मशागत
पेस्टिंग १७ ऑगस्ट
.............................
जो तेरा है वो मिलकर रहेगा
शिल्पा करमरकर
राजू आमचा फॅमिली फ्रेंड. असाच एक दिवस बोलत असताना राजूच्या बोटातील अंगठीकडे लक्ष गेलं. चांगली जाड अंगठी होती. ‘‘अंगठी चांगली जड दिसते’’ असे म्हटल्यावर राजू गालातल्या गालात हसला. या अंगठीची पण एक गोष्ट आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण ही सत्य घटना आहे, असं म्हणून राजू गोष्ट सांगू लागला. साधारण १९७० चा काळ त्यावेळीच्या निलंगा तालुक्यातील कांबळगा नावाच्या एका गावात राजुचे आजोबा राहत होते. ते गावातील प्रतिष्ठित जमीनदार होते. अशाच एका एप्रिल- मे महिन्यातील रणरणत्या दुपारी भर उन्हात काम करीत असताना कपाळावरचा घाम गोळा केला आणि तो हात सवयीप्रमाणे जोरात झटकला. गंमत अशी झाली, की हात झटकताच हातात असलेली सोन्याची अंगठी हवेत उडाली आणि कुठेतरी जाऊन पडली. सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली. पण अंगठी कुठेही सापडली नाही पण आजोबा म्हणाले, ‘‘मला खात्री आहे, ही अंगठी मिळणार आणि माझ्या घरातल्याच कुणाला तरी मिळणार.’’
वर्षे उलटत राहिली १९७०, ७१, ७२ असे करता करता वर्ष २०१७ मागे पडलं. कालांतराने आजोबा वारले. आजी पण वारल्या. शेतातल्या मजुरांच्या पण दोन पिढ्या आल्या आणि गेल्या. नवे लोक आले. कालचक्र सुरूच राहिलं. इकडे आजोबांची तिसरी पिढी म्हणजे नातू आता मोठा झाला होता. तो शेतीचा कारभार सांभाळू लागला. एका दिवशी विहिरीवर मोटार चालू होती. ती बंद कर असं मुलाने मजुराला सांगितलं. त्यावेळी तो मजूर शेतात कोळपणी करत होता. ‘‘तू मोटार बंद करून ये, तोवर मी कोळपं चालवतो’’, असं म्हणून मुलाने कोळपं हाती घेतले. एखादा मिनिट झाला असेल नसेल, त्याला कसला तरी आवाज आला. सहज कुतूहल म्हणून त्याने काम थांबवलं. खाली बसून निरखून पाहू लागला. मातीत काहीतरी चमकत होतं. हातात घेऊन पाहिलं तर पिवळीधमक वळ्याची अंगठी. खोटी असेल असं म्हणून त्याने ती खिशात टाकली. काम संपवून घरी आला. सहज म्हणून वडिलांना दाखवली. अंगठी हातात घेताच वडिलांचे डोळे आजोबांची आठवण येऊन भरून आले. ‘‘लेकरा, तुझ्या आजोबांचा आशीर्वाद तुला काळ्या रानात सापडला बघ’’, असं म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांकडून ऐकलेली गोष्ट मुलाला सांगितली.
तुम्ही स्वतःशी कायम प्रामाणिक राहात असाल, आपल्या मुखाने दिलेला शब्द पाळत असाल, तर असं म्हणतात की हळूहळू तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होते. राजूचे आजोबा नक्कीच तसे असणारा असा विश्वास ठेवावा लागेल. त्यांचे शब्द चमत्कार वाटावा तसे खरे ठरले होते. राजूने सांगितलेली गोष्ट खरोखरच आश्चर्य वाटेल अशीच होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.