‘‘आज जे अन्न आपण खातो, त्यात पोषण किती अन् विष किती? याची तुलना केल्यास उत्तर काय असेल हे सर्वांनाच ठाऊक आहे. या अन्नातूनच आपल्या शरीरात वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळते. पण या समस्येचे मूळ शोधायला गेलो तर ते आपल्या जमिनीत, मातीत आहे. या मातीतच तुम्ही विषाचा पेरा करत असाल, तर तिच्यातून विषच उगवेल. हे विष म्हणजे रासायनिक खते अन् त्यांचा सुरू असलेला प्रमाणाबाहेरचा वापर. यावरच मी काही करू शकतो का? याचा विचार केला अन् त्यातून पुढे आली ''गोवर्धन गांडूळ खत'' निर्मितीची संकल्पना. यातून तयार होणारे खत हे मातीला पोषणच देते आणि माणसांच्या शरीरालाही.’’ ही कैफियत मांडतात, पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील गराडे गावचे रहिवासी, शेतकरी अन् आता उद्योजक असलेले सोपानराव रावडे.
जमिनीची ढासळती सुपीकता, रासायनिक खतांचे दुष्परिणाम आणि यामुळे मानवी आरोग्यावर होणारे धोके आज जगभरात चिंतेचा विषय बनले आहेत. अशा काळात सोपानराव रावडे यांच्या पुढाकारातून उभा राहिलेला ‘गोवर्धन गांडूळ खत निर्मिती उद्योग’ हा सेंद्रिय शेती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे. निसर्गाचा समतोल राखत, शुद्ध अन्नधान्य पिकवणे आणि शेतीला पुन्हा स्वावलंबी बनवणे या हेतूने उभारलेल्या या प्रकल्पाची ही प्रेरणादायी यशोगाथा.
**स्वप्न, प्रत्यक्ष प्रकल्प ते उद्योग
या प्रकल्पाची मुळे साधारण दोन दशकांपूर्वी रुजली. २००४ साली सोपानराव यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, शिवाजीनगर, पुणे (एमसीईडी) येथून सेंद्रिय शेतीसंबंधित एक प्रशिक्षण घेतले. यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे समाजात पसरणाऱ्या आजारांची जाणीव त्यांना झाली, तसेच यावर शाश्वत उपाय म्हणजे सेंद्रिय शेती अन् या सेंद्रिय शेतीचा आत्मा ठरते ते म्हणजे सेंद्रिय, नैसर्गिक खत. यातूनच पुढे आली ‘गांडूळ खत’ निर्मितीची कल्पना!
२००४ मध्ये अवघ्या ३,५०० रुपये प्रति किलो दराने गांडुळ कल्चर खरेदी करून गावी या प्रकल्पाचा छोटा पाया त्यांनी रचला. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतर करावे लागल्याने काही काळ हा उपक्रम थांबला. परंतु, मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२२ च्या उत्तरार्धात (कोरोना काळानंतर) पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून गोवर्धन गांडूळ खत प्रकल्पाचा पुनर्जन्म झाला. धनलक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांच्या भांडवलातून विटांचे वाफे (बेड्स) बांधून या व्यवसायाची नव्याने सुरुवात करण्यात आली.
बचत गटाच्या अध्यक्षा संध्या रावडे सांगतात की, ‘‘या प्रकल्पाबद्दल जेव्हा सविताताईंनी बचत गटात चर्चा केली, तेव्हा त्यास मदत करण्यास आम्ही सर्व सदस्यांनी एकमताने होकार दिला. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना नाममात्र व्याजाने दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. आज त्यांच्या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. बचत गट म्हणून यामध्ये आम्ही सहभागी झालो याचा आम्हाला अभिमान आहे.’’
**गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया
गांडूळ खत तयार करणे ही एक शास्त्रोक्त आणि बारकाईने करावी लागणारी प्रक्रिया आहे. या प्रकल्पात खालील टप्प्यांद्वारे खत निर्मिती केली जाते :
*कच्चा माल व शेणाची प्रक्रिया : आजूबाजूच्या परिसरातील गोठ्यांतून गाई-म्हशींचे शेण आणले जाते. शेणामध्ये मिथेन गॅस आणि प्रचंड उष्णता असते. त्यामुळे हे शेण आधी मोकळ्या जागेवर साचवून त्यावर सलग पाणी मारून ते पूर्णपणे थंड केले जाते.
*वाफे व्यवस्थापन : ४ फूट रुंद आणि १० फूट लांब (काही ठिकाणी ३० फूट लांब) विटांचे वाफे तयार केले जातात. थंड झालेले शेण या बेडवर पसरवून त्यावर पुन्हा पाणी मारले जाते. तापमानाचा अंदाज घेऊन शेण पूर्ण थंड झाल्याची खात्री केली जाते आणि यामध्ये गांडूळ सोडले जातात.
*गांडुळांची जात व प्रमाण : या प्रकल्पात प्रामुख्याने ‘आयसिनिया फेटेडा’ (Eisenia Fetida - ऑस्ट्रेलियन प्रजाती) आणि ‘युड्रीलस युजिनी’ (Eudrilus Eugeniae - आफ्रिकन प्रजाती) या दोन प्रमुख प्रजातींचा वापर केला जातो. १० फुटांच्या एका बेडवर साधारण १० किलो गांडूळ कल्चर सोडले जाते.
*उत्पादन कालावधी (सायकल) : साधारणपणे ६० ते ७० दिवसांत गांडूळ शेणाचे पचन करून उत्तम दर्जाचे खत तयार करतात. या काळात १० किलो गांडुळांची वाढ होऊन ती १५ ते १६ किलो होतात. तयार झालेले खत सुकवून, चाळून आणि पॅकिंग करून विक्रीसाठी तयार केले जाते, तसेच वाढलेल्या गांडुळांचीही गांडूळ बीज म्हणून विक्री केली जाते.
**व्यावसायिक गणित आणि नफा
गोवर्धन सेंद्रिय गांडूळ खत उद्योग केवळ शेतीपूरक व्यवसाय नसून एक यशस्वी आर्थिक मॉडेल बनल्याचे सोपानराव सांगतात.
*उत्पादन क्षमता : एका सायकलमध्ये (दोन महिन्यांत) या प्रकल्पातून सुमारे १५ टन गांडूळ खताचे उत्पादन होते.
*दर रचना : (तक्ता करणे)
शेतकऱ्यांसाठी ४० किलोच्या बॅगसाठी १२ रुपये प्रति किलो.
२० किलोच्या पॅकिंगसाठी १५ रुपये प्रति किलो.
तर, नर्सरी आणि होलसेल विक्रेत्यांसाठी २० रुपये प्रति किलो.
नवीन प्रकल्प सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी गांडूळ बीज (गांडूळ कल्चर) ४०० रुपये प्रति किलो दराने दिले जाते.
*आर्थिक नफा : एका सायकलमध्ये सुमारे १.५ ते २ लाख रुपयांचे उत्पन्न (टर्नओव्हर) मिळते. यामध्ये ५० टक्के उत्पादनाचा खर्च (शेण, मजुरी, पाणी) असून उरलेला ५० टक्के निव्वळ नफा मिळतो.
**कौटुंबिक सहभाग
या संपूर्ण व्यवसायात सोपानराव रावडे यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोठी साथ लाभली आहे. त्यांची मुलगी स्मिता रावडे या गुगल ॲड्स, यूट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम या समाज माध्यमातून डिजिटल मार्केटिंग आणि शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम उत्तमरित्या सांभाळतात, तसेच त्यांच्या पत्नी सविता रावडे यांच्यासह इतर कुटुंबीय नीलम रावडे, वैभव रावडे आणि ओम रावडे हे सर्वजण मिळून या कौटुंबिक व्यवसायाला हातभार लावतात आणि त्याचे व्यवस्थापन पाहतात. आज गराडे गावासह चांबळी, नसरापूर, मुळशी आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी या गांडूळ खताचा वापर करतात.
**वर्मीवॉश (गांडूळ पाणी) व अतिरिक्त उत्पन्न
गांडूळ खतासोबतच या प्रकल्पातून ‘वर्मीवॉश’ (गांडूळ पाणी) हे अत्यंत प्रभावी द्रवरूप खत (लिक्विड फर्टिलायझर) गोळा केले जाते. यामध्ये गांडूळ खतातील सर्व सूक्ष्म पोषक घटक असतात. एक लिटर वर्मीवॉश नऊ लिटर पाण्यात मिसळून (१:१० प्रमाणात) पिकांवर फवारणी केल्यास पिकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि वाढ कमालीची होत असल्याचे सोपानराव स्वानुभवातून सांगतात. दर महिन्याला सुमारे ५० लिटर (मागणीनुसार) वर्मीवॉशची विक्री होते. प्रति लिटर ५० रुपये दराने ही विक्री केली जाते.
**जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकतेवर झालेला परिणाम
रासायनिक खते ही पिकांचे उत्पादन कमी काळात जास्त देत असले, तरी हा अल्पकाळाचा नफा जमीन अन् मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. याबाबत पंजाब, हरियाणाचे उदाहरण बोलके असल्याचे सांगून तेथील जमिनीतील क्षार, ‘कॅन्सर ट्रेन’ यांचा धोका सोपानराव आवर्जून नमूद करतात. तर याउलट, सेंद्रिय खत हे जमिनीचे आणि पिकांचे ‘अन्न’ बनून शाश्वत पोषणाची हमी देतात अन् यामुळे मानवी आरोग्यही सुदृढ राहते. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील ‘ऑरगॅनिक कार्बन’चे प्रमाण वाढते. (जे किमान १% असणे गरजेचे आहे, परंतु आजकाल ते ०.२% पर्यंत खालावले असल्याचे सोपानराव सांगतात.) तसेच, मातीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते आणि पिकांना सूक्ष्म पोषणतत्त्वे मिळतात. यामुळे मातीचा पीएच (pH) संतुलित होऊन पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे सोपानराव सांगतात.
*उत्पादनात वाढ : पिकाच्या एकूण उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची वाढ दिसून आली असून, भाजीपाल्याची नैसर्गिक चव टिकून दर्जा कमालीचा सुधारतो.
**शेतकऱ्यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव
*कांदा पीक : कांद्यासाठी हे खत वापरल्याने कांद्याचा आकार एकसारखा मोठा झाला आणि साठवणुकीदरम्यान होणारी कांदा सडण्याची समस्या (जी आधी २५ ते ४०% असायची) पूर्णपणे थांबल्याचे शेतकऱ्यांनी वापरानंतर सांगितले.
*फूल शेती : फूल शेतीच्या अनुभवाबद्दल सांगताना नवनाथ रावडे म्हणतात, ‘‘फुलांचा बहार जो सामान्यतः २ महिने चालायचा, तो या खतामुळे २.५ ते ३ महिन्यांपर्यंत वाढला. २ ते ३ तोडे जास्त मिळाले आणि फुलांना लकाकी व तेज आले.’’
**तरुण उद्योजक, शेतकऱ्यांना संदेश
‘‘रासायनिक खतांचे व्यसन सोडवून शेतीला सेंद्रिय खतांचे अन्न देणे ही काळाची गरज आहे,’’ असे ठाम मत सोपानराव रावडे व्यक्त करतात. ज्या शेतकऱ्यांकडे १-२ जनावरे आहेत, त्यांनी शेणखत थेट शेतात न टाकता गांडुळ खत तयार करून वापरण्याचा सल्ला ते देतात. कारण, शेणखत कुजायला दीड-दोन वर्षे लागतात, तर गांडूळ खत २ महिन्यांत तयार होते.
भविष्यात दरवर्षी १,००० टन खताचे उत्पादन व विक्री करण्याचे आणि जास्तीत जास्त शेतकरी व शहरी बागायतदारांमध्ये (टेरेस/किचन गार्डन) सेंद्रिय शेतीबद्दल जागृती निर्माण करण्याचे गोवर्धन खत निर्मिती उद्योगाचे ध्येय आहे. नवीन तरुणांना या व्यवसायात उतरण्यासाठी सोपानराव स्वतः महिन्याच्या शेवटच्या शनिवार/रविवारी ३ तासांचे प्रशिक्षणही देतात.
सोपानराव रावडे यांनी उभारलेला गोवर्धन गांडूळ खत उद्योग हा केवळ खत बनवण्याचा कारखाना नसून, तो विषमुक्त अन्नाचा आणि सुपीक जमिनीचा पाया मजबूत करणारा एक विचार आहे. सविता रावडे, स्मिता रावडे, नीलम रावडे, वैभव रावडे आणि ओम रावडे या संपूर्ण कुटुंबाच्या साथीने अल्प भांडवलात, योग्य मार्गदर्शनाखाली आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण व शहरी भागातही हा व्यवसाय कसा यशस्वी केला जाऊ शकतो, याचे गोवर्धन खत निर्मिती उद्योग हे एक उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण ठरते!
- सोपानराव रावडे (गराडे, ता. पुरंदर) - ८४२१२६४६४२
- स्मिता रावडे - ८३०८९०६९०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.