सोशल मीडियाचा वापराबाबत आचारसंहिता
प्रांताधिकारी इथापे; सरकारी कर्मचाऱ्यांनी उल्लंघन केल्यास कारवाई
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १ : पंढरपूर तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कार्यरत असलेले काही अधिकारी व कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षांचा किंवा विशिष्ट उमेदवारांचा उघडपणे प्रचार करत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे ठरत आहे. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे तरतुदींची उल्लंघन करणारे आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिला आहे.
मुख्य नियमानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार कोणताही सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय आंदोलनात किंवा राजकारणात भाग घेणार नाही. तसेच, कोणत्याही विधानमंडळाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार किंवा प्रभाव टाकणार नाही. सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार प्रचार व पोस्ट करणे टाळावे. कर्मचारी आपल्या वैयक्तिक किंवा अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह, पोस्ट, व्हिडिओ किंवा उमेदवाराचे समर्थन करणारे स्टेट्स ठेवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे टीका-टिप्पणी करू नये. शासन निर्णयांवर किंवा राजकीय नेत्यांवर सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह टीका करणे हे गैरवर्तणूक समजले जाते. तेव्हा सोशल मीडियाच्या ग्रुप ॲडमिनची जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. जर एखादा कर्मचारी व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन असेल आणि त्या ग्रुपवर राजकीय प्रचार होत असेल, तर तो रोखणे किंवा तशा पोस्ट डिलीट करणे ही संबंधित कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे. निमसरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील आचारसंहितेचे नियम लागू करण्यात आले आहेत.
चौकट
प्रशासनाची प्रतिमा मलिन करू नका
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियाचा वापर केवळ कार्यालयीन कामे किंवा वैयक्तिक कारणांसाठी (राजकीय हेतू सोडून) करावा. कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार करताना आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यास जबाबदार धरून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही इथापे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.