पुणे

द्राक्षबागेत संजीवकांचा वापर करताना घ्यावयाची दक्षता

CD

द्राक्ष विशेषांक - सोमवार पेस्टिंग
----------------------
द्राक्ष बागेत संजीवकांचा वापर करताना घ्यावयाची दक्षता

डॉ. स. द. रामटेके, अप्पासो गवळी
-----------------------
गुणवत्तापूर्ण व उच्च प्रतीचे द्राक्ष उत्पादन मिळविण्यासाठी बागेतील सर्व कामांचे व्यवस्थापन विचारपूर्वक करणे महत्त्वाचे ठरते. द्राक्षवेलीच्‍या अंतर्भूत क्रियेत बदल घडवून आणणारी महत्त्वाची रसायने म्हणजे संजीवकांचा वापर काटेकोरपणे करणे गरजेचे असते.
-----------------------------------

फळछाटणी कधी व कशी करावी?
पाऊस, तापमान, वेलीची परिपक्वता आणि अपेक्षित काढणीचा काळ यानुसार साधारण सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यांतील योग्य तारीख ठरवावी. द्राक्ष बागेत योग्य वेळी व योग्य पद्धतीने केलेल्या फळछाटणीमुळे घडांची संख्या, फळांचा आकार, गोडी आणि उत्पादनावर परिणाम होतो. काड्यांची तपासणी करून फळ छाटणी करावी.

फळछाटणी करताना घ्यावयाची काळजी
- वेलीची तपासणी करताना काडीची परिपक्वता, जाडी आणि डोळ्यांची स्थिती तपासून घ्यावी. त्यातील निरोगी, परिपक्व आणि रोगमुक्त काड्या ठेवाव्यात.
- फळ छाटणी घेण्याआधी कमीत कमी १५ दिवस आधी काडीचा नमुना तपासणीसाठी पाठवावा. तपासणीसाठी काडी काढताना एक डोळा सोडून काडी काढून घ्यावी. काढलेल्या काड्या फऱ्यामध्ये गुंडाळून पाणी लावून ठेवाव्यात. काड्या काढल्यानंतर डोळे तपासणीकरिता १० ते १२ तासाच्या आत प्रयोग शाळेत पाठवाव्यात. या काड्यांवरील प्रत्येक डोळ्यांची तपासणी सूक्ष्मदर्शकाखाली केली जाते. त्यावरून निष्कर्ष मांडले जातात. ते पुढील नियोजनासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
- थॉम्पसन सीडलेस, सोनाका, माणिक चमन यांसारख्या जातींमध्ये योग्य डोळ्यांची संख्या वेगवेगळी असू शकते.
- छाटणीनंतर पाणी, खत आणि रोग-किडींचे नियंत्रण यांचे नियोजन करा.

हायड्रोजन सायनामाइडची पेस्ट कशी लावावी?
- फळछाटणी झाल्यानंतर लगेच पेस्ट लावण्याऐवजी साधारण दुसऱ्या दिवशी लावण्याचा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राद्वारे मार्गदर्शनात दिला जातो.
- उत्पादनाच्या लेबलवरील सूचनेनुसार द्रावण तयार करा.
- योग्य पद्धतीने काडीच्या वरच्या २–३ डोळ्यांवर ब्रशने द्रावण लावा. डोळ्यांची सूज, काडीची जाडी आणि हवामान यानुसार उपचार बदलू शकतात.
- प्रक्रियेवेळी हातमोजे, डोळ्यांचे संरक्षण आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा. हे रसायन त्वचेवर किंवा डोळ्यांत लागू देऊ नका.

सर्वसाधारणपणे फळछाटणी ही ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. फळछाटणी ही प्रत्यक्ष उत्पादनाशी निगडित असते. फळछाटणीच्या वेळी झालेल्या सामान्य वाटणाऱ्या चुकांमुळे देखील पूर्ण हंगाम वाया गेल्याची बरीच उदाहरणे आहेत. बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये योग्य त्या प्रमाणात हायड्रोजन सायनामाइडची मात्रा न दिल्याने एक तर फुटी निघण्याचे प्रमाण कमी राहते किंवा येणाऱ्या फुटी अनियंत्रित फुटून येतात. फळ छाटणीनंतर सर्व फुटी एकाच वेळी (सर्वच जाडीच्या) एकसमान निघणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे बागेत एकाच वेळी एका अवस्थेत जास्तीत जास्त घड असल्यामुळे संजीवकांचा प्रभावीपणे वापर करता येतो. तसेच कीड व रोगांचे व्यवस्थापनही कार्यक्षमपणे करता येते.

हायड्रोजन सायनामाइडचा वापर :
फळ छाटणी झाल्यानंतर काडीवरील ठरावीक डोळ्यांमधून फूट येऊन त्यातील घडाचा विकास होणे महत्त्वाचे असते. फळछाटणीनंतर काडीवरील इच्छित डोळ्यांमधून एकसारख्या फुटी निघण्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला जातो.
अलीकडे अनेक द्राक्ष बागायतदार हे रसायन दोनदा लावत असल्याचे दिसून आले आहे. या पद्धतीमध्ये साधारणतः ४० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून दोनदा दिवसाआड लावले जाते. पेस्टींग केल्यानंतर ३/४ टक्के हायड्रोजन सायनामाइड २० तासांत शोषले जाते. त्यामुळे ते वेलीला ८० मि.लि. प्रति लिटर असे होत नाही.
हायड्रोजन सायनामाइडचे द्रावण तयार करताना काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायनामाइडचे प्रमाण ठरवले पाहिजे. उदा. सहा मि.मी. जाडीची काडी असेल तर ४० मि.लि., आठ मि.मी. साठी ५० मि.लि., १० मि.मी. जाडीसाठी ६० मि.लि. व १२ मि.मी. जाड काडीसाठी साधारणतः ८० मि.लि. हायड्रोजन सायनामाइड प्रति लिटर पाणी या प्रमाणे वापरावे आणि ते एकदाच वापरावे.
एकसारख्या जाडीच्या काड्या मिळविण्यासाठीचे नियोजन खरड छाटणीमध्येच करावे लागते. ज्या बागेमध्ये समान जाडीच्या काड्या असतील किंवा काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला तरच एकसारख्या फुटी निघण्याची शक्यता निर्माण होते.
१) द्राक्ष बागेमध्ये जर समान जाडीच्या काड्या असतील तर त्या काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन
सायनामाइड लावावे. त्यामुळे फुटी एकसारख्या निघण्यास मदत होईल .
२) काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करावी. बऱ्याच वेळा द्राक्ष बागांमध्ये वेगवेगळ्या जाडीच्या काड्या दिसून येतात. ६ मि.मी. पासून १२ मि.मी. जाडीच्या काड्या आढळतात. अशा काड्यांना जर एकाच तीव्रतेचे द्रावण लावले गेले तर कमी जाडीच्या काड्या लवकर फुटतील व जाड काड्यांना फुटण्यास जास्त वेळ लागेल. असे होऊ नये यासाठी काडीच्या जाडीनुसार पेस्टींग करणे आवश्यक आहे. पेस्टींग एकदाच करावे.
‘टायगर बड’ फोडून काढायचा असेल तर दोन गोष्टींचा विचार आवश्यक आहे.
छाटणी करताना ‘टायगर बड’ पुढे जास्त डोळे ठेवून येतात. एक डोळा असेल तरच ‘टायगर बड’ फुटून निघतो. दोन किंवा जास्त डोळे ठेवल्यास वरचे डोळे (टोकाकडील) फुटतात. परंतु टायगर बड फुटून निघू शकत नाही. अशा टायगर बड फुटण्यासाठी इतरांच्या तुलनेत हायड्रोजन सायनामाइडचे प्रमाण जास्त घेणे गरजेचे ठरते. म्हणूनच काडीवरील अन्य डोळ्यांसाठी ४० मि.लि. प्रति लिटर प्रमाण घेत असाल, तर टायगर बडसाठी हेच प्रमाण ५० मि.लि. प्रति लिटर एवढे घ्यावे. गरजेनुसार हायड्रोजन सायनामाइडच्या द्रावणात बुरशीनाशक किंवा कीडनाशकांचा वापर करता येऊ शकतो. तसेच या द्रावणात लाल रंग वापरून रसायनाची पेस्टिंग योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करता येते.

गुणवत्तापूर्ण व उच्चप्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी खालीलप्रमाणे संजीवकाचा वापर करावा.

१) हायड्रोजन साइनामाइड (H२CN२)
हायड्रोजन साइनामाइड या संजीवकाचा वापर एकसारख्या फुटींच्या निर्मितीसाठी तक्त्यात दिल्याप्रमाणे एकदाच करावा.
----------------------
तक्ता.१ काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन साइनामाइडचे (H२CN२) घ्यावयाचे प्रमाण

काडीची जाडी (अंदाजे) --- हायड्रोजन सायनामाइड प्रमाण (मि.लि. प्रति लिटर पाणी)
६ मि.मी (करंगळीची जाडी) --- ४० मि.लि.
८ मि.मी. (मधल्या बोटाची जाडी) --- ५० मि.लि.
१० मि.मी. (मधल्या बोटाची जाडी )--- ६० मि.लि.
१२ मि.मी (अंगठ्याची जाडी) --- ८० मि.लि.
--------------------------

२) घडाचे आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा योग्य वापर
प्रीब्लूम अवस्थेत जीएचा वापर महत्त्वाचा ठरतो. द्राक्ष पिकांचे उत्पादन हे घडाच्या आकारमानावर अवलंबून असते. निर्यातक्षम द्राक्षघडाचे आकारमान साधारणतः ३५० ग्रॅम पेक्षा जास्त तसेच ७५० ग्रॅम वजनापेक्षा कमी असावे.

जीएचे द्रावण तयार करणे :
संजीवकांचे द्रावण तयार करताना विरघळणारे रसायन वापरले जाते. जीएचे द्रावण तयार करताना ॲसिटोनचा किंवा इथेनॉलचा वापर केला जातो. त्यासाठी ५० मि.लि. ॲसिटोन प्रति ग्रॅम जीए वापरावे, परंतु २५-३० मि.लि. ॲसिटोनमध्ये १ ग्रॅम जीए पूर्णतः विरघळतो. त्यामुळे यापेक्षा जास्त ॲसिटोन वापरणे गरजेचे नाही. जीए या संजिवकाचे फवारणीसाठी द्रावण तयार करताना प्रथम मूळ द्रावण (स्टॉक सोल्युशन) करता येते. सर्वप्रथम १ ग्रॅम जीए ॲसिटोन सॉल्व्हन्टमध्ये विरघळून घ्यावे व त्याचे एकत्रित पाण्यात एक लिटर द्रावण तयार करावे. अशा पद्धतीने तयार झालेले द्रावण १००० (हजार) पीपीएम तीव्रतेचे होईल. त्यातून पाहिजे त्या पीपीएमचे द्रावण फवारणीसाठी तयार करता येते.
-----------------
तक्ता.२. घडाचे आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचे घ्यावयाचे प्रमाण
अ. क्र. --- अवस्था --- जीए व इतर रसायने --- कार्य
१ --- घडाचा पोपटी रंग --- १० पीपीएम जीए + युरीया फॉस्फेट --- घडाचे आकारमान वाढविणे
२ --- वरील अवस्थेनंतर ३ ते ४ दिवसांनी --- जीए १५ (पीपीएम) (फवारणीद्वारे) + सायट्रिक ॲसिड पीएच (५.५-६.०) --- घडाचे आकारमान वाढविणे
३ --- वरील अवस्थेनंतर ३ ते ४ दिवसांनी --- जीए (२० पीपीएम) + सायट्रिक ॲसिड पी एच (५.५-६.०) --- घडाचे आकारमान वाढविणे.
--------------------
जीएचा वापर करताना घ्यावयाची दक्षता
१. फुलोऱ्यानंतर जीएचा वापर विरळणी करता करू नये, अन्यथा शॉट बेरीज प्रमाण वाढते. पाण्याचा ताण जास्त असल्यास फवारणी टाळावी.
२. ढगाळ वातावरणामध्ये जीएची फवारणी करू नये. हवा कोरडी असताना फवारणी करावी.
३. प्रति दीड फुटावर एकच घड असावा. त्यासाठी काड्यांची विरळणी करावी. एकाच आकाराच्या काड्या वेलीवर ठेवाव्यात.
४. कॅनॉपी प्रमाणापेक्षा जास्त असल्यास आणि घड सतत सावलीत असल्यास फवारणी टाळावी.
५. रोग व किडींचा बंदोबस्त केल्यानंतरच जीएची फवारणी करावी.
६. जीए सोबत झिंक सल्फेटचा वापर करू नये.
७. जीएचा अवशेष दोन दिवसापेक्षा जास्त काळ टिकत नाही, असे संशोधनात दिसून आले.

३) मण्यांचा आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर
मण्यातील पेशी जोमाने वाढत असलेल्या अवस्थेत जीए व सी.पी.पी.यू. या संजीवकाचा वापर करणे गरजेचे असते. पेशींचा आकार वाढण्याच्या प्रक्रियेतूनच मण्यांचा आकार, रंग व गर नियंत्रित होत असतो. थोडक्यात, मण्यातील पेशींची संख्या वाढवून मण्याच्या आकारमानात वाढ घडवून आणतात.
सध्या प्रचलित असणाऱ्या द्राक्ष जातीसाठी (शरद सीडलेस व त्याचे क्लोन, थॉमसन सीडलेस व त्याचे क्लोन) या जातीसाठी मणी गोलाकार करता येतात.

तक्ता.३. मण्यांचा आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर
अ. क्र. --- अवस्था --- संजीवकांचे मिश्रण --- कार्य
१ --- २-३ मि.मी. मणी आकार --- जीए (४० पीपीएम) + सीपीपीयू (२ पीपीएम) पीएच (६.५-५.५) --- गोलाकार मणी व मण्यांची फुगवण होण्यासाठी.
२ --- २-३ मि.मी. मणी आकार --- जीए (४० पीपीएम) + सी.पी.पी.यू. (१ पीपीएम) पीएच ( ६.-५.५) --- मण्यांची फुगवण होण्यासाठी.
३ --- ६-८ मि.मी. मणी आकार --- जीए (४० पीपीएम) + सीपीपीयू (१-२ पीपीएम) पीएच (६-५.५) ---
मण्यांचे आकारमान वाढवण्यासाठी.

दक्षता :
- वेलींच्या क्षमतेनुसार घडांची संख्या व मणी ठेवावेत. त्यामुळे प्रत्येक मण्यांचे योग्य पोषण होईल.
- पीएच कमी करण्यासाठी फॉस्फोरिक ॲसिडचा वापर करावा.
- अनेक संजीवके एकत्र करून मिसळून वापरू नयेत.

संजीवकांचे कार्य
- फुटी एकसारख्या फुटून निघण्यासाठी.
- पाकळ्यांची वाढ, घडांची लांबी वाढविण्यासाठी.
- मणी आकारमान वाढविणे.
- काढणीपश्चात द्राक्षांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी.
- वेलींची वाढ थांबविण्यासाठी.
- सुप्तावस्थेतील घडनिर्मिती होण्यासाठी.

-----------------
फोटो ः द्राक्ष बागेत संजीवकांचा वापर करताना घ्यावयाची दक्षता
PNE26W61101 घडाचा पोपटी रंग आणि फुलोरा अवस्था.

PNE26W61102 - २-३ मि.मी आकार मणी आणि ६-८ मि.मी मणी आकार.

PNE26W61103 डॉ. स. द. रामटेके
PNE26W61104 आप्पासो गवळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT