सरकारी शाळांचे विदारक चित्र
राज्यात तब्बल एक हजार २७४ एक शिक्षकी शाळा असून पुणे जिल्ह्यात ५०४ एक शिक्षकी शाळा आहेत. याबाबतीत एक शिक्षकी शाळांमध्ये पुणे जिल्ह्याचा राज्यात आठवा क्रमांक आहे. राज्यातील एक शिक्षकी शाळांत एकूण एक लाख ७९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा शाळांत शिक्षकावर अध्यापनाबरोबरच शाळा व्यवस्थापन, अनेक शासकीय कामांचा भारही असतो. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास निम्म्या एक शिक्षकी शाळा या केवळ आठ जिल्ह्यांत आहेत. सरकारी शाळांचे हे विदारक चित्र अतिशय चिंताजनक आहे. राज्य सरकारकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दावे केले जात असले तरी वेगळेच चित्र समोर आले आहे. एक शिक्षकी शाळेत शिक्षक कसे शिकवत असतील, हा प्रश्न पडतो.
- शांताराम वाघ, पुणे
घातक एनर्जी ड्रिंकवर हवी बंदी
शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणात हानिकारक एनर्जी ड्रिंकची सर्रास विक्री होते. गरज नसताना ‘फॅशन’ म्हणून ते प्यायले जाते. बाटलीवरच ‘हे पेय आरोग्यास हानिकारक असल्याचा वैधानिक इशारा छापलेला असताना केवळ शाळांच्या आवारात यावर बंदी घालून चालणार नाही, तर त्या उत्पादनावरच कायमची बंदी हवी. या पेयात वापरले जाणारे पदार्थ शरीराला घातक ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे. आता सरकारने आणखी वाट पाहू नये.
- शशिकांत हरिसंगम, पुणे
व्यंगचित्रातून योग्य वर्णन
‘सकाळ’च्या १४ जुलैच्या अंकातील अलोक यांनी रेखाटलेले व्यंगचित्र फारच प्रभावी व बोलके होते. व्यंगचित्र ज्या घटना घडतात त्या विषयाबद्दल असते. त्यावेळी त्याला शब्दांची गरज भासत नाही. अलोक यांची व्यंगचित्रेही मार्मिक असतात. फक्त एक व्यंगचित्र पाहून वाचकाला सर्व विषय सहज समजतो एवढी ताकद त्या व्यंगचित्रात असते. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना थाटामाटात सुरू केली. आता मात्र ही योजनाच राज्य सरकारचे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. म्हणजे ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’, अशी अवस्था झाली आहे. त्यांचे अतिशय योग्य वर्णन अलोक यांनी केले आहे.
- अजय भुजबळ, सातारा
आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे कल
‘आरोग्याचा भारतीय महामार्ग!’, ही आयुर्वेदाबाबतची माहिती महत्त्वाची आहे. सध्या आयुर्वेदाचा वापर करण्याची मानसिकता वाढत आहे. खरे तर कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये विश्वास असणे महत्त्वाचे असते. तसेच रुग्ण व डॉक्टर यांच्यात समन्वय असावा लागतो. आयुर्वेदामध्ये पथ्ये सांगितली आहेत. ते कटाक्षाने पाळणे महत्त्वाचे असते. अनेकदा आजाराला कंटाळून आयुर्वेदाचा आधार घेतला जातो. त्याचे सकारात्मक व दिलासा देणारे परिणामही रुग्णांना दिसतात.
- राजन बिचे, पुणे
पाणी बचत काळाची गरज
पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस. निसर्गाने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जगातील कोणत्याही कारखान्यात पावसाचे पाणी निर्माण होऊ शकत नाही. म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर धरणात साठवलेल्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पण त्यालासुद्धा साठवणूक मर्यादा आहे. लोकसंख्या वाढीमुळे, शेतीसाठी, उद्योगासाठी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. भूगर्भातील पाणी कमी असल्याने त्यालाही मर्यादा आहेत. म्हणून प्रत्येकाने जेथे शक्य होईल तेथे पाणी वापरात बचत करणे गरजेचे आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे भूजल पातळी वाढविणे आपल्याच हातात आहे. पुढील पाणी संकट ओळखून सरकारने व नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- सेवकराम लहाने, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.