला भेटतो’ या लेखात त्यांना दिसलेल्या लता मंगेशकर, त्यांनी गायलेले गाणी, त्यांचा स्वभाव, आवड निवड, खाण्याच्या सवयी, गीतकार, गायक, संगीत दिग्दर्शक, यांचे आलेले अनुभव, त्यांची स्मरणशक्ती या सर्वांचे दर्शन घडवणारे सुंदर वर्णन आहे.
लेख वाचता वाचता मीही भूतकाळात गेलो आणि त्यांच्या भेटीची आठवण जागी झाली. प्रसंग आहे सुमारे ३० एक वर्षापूर्वीचा पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची माझी ओळख सुमारे ६० वर्षांची, त्यांचे बरोबर अनेक ठिकाणी हिंडलो. त्यामुळे राजकारण, साहित्यिक, चित्रपट, समाजकारण या क्षेत्रातील अनेक व्यक्ती जवळून पाहण्यास मिळाल्या. काही सार्वजनिक कार्यक्रमाला त्यांचेसमवेत हजरही राहिलो. एकदा ते कोल्हापूरला निघाले होते. मला बरोबर चल म्हणाले, म्हणून निघालो. दोन दिवसांचा कार्यक्रम, मुक्काम कोल्हापूर, दुसरे दिवशी सकाळी स्नान, नाश्ता करून आम्ही निघालो आणि जयप्रभा स्टुडिओच्या दारात गाडीतून उतरून थांबलो होतो.
थोड्याच वेळात एक गाडी दरवाजापाशी येऊन थांबली. गाडीतून आलेली व्यक्ती होती. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मी आश्चर्याने पाहातच राहिलो. लक्षावधी लोक ज्यांना पाहण्यासाठी आणि ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर असतात. त्या स्वरसम्राज्ञी समोर होत्या, त्यांचेपासून काही अंतरावर बाबासाहेबांसमवेत मी उभा होतो. त्यांचे दर्शनामुळे भारावलेली स्थिती झाली होती. दोनच वाक्यात त्यांनी विचारणा केली. बाबासाहेब केव्हा आलात आणि कसे आहात. माझ्या कानात अजूनही ते मधूर आणि मंजूळ स्वर घर करून आहेत. त्यांच्या गाण्यातला गोडवा रोजच ऐकतो; पण बोलण्यातला गोडवाही आज अनुभवता आला.
या ठिकाणी भालजी पेंढारकर याचे ‘साधा माणूस’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रकाशन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची होती. जयप्रभा स्टुडिओच्या सभागृहात चाललेला हा कार्यक्रम, त्यासाठी चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती आलेल्या होत्या. एक प्रकारे हा शिवभक्तांचा मेळावाच होता. प्रकृती बरी नसल्यामुळे वित्रतपस्वी भालजी पेंढारकर समक्ष हजर नव्हते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मान्यवरांनी शेजारच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. हे सर्व प्रसंग मी डोळ्यात साठवून ठेवत होतो. या संपूर्ण कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांची उपस्थिती आणि त्यांचे झालेले दर्शन यामुळे माझ्यासाठी ही सकाळ अतिशय प्रसन्न आणि आनंददायी होती.
काही वर्षांनी असाच एक भेटीचा प्रसंग अचानक आला. शिवशाहीर यांचे जीवनचरित्र आणि आठवणीचे एक पुस्तक मी छापून घेतले, मुंबईतील एका संस्थेने याचे प्रकाशन करण्याची इच्छा व्यक्त केली. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भारतरत्न लता मंगेशकर यांचे हस्ते करण्याचे त्यांनी ठरवले. १७ एप्रिल २०१४ या दिवशी विलेपार्ले (मुंबई) इथे हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात लतादीदींच्या हस्ते प्रकाशक म्हणून माझा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटलो, खाली वाकून नमस्कार केला. पुस्तकाचे प्रतीवर स्वाक्षरीसाठी विनंती केली. स्वाक्षरी करता करता त्यांनी अभिप्राय दिला. पुस्तक छान झाले आहे. हा मला मिळालेला आशीर्वाद होता. आजही त्यांनी स्वाक्षरी केलेले पुस्तक मी जपून ठेवले आहे. कोल्हापूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमाचे वेळी कानात साठवलेला तो मधुर आणि दैवी आवाज अजूनही स्मृतीत राहिला आहे. आवाज दैवी होता म्हणून तर स्वरसरस्वती किंवा स्वरलक्ष्मी म्हणतात. वरील प्रसंगामुळे एखादे स्वप्न खरे कसे होते याचा साक्षात प्रत्यय आला आला. मी स्वरसम्राज्ञी यांना पाहिले आणि ऐकले याचे वर्णन शब्दात करणे अशक्य. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील हे सुवर्णक्षण, ते जपून ठेवायचे आणि आठवण काढायची इतकेच. २८ सप्टेंबर लता मंगेशकर यांचा जन्मदिवस. आज त्या हयात नाहीत. वरील दोन्ही प्रसंगामुळे त्यांची स्मृती मात्र कायमची स्मरणात राहिली आहे.
- अशोक वाळिंबे
९४२३२६१७९०
PNE26W52036
लता मंगेशकर यांच्या हस्ते विलेपार्ले (मुंबई) येथे झालेला सत्कार.
PNE26W52037
भारतरत्न लता मंगेशकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर येथे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.