पुणे

जयंत खाडे लेख

CD

पान १२ - तातडीने
०००००००००००००००००००००००
गोंदणवाडीचं पाव्हणं...

—----------------------------

हळूहळू फेब्रुवारी संपला. ऊस तोडीचा हंगाम संपायला आला. हिशेब अंतिम करायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता शनिवारपर्यंत पाव्हणं चंबुगबाळं आवरून गोंदणवाडीला निघून गेली. देवळाजवळची जागा पुन्हा रिकामी झाली. एक भारद्वाज रिकाम्या झोपड्यांच्या जागेवर झालेल्या मुंग्या टिपत होता. औदुंबराच्या डोहात सोडलेल्या पण काठावरच तरंगत राहणाऱ्या नारळासारखी या गोंदणवाडीच्या पाव्हण्यांची आठवण वर्षभर मनात तरळत राहिली. आता पुन्हा हंगाम सुरू होईल आणि नवीन पाव्हणं अनामिक आशेच्या किरणांचे हात धरून गावात येतील.

—------------------------------

जयंत खाडे

—-----------------------------

खोरीला नारळाच्या सुकलेल्या झावळ्या तोडून कडेला टाकत होतो, तर समोरून मामा आला. दगडावर बसत विडी शिलगावत पुटपुटला, ‘‘आलं बघा तुमचं पाव्हणं आत्ता.’’ मी चमकून त्याचाकडे पाहिले. चार दिवस मामाला विचारत होतो, ‘‘तोडकरी कधी येणार?’’ मी झावळ्या तिथेच सोडून तडक पाटलाच्या मळ्यात गेलो. आयशरचा हुडाचा ट्रक नुकताच पोहोचलेला. एक एक जण खाली उतरून आपलं साहित्य, माणसं आधाराने खाली उतरत होता. खरं तर त्यांची सोय लक्ष्मीच्या देवळाजवळ, डोंगराकडेलाच असते; पण त्यांच्या राहुट्या बांधेपर्यंत मळ्यातच एक दोन दिवसांसाठी गोठ्यात सोय केलेली.


एकेक जण नमुनेदार होता. बाजूला टेकून उगाच एकाएकाला न्याहाळलं. बऱ्याच जोड्या होत्या. सोबत कुणाची बारकी बारकी चिल्लीपिल्ली तर थोराड जोडप्याची कळती पोरं. काही हत्तीसारखी फुगलेली, अगदी काम कशी करायची असे वाटावे, तर काही चिपाडं, जशी की उसात उभी केली तर कळायची पण नाहीत. अशीच एक चिपाडासारखी बाई ट्रकातून उतरली. विस्कटलेले केस, काळा रंग, गोंदलेलं कपाळ, तरतरीत नाक आणि उतरताना काखेत माकडासारखं चिपकलेलं, अगदी काही महिन्यांचंच कोवळं पोर. बाई खाली उतरली तर वर आणखी दोन पोरं, वर्षभराच्या अंतराची. एक बारकं रडतेलं आणि त्यापेक्षा थोरलं हातात कुरकुऱ्याचा पुडा घेऊन खात्यालं. तिनं दोघांना खाली घेतलं, बांधलेलं बोचक ओढलं आणि बाजूला नेऊन ठेवलं. काखेतलं पोरगं सगळीकडं टकामका बघत होतं तर मधलं तिची साडी धरून सतत रडत होतं, पण त्याचा आवाज सुकलेला, रडायला पण जोर नव्हता. थोरलं कुरकुऱ्याचा पुडा घेऊन बाजूला गेलं. खरं तर यांचा बाप कुठं आहे? एकेक जण खाली उतरतोय, काही पोरं एकदमच तरुण, अगदी विशीतले, मिश्या पण फुटलेल्या नाहीत, पण केस मात्र फॅशनेबल कापलेले. अंगात फुल बाह्याचा कोणता तरी मंडळाचा टी-शर्ट आणि खाली कमरेवरून पार ढासळलेली जीन्स पॅन्ट आणि मागच्या खिशात स्मार्ट फोन.


ती चिपाडी बाई कुणाला तरी ट्रकमध्ये शोधत असलेली. अखेरीस कोणीतरी त्याला ओढला आणि हाताला धरून खाली लोटला. गडी कातडी हाडाला चिकटलेला, एकदम फुगलेले नाक आणि त्यावर एक मोठाच्या मोठा तीळ. केस विस्कटलेले आणि कपडे लोळून लोळून घाणीने माखलेले. उतरला तर हसायला लागला, गड्याला धड उभारता येईना. कमरेतच पुढं वाकला. मग त्या चिपाडी बाईनं त्याला ओढत बाजूला नेऊन बसविला. पायाचं फतकल मांडून तो बसला आणि समोरच पचकन थुंकला, लाळ हातानं पुसली आणि डोकं हलवत इकडं तिकडं बघायला लागला.


जवळपास पंधरा-वीस जोड्या उतरल्या. पोरं, बाया माणसं धरून तीस-पस्तीस एक माणसं या ट्रकात कोंबलेली. काही तरुण पोरं हुडावर आणि केबिनमध्ये बसून आली असणार. शेवटी दोन म्हातारी, ती पण पार मरायला टेकलेली, त्यांनाही उतरवलं. ती दोघं हेलपटत कडेला भिंतीपर्यंत पोहोचली आणि पुन्हा बसली. अजून एक विशेष मुलगी उतरली. गतिमंद, उभट चेहरा, अपुरी उंची, थोटके हात आणि चेहऱ्यावर प्रचंड भीती! माझ्याशी नजर झाली आणि मीही हादरलो. तिने पण भिऊन बाजूला बघितलं, परत माझ्याकडं बघितलं. मळ्यातले सगळेच तिच्याकडं बघायला लागले, तशी ती आणखी भेदरली आणि चेहरा चोरून घोळक्यात उभारली. सगळ्या बायांनी चेहऱ्यावर आणि हातावर गोंदलेलं, त्या म्हाताऱ्या बाईच्या चेहऱ्यावर गोंदलेलं पार फिकट होऊन तिच्या सुरकुत्या मध्ये विरलेलं, जुन्या आणि जीर्ण वहीच्या पानासारखं! त्यात एक मोठ्ठी करुणेची चित्तरकथा दडलेली. त्या तरुण पोरांनी सुद्धा हातावर, मानेवर गोंदलेलं. मामा मला म्हणतो तुमचं पाहुणं आलं बघा, पण ही तर गोंदनवाडीचं पाव्हणं!


मळ्यातल्या म्हातारीने पाण्याचा हौद दाखविला आणि ट्रॅक्टर मालकाने जागा दाखविली. प्रत्येकाने आपल्या आपल्या साहित्यासह तात्पुरतं बस्तान मांडलं. सगळी धुळे, नंदुरबारकडून आलेली. एक पूर्ण दिवस व रात्रीचा प्रवास करून, तोही या ट्रकातून, साहित्यसह! पायसुद्धा पसरायला मिळाले नसणार. तरुण पोरांनी इकडं तिकडं बघितलं. नवीन परिसर, माणसं, भाषा. मी एकाला खुणावलं. तो करुण चेहरा करून आला. ‘जयसिंग’ नाव सांगितलं त्यानं. बिचारा अंगाने बराच सुटलेला आणि एका हाताची तीन बोटं गायब. जरा बोलला. पहिल्यांदाच तोडीच्या कामावर आलाय. ऊस तोडायला जमेल का नाही, असं विचारताच, ‘जमणार’ म्हणाला. गड्याचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाटला. नाही तर काय करणार? जोडीचे पंचवीस हजार घेऊन आलाय, जमणार नाही म्हणून कोणाला सांगणार?


एक दोघं प्रातर्विधीला गेले, एका दोघांनी अंघोळी सुरू केल्या. तोवर चुली मांडायला सुरुवात झाली. मालकानं चहाची किटली आणली. सगळ्यांनी चहा ढोसला. इकडं तिकडं फिरणं सुरू झालं. तोवर काही लोकं भेटायला आली. कोणाला सोयाबीन काढायचं होतं, तर कोणाला भुईमूग उपडून घ्यायचा होता. सोयाबीनवाला जरा जास्तच खळीला आलेला. दहा-बारा जण आला तर दोन अडीच तासात माघारी येशीला, असं म्हणून मागं लागलेला. पाव्हणी एकामेकांकडे बघायला लागली. त्यांच्या भाषेत त्यांनी चर्चा करून ‘येतो’ म्हणून सांगितलं. पैसे ठरवून सोयाबीनवाल्यानं त्यांना घेऊन चालायला सुरुवात सुद्धा केली. बघता बघता पंधरा-वीस जणांचा पुट्टा त्याच्या मागून चालला. दोन दिवसांचा प्रवास, व्यवस्थित झोप नाही, खाणं नाही पण पाव्हणी चालली कामाला. मी जयसिंगला विचारले तर मला म्हणाला, ‘‘आता थांबून काय करायचं? दुपारपर्यंतच तर काम आहे.’’


वस्तीवर मागं आलो तर मामा अजून दगडावरच टेकलेला. त्याला म्हणालो, ‘‘आपण त्यांना गबाळी म्हणतो. पण खरं कामाची तर तीच माणसं आहेत. आपल्याकडं कसं आहे? एकदा टेकलं की उठायचं का? उठलंच पाहिजे का? असा विचार करणारी माणसं. मग ती कोण म्हणायची?’’ तो दात काढून हसला.


दोन दिवसांत लक्ष्मी देवळाजवळ पाव्हण्यांनी पालं टाकली. काट्या रोवून त्यावर बांबूच्या पट्ट्या मारल्या. बाहेर चुली मांडल्या. बाजूला एक बाजलं टाकून, गडी त्यावर कलांडली. तरुण पोरांनी फासे, वाघरा टाकून शिकारीची तयारी केली. पोरं हिरो सारखी कपडे घालत असली तरी चांगलीच तयारीची होती. कारखाना सुरू होईपर्यंत डोंगरात फिरून त्यांनी जळणाची लाकडं गोळा केली आणि त्याच्या ढीग लावले. फिरता फिरता हाताला येणार्‍या झाडाच्या फांद्या मोडून पुढच्या जळणाची सोय केली. त्या चिपाडी बाईंन पण एक पोरगं काखेत मारून एकाला नवऱ्याच्या खांद्यावर ठेवलं, थोरल्याला हाताला धरलं आणि जंगलात फिरून लाकडं गोळा केली. गोळा केलेली लाकडं डोक्यावर घेऊन एका हाताने काखेतल्या पोराला धरून तिनं वस्ती गाठली. पोरांनी वाळव्याच्या नदीवर जाऊन दोन दिवसाची बेजमी होईल इतके मासे पकडून आणले.


परमुलखातून आलेला बुजरेपणा फक्त बोलताना दिसत होता पण जगण्याची धडपड करतानाचा बेडरपणा लपत नव्हता. आमच्या वस्तीजवळ लागलेले मधाचे पोळे त्यांनी लीलया उतरवले व हातावरच पिळून फस्त केले. मामाने दम देऊनही त्याला दाद न देता सापडलं तसं ससा, सायाळाचा बार उडवला.


तोपर्यंत दिवाळी आली. मी त्यांच्यासाठी लाडू आणि चिवडा घेऊन गेलो. मला वाटले की ती बारकी, बारकी पोरं माझ्या मागं चिवडा, लाडूसाठी पळत येतील, परंतु हाक मारून सुद्धा कोणीच माझ्याकडे लाडू, चिवडा घ्यायला आले नाहीत. शेवटी जयसिंगकडे सर्व खाऊ पिशव्या सोपवून मी तिथून गेलो. असेच शिल्लक राहिलेल्या जुन्या कपड्यांच्या बाबत सुद्धा झाले. मी इतके कपडे घेऊन गेलो परंतु त्यांच्यातल्या कुठल्याही तरुणानं त्याकडं ढुंकून सुद्धा बघितलं नाही.


एक दिवस मग अवकाळी पाऊस पडला. पालाच्या खालनं सुद्धा पाणी व्हायला लागलं. सगळी पाव्हणी देवळात जमली. चारही बाजूंनी पावसाने धिंगाणा घातला, पण एक पण पाव्हणा मेचला नाही. रात्रभर देवळात कोणी पसरला, कोणी डोळे मिटून टेकून बसला तर काहींनी पत्त्याचा डाव मांडला. दुसऱ्या दिवशी पाऊस पडून निसरड्या झालेल्या फडात एक टाक सगळे कोयते घेऊन उभे राहिले. उसात बिबट्या असलेल्याच्या बातम्या समाजमाध्यमात पसरायला लागल्या. एका फडामध्ये बिबट्याच्या मादीने जन्म दिलेली दोन पिलं सापडली. त्यानंतर तर भीतीचं वातावरण आणखी गडद झालं. रानावनात फिरणारी गावकरी अगदी बांधानं किंवा पांदीनं सुद्धा जायला घाबरू लागले. पण पाव्हणा घाबरला नाही. सकाळी भल्या पहाटे उठून हातात कोयते घेऊन तो फडात उभा ठाकला. रानात काम करताना त्याने कधी कोणाच्या वस्तूला हात लावला नाही की कोणाशी हुज्जत घातली नाही. तोडलेल्या उसाची वैरण त्याने लोकांना विकली. काहींनी पैसे दिले, काही वायदे करून निघून गेले. परंतु पाव्हणा उधारी ठेवलेल्यांच्या घरी वैरणीचे पैसे मागायला गेला नाही.


दिवाळीनंतर हळूहळू थंडी पडायला लागली. सगळ्या शिवारात गावातल्यापेक्षा जास्त थंडी वाजायला लागली. गावातली लोकं डोक्याला लोकरीच्या टोप्या घालून आणि अंगात स्वेटर घालून फिरायला लागली. गारठ्यानं एक वार एक घरातली सगळे आजारी पडायला लागली. पण पाव्हणा ना आजारी पडला का थांबून राहिला, फाटक्या तुटक्या आणि कसेबसे अंग झाकणाऱ्या कपड्यासह तो भल्या पहाटे कामाला लागला.


ऊस तुटायला लागला. रानं मोकळी व्हायला लागली. ट्रॅक्टरच्या रांगाच्या रांगा गावातनं बाहेर पडायला लागल्या. माणसं वेडीपिशी होऊन ऊस घालवायच्या मागं लागली. सकाळी सकाळी कारखान्याच्या ऑफिस बाहेर गर्दी व्हायला लागली. पाव्हण्यांचा पण भाव वाढला. दररोज तोडीला गेल्यावर चहा, सरबत मिळायला लागलं तर संध्याकाळी अर्धा अर्धा किलो चिकन वाटणीला येऊ लागलं. संध्याकाळी थकून आलेल्या जोडीतील बाई चुली पेटवायला लागली, तर गडी चुलाण्यावर पळायला लागले तर कोणी पत्त्याचा डाव टाकून बसले. पण कोणी थांबत नव्हता. हत्तीसारखा असूदे की चिपाडासारखा, पाव्हणा यंत्रासारखा कामाला लागला. ती चिपडी बाई आणि तिचा तरंगत आलेला नवरा सुद्धा मागे नव्हते. मुकादामाचे पैसे फिटून चार पैसे गाठीला लावायचे करिता सगळेच जिवाचे रान करायचे चालले होते. दुपारी वस्ती शांत असायची. ती दोन म्हातारी माणसं उगाच बारीक डोळं करून वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघत राहायचे. थकलेल्या शरीराकडे बघून एखादा वाटसरू शिल्लक जेवण द्यायचा, तर ते घ्यायला हात सुद्धा पुढे करायची ताकद त्यांच्यात नव्हती. लोकं खायचं समोर ठेवून निघून जायची. ती गतिमंद मुलगी पण खोपट्यात थांबायची, बाहेर बसून भांडी धुणे, धान्य नीट करायचे काम करायची आणि रस्त्यावर कोणाची चाहुल लागली की घाबरायची. तिचे डोळे करुण व्हायचे.


मी संध्याकाळी जयसिंगला वस्तीवर बोलवायचो. खरं तर बिचारा पहिल्यांदा ऊस तोडीच्या कामाला आलेला. पूर्वी मिलमध्ये काम करताना तीन बोटं गेलेली. एक-दोन दिवसांत तोडीचं काम शिकला. इतका जाड माणूस कसा वाकणार असं वाटायचं, पण त्यानं काम तडीला लावलं होतं. तो बसला की गावाकडच्या गोष्टी सांगायचा. चहा, कणीस दिले की लाजायचा. पण हळूहळू भीड चेपली, येता जाता हात वर करायला लागला, हाक मारून खुशाली विचारायला लागला. काही तरुण पोरं येऊन हौदावर अंघोळी करायची, गप्पा मारायची.

हळूहळू फेब्रुवारी संपला. हंगाम संपायला आला. परतीची तयारी सुरू झाली. हिशेब अंतिम करायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता शनिवारपर्यंत पाव्हणं चंबुगबाळं आवरून गोंदणवाडीला निघून गेली. ती पार थकलेली म्हातारी, गतिमंद मुलगी, सगळी परत गेली. देवळाजवळची जागा पुन्हा रिकामी झाली. एक भारद्वाज रिकाम्या झोपड्यांच्या जागेवर झालेल्या मुंग्या टिपत होता. औदुंबराच्या डोहात सोडलेल्या पण काठावरच तरंगत राहणाऱ्या नारळासारखी या गोंदणवाडीच्या पाव्हण्यांची आठवण वर्षभर मनात तरळत राहिली. आता पुन्हा हंगाम सुरू होईल आणि नवीन पाव्हणं अनामिक आशेच्या किरणांचे हात धरून गावात येतील.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari CM: ममता युगाचा अंत! सुवेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदाची शपथ; हे ५ दिग्गज मंत्रीही शपथबद्ध

कोण आहेत ९८ वर्षीय माखनलाल सरकार ? सुवेंदूंच्या शपथविधीआधी PM मोदी पडले पाया, वाकून केला नमस्कार

Cyclone Circulation Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा?, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह ६ राज्यांना इशारा

Jio-Airtel-Vi ची मनमानी आता बंद! सरकारने युजर्सना दिली मोठी खुशखबर, नवे नियम जाणून घ्या

पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'! ५५ वर्षीय सुवेंदू अविवाहित का? आदर्श मानलेल्या तिघांच्या पावलावर पाऊल

SCROLL FOR NEXT