पुणे

द्राक्षवेलींच्या रोपनिर्मितीसाठी गुटी कलमाचा पर्याय

CD

बुधवार पेस्टिंग
द्राक्षवेलींच्या रोपनिर्मितीसाठी गुटी कलमाचा पर्याय
--------------------------------
राम वाघ

गुटी कलम ही द्राक्षवेलींची जलद, प्रभावी आणि किफायतशीर अभिवृद्धी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये फांदी मातृवेलीशी जोडलेली असतानाच मुळांची निर्मिती होत असल्याने रोपांच्या जगण्याचे प्रमाण वाढते आणि रोपनिर्मितीस लागणारा कालावधी कमी होतो.
-----------------------------------
द्राक्षबागेच्या यशस्वी लागवडीसाठी निरोगी, जोमदार व मूळ जातीच्या गुणधर्मांची जपवणूक करणारे दर्जेदार रोपांची उपलब्धता महत्त्वाची असते. पारंपरिक पद्धतीमध्ये द्राक्षांची अभिवृद्धी प्रामुख्याने हार्डवुड कटिंग्जद्वारे केली जाते. मात्र, रोपनिर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या
पद्धतींबरोबरच गुटी कलमाचा एक पर्यायी मार्ग म्हणून विचार करता येतो. त्यामुळे उत्तम दर्जाच्या रोपांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पर्यायी अभिवृद्धी तंत्रांनाही महत्त्व प्राप्त होत आहे. त्यातील प्रभावी पद्धत म्हणजेच गुटी कलम (Air Layering) होय.

गुटी कलम ः
या पद्धतीमध्ये फांदी मातृवेलीला जोडलेली असतानाच तिच्यावर मुळांची निर्मिती केली जाते. त्यामुळे नवीन मुळे तयार होईपर्यंत त्या फांदीला मातृवेलीपासून पाणी व अन्नद्रव्यांचा अखंड पुरवठा होत राहतो. पुरेशी मुळे तयार झाल्यानंतर गुटी मातृवेलीपासून वेगळी करून
स्वतंत्र रोप म्हणून वाढवता येते.

द्राक्षामध्ये गुटी कलम का करावे?
१. रोपनिर्मिती जलद गतीने होते.
२. मुळे तयार होईपर्यंत मातृवेलीपासून पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा मिळतो.
३. मुळांची जोमदार वाढ झालेली रोपे मिळतात.
४. मुळांची वाढ चांगली असल्याने रोपांची तग धरण्याची क्षमता अधिक चांगली राहते.
५. मातृवेल प्लॉटमधून वेळोवेळी नवीन रोपे तयार करता येतात.
६. मूळ जातीच्या गुणधर्मांची जपवणूक होते.

आवश्यक साहित्य
गुटी कलमासाठी खालील साहित्याची आवश्यकता असते: धारदार ग्राफ्टिंग किंवा बडिंग चाकू, सिकेटर्स, IBA (Indole-३-Butyric Acid) ३००० पीपीएम द्रावण, कापूस, ओलसर स्फॅग्नम मॉस, २०० गेज जाडीचे पारदर्शक पॉलिथीन, दोरा किंवा प्लॅस्टिक टाय, ग्रोइंग बॅग, योग्य वाढ माध्यम (Potting Media).

---------------
मातृवेल प्लॉटपासून सुरुवात

१) या पद्धतीसाठी सुरुवातीला रूटस्टॉकचा मातृवेल प्लॉट तयार करावा. यासाठी निरोगी
आणि मुळयुक्त रूटस्टॉकच्या काड्या शेतामध्ये लावून त्यांची जोमदार वाढ करून घ्यावी.
उदाहरणार्थ, डॉगरीजसारख्या रूटस्टॉकच्या मुळयुक्त काड्या साधारण ३ × १.८ मीटर
अंतरावर लावून मातृवेल तयार करता येतो. वेलींची वाढ चांगली होण्यासाठी पाणी, खत,
आधार आणि इतर आवश्यक बागायती व्यवस्थापन वेळेवर करावे.
मातृवेली निरोगी आणि जोमदार असणे महत्त्वाचे आहे. कारण पुढील प्रक्रिया याच वेलीवर
केली जाणार आहे.

२) रूटस्टॉकवर इच्छित वाणाचे ग्राफ्टिंग ः रूटस्टॉकची चांगली वाढ झाल्यानंतर त्यावर इच्छित द्राक्षवाणाच्या पेन्सिल जाडीच्या, परिपक्व व निरोगी फांद्यांचे ग्राफ्टिंग करावे. कलम यशस्वी झाल्यानंतर जोमदार वाढ झालेल्या वेली गुटी कलमासाठी निवडाव्यात.

३) गुटी कलमासाठी फांद्यांची निवड ः गुटी कलमासाठी निवडलेली फांदी निरोगी, जोमदार व सक्रिय वाढीची असावी. फांदीची जाडी पेन्सिलएवढी असावी. त्यावर ७ ते ८ चांगल्या विकसित गाठी (Nodes) असाव्यात. दोन गाठींमधील सरासरी अंतर ६ ते ७ सेंमी असावे. जोमदार फांद्यांमध्ये मुळांची निर्मिती अधिक चांगली होते. गुटी करण्याचे ठिकाण ग्राफ्टच्या खालील रूटस्टॉक भागावर असावे. ही या तंत्रातील सर्वात महत्त्वाची बाब आहे.

४) साल काढणे (Girdling) ः निवडलेल्या फांदीवर जमिनीपासून सुमारे १० सेंमी उंचीवर दोन गाठींमधील भागात सुमारे २ सेंमी रुंदीची साल पूर्णपणे काढून टाकावी. ही प्रक्रिया धारदार व स्वच्छ चाकूने करावी. साल काढताना आतील लाकडी भागाला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. साल काढल्यामुळे अन्नद्रव्ये व वाढीस प्रोत्साहन देणारे घटक खाली जाण्याचा मार्ग बंद होतो. परिणामी हे घटक जखमेच्या वरच्या भागात साठून मुळांच्या निर्मितीस चालना देतात.

५) मुळांच्या वाढीसाठी संजीवकाचा वापर ः साल काढलेल्या भागावर आयबीए (IBA) ३००० पीपीएम द्रावण कापसाच्या सहाय्याने समान रीतीने लावावे. यामुळे मुळांची निर्मिती लवकर होते. मुळांची संख्या, लांबी व गुणवत्ता वाढते.

६) गुटी बांधणी ः आयबीए लावल्यानंतर साल काढलेल्या भागाभोवती ओलसर स्फॅग्नम मॉस लावावा. त्यानंतर हा भाग २०० गेज जाडीच्या पारदर्शक पॉलिथिनने व्यवस्थित गुंडाळून दोन्ही टोके दोऱ्याने घट्ट बांधावीत. यामुळे आवश्यक आर्द्रता टिकून राहते. आतमध्ये मुळांच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होते. पारदर्शक पॉलिथिनमुळे मुळांची वाढ सहजपणे पाहता येते.

७) मुळांच्या निर्मितीचे निरीक्षण ः साधारणपणे २५ ते ४० दिवसांनंतर स्फॅग्नम मॉसमध्ये नवीन मुळे दिसू लागतात. पारदर्शक पॉलिथीनमुळे मुळांची वाढ बाहेरून निरीक्षण करता येते. पुरेशी मुळे तयार होईपर्यंत गुटी मातृवेलीवरच ठेवावी.

८) मुळयुक्त गुटी वेगळी करणे ः योग्य प्रमाणात मुळे तयार झाल्यानंतर सिकेटरच्या सहाय्याने मुळांच्या खालील भागातून स्वच्छ कट देऊन गुटी मातृवेलीपासून वेगळी करावी. यावेळी नवीन मुळांना इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

९) गुटीचे संगोपन ः वेगळी केलेली गुटी सावलीत ठेवावी. पॉलिथिन काळजीपूर्वक काढावे. मुळांभोवती असलेले स्फॅग्नम मॉस शक्यतो तसेच ठेवावे. मुळांची जास्त हाताळणी केल्यास त्यांचे नुकसान होऊन रोपांच्या जगण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

१०) रोपवाटिका निर्मिती ः मुळयुक्त गुटी योग्य वाढ माध्यम असलेल्या ग्रोइंग बॅगमध्ये लावावी. वाढ माध्यमासाठी माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणखत किंवा कोकोपीट यांचे मिश्रण वापरता येते. सुरुवातीला रोपे अंशतः सावलीत ठेवून त्यांचे संगोपन करावे. नियमित पाणी दिल्यास रोपांची वाढ चांगली होते. योग्य पाणी व्यवस्थापन आणि आवश्यक संगोपन केल्यास साधारण ३० ते ४५ दिवसांत ही रोपे शेतामध्ये मुख्य लागवडीसाठी स्थलांतरित करण्यास योग्य होतात.

निष्कर्ष
गुटी कलम ही द्राक्षवेलींच्या अभिवृद्धीसाठी जलद व प्रभावी पद्धत ठरू शकते. गुटी
कलमामध्ये रूटस्टॉकवर प्रथम इच्छित वाणाचे ग्राफ्टिंग करून त्यानंतर ग्राफ्टच्या खालील
रूटस्टॉक भागावर मुळांची निर्मिती केली जाते. त्यामुळे एकाच प्रक्रियेत रूटस्टॉकचे गुणधर्म
आणि इच्छित वाणाचा वरचा भाग असलेले कलमयुक्त रोप तयार करण्याची संधी मिळते. या पद्धतीमध्ये फांदी मातृवेलीशी जोडलेली असतानाच मुळांची निर्मिती होत असल्याने
रोपे जगण्याचे प्रमाण वाढते. रोपनिर्मितीस लागणारा कालावधी कमी होतो.
योग्य मुळप्रवर्तक, ओलसर स्फॅग्नम मॉस, योग्य आर्द्रता आणि मुळांची पुरेशी वाढ
झाल्यानंतर केलेले विलगीकरण या बाबी पाळल्यास जोमदार मुळांची निर्मिती आणि पुढील रोपस्थापना चांगली होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे द्राक्षवेलींच्या रोपनिर्मितीसाठी गुटी कलम पद्धत एक चांगला पर्याय ठरू शकते.

राम वाघ, ९५११६३९०१३
पीएच.डी. विद्यार्थी, फळ विज्ञान विभाग, शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू आणि काश्मीर.

०००००००००००००००००
द्राक्षवेलींची गुटी कलमाद्वारे जलद, अनुकूल रोपनिर्मिती

PNE26W39538 पेन्सिल आकाराच्या काडीची साल अलगद आतील लाकडाला इजा न करता काढावी.
PNE26W39539 साल काढलेल्या जागेवर ओलसर स्फॅग्नम मॉस लावावे.
PNE26W39540 पारदर्शक प्लॅस्टिकच्या साह्याने व्यवस्थित बांधून घ्यावे.
PNE26W39541 पॉलिथिन काढल्यानंतर गुटी मध्ये तयार झालेली मुळे.
PNE26W39542 मुळयुक्त गुटीचे ग्रोइंग बॅगमध्ये प्रत्यारोपण.
PNE26W39543 प्रत्यारोपणानंतर २० दिवसांनी झालेली रोपांची वाढ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT