द्राक्ष सल्ला, डॉ. एस. डी. सावंत, २० ऑगस्ट २०२६
तांबेरा, करपा रोग नियंत्रणाकडे लक्ष हवे
--------------------
हवामान अंदाज
मागील आठवड्यामध्ये श्रावण महिन्याची सुरुवात झाली. अचानक ढगाळ वातावरण, नंतर रिमझिम पाऊस आणि पुन्हा कडक ऊन असे वातावरण बहुतांश द्राक्ष विभागामध्ये दिसून आले. ‘‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’’ ही बालकवींची कविता बहुतेकांना आठवल्याशिवाय राहिली नसेल. मोठा पाऊस कुठेच झाला नाही. अल्पशा पावसामुळे आता पाणी द्यावे का नाही, या संभ्रमात बरेच शेतकरी राहिले. मात्र काही ठिकाणी पाऊस इतका कमी झाला होता, की बागेत पाणी न दिल्यामुळे बागांमध्ये पाण्याचा ताण दिसून आला.
येत्या आठवड्यातही वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात किमान दोन वेळा बंगालच्या उपसागरात डिप्रेशन किंवा चक्रीवादळाच्या प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. त्या प्रणाली मोठा पाऊस घेऊन ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाकडे वाटचाल करणार आहेत. परंतु सध्याच्या अंदाजाप्रमाणे या प्रणाली गुजरात, राजस्थानकडे न जाता उत्तरेकडे वळतील अथवा कमजोर होऊन विरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागांमध्ये अगदी रिमझिम पाऊस होण्याचीही शक्यता कमी आहे. या आठवड्यात कोकण किनारपट्टी व घाट माथ्यावर रिमझिम पावसाची शक्यता दिसत असली तरी तिकडून येणारा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष विभागात येण्याची शक्यताही कमीच दिसत आहे. मात्र शनिवार- रविवार (ता.२२ -२३) नंतर २५ तारखेपर्यंत मध्य प्रदेशातून विदर्भ आणि मराठवाड्याकडे येणारा पाऊस लातूर, बार्शी, धाराशिव, सोलापूर आणि पंढरपूर या भागांत हलक्या सरी देईल. हे पावसाचे प्रमाण बागेला सिंचन करण्याची आवश्यकता कमी करेल. याच दिवसांत जालना आणि सांगली भागांतही अधूनमधून रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे.
निनो ३.४ भागातील तापमान पुन्हा वाढत आहे आणि ‘एल निनो’ स्ट्राँग होत चालला आहे. इकडे आयओडी पुन्हा कमजोर होत चालला आहे. त्यामुळे आता एल निनोचा आपल्या मॉन्सूनवरील प्रभाव वाढेल आणि अंदाजापेक्षा पाऊस कमी होईल अशी शंका उत्पन्न झाली आहे. द्राक्ष विभागातील नद्यांना चांगले पाणी आले आहे. त्या भागातील बहुतांश धरणेसुद्धा बऱ्यापैकी भरलेली आहेत. तरिही या पुढे फार कमी पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन द्राक्ष बागायतदारांनी पाणी जपूनच वापरण्याचा प्रयत्न करावा.
तांबेरा नियंत्रण करा योग्यरीतीने
रिमझिम पावसात बागेतील सापेक्ष आर्द्रता निश्चितच वाढते. त्या प्रमाणात पानावरील रोगही वाढतात. शेतकऱ्यांच्या बरोबरच्या चर्चेत वाळवा भागात तांबेरा वाढत असल्याचे, तर दक्षिण सोलापूर भागात जिवाणूजन्य करपा रोग वाढत असल्याचे समजते. वाळवा भागात शरद सीडलेस आणि त्याचे क्लोन्सच्या बागा सर्वत्र आहेत. तांबेरा रोग याच जातींवर येतो. वाळवा भागात नेहमीच सापेक्ष आर्द्रता जास्त आणि तापमान कमी आहे. अलीकडच्या रिमझिम पावसामुळे यात भर पडली आहे. हे वातावरण तांबेरा रोगाला पोषक आहे. तांबेरा वाढला तर मोठ्या प्रमाणात पानगळ होते. म्हणून या रोगाच्या त्वरित नियंत्रण आवश्यक आहे. तांबेराची बुरशीसुद्धा केवडा रोगाच्या बुरशीप्रमाणे पानावर फक्त जिवंत पेशींवर वाढते. म्हणूनच तांबेऱ्याची बुरशी पानावरील पेशींना लगेच मरू देत नाही. आपण रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करताच पानावरील तांबेरा रोगाची बुरशी मरते. त्या सोबतच रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या पानांच्या पेशीसुद्धा मारतात. पाने करपू लागतात. अशी करपलेली पाने काही दिवसांतच गळून पडतात. सध्याच्या परिस्थितीत वेलीवर पाने टिकवणे हे आपले ध्येय आहे. म्हणूनच रोग नियंत्रण विचारपूर्वक झाले पाहिजे. तांबेरा रोग ताम्रयुक्त बुरशीनाशकांनी चांगल्या प्रकारे नियंत्रित होतो. तांबेरा सर्वसाधारणपणे मागील काही दिवसांत वाढलेल्या व अजूनही पोपटी रंग असलेल्या पानांवर जास्त लवकर वाढतो. कदाचित या पूर्वी दिलेल्या फवारणीतील बुरशीनाशके या पानांवर पोहोचलेली नसतात. या पानांवर ताम्रयुक्त बुरशीनाशक, विशेष करून बोर्डो मिश्रण वापरल्यास पाने लगेच करपतात व गळून पडतात. यात तांबेरा मेल्यामुळे करपलेल्या पेशी असतातच, आणि त्याच बरोबर ताम्रच्या विषबाधेमुळे मेलेल्या पेशींचीही भर पडते. रिमझिम पावसाच्या वेळेत पानाच्या पृष्ठभागावरील ताम्र पोपटी रंगाची पाने जास्त वेगाने शोषून घेतात म्हणून त्यावर ताम्रची विषबाधा जास्त व लवकर होते. अशावेळी रोग नियंत्रण तर होतेच, पण पानगळही होते. म्हणूनच अशा परिस्थितीत ताम्रयुक्त बुरशीनाशके वापरणे धोक्याचे आहे. क्लोरोथॅलोनील हे बाह्यस्पर्शी बुरशीनाशक तांबेऱ्याचे चांगले नियंत्रण करते. बागेमध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास या बुरशीनाशकाच्या फवारणीने बऱ्यापैकी रोगनियंत्रण मिळेल. बागेतील रोग वाढणार नाही आणि पानगळ होण्याची शक्यता कमी होईल. बागेत तांबेरा कुठेच दिसत नसेल तर प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून टेब्युकोनॅझोल या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी फायदेशीर होऊ शकते. तांबेरा रोगाच्या नियंत्रणाबरोबर सध्याच्या परिस्थितीत पाऊस थांबला की भुरी वाढण्याची शक्यता आहे. त्याचे नियंत्रण व या पुढे शेंडा वाढू नये म्हणूनही या बुरशीनाशकाचा उपयोग होऊ शकतो.
बोर्डो मिश्रणाचा सामू ठरवा अनुभवाअंती
दक्षिण सोलापूर भागात पावसामुळे आर्द्रता जरी वाढली असली तरी तापमान निश्चितच जास्त आहे. रंगीत द्राक्षांच्या बागा या भागात फारशा नाहीत. आणि अपवादात्मक रंगीत द्राक्षाखालील बाग असलीच तरीही जास्त तापमानामुळे तांबेराचा धोका या भागात नसेल. या भागात दोन्ही प्रकारचे करपा (बुरशीजन्य व जिवाणूजन्य) हळूहळू वाढत आहेत. या आठवड्यात रविवार (ता. २३) नंतर सोलापूर, पंढरपूर, लातूर, बार्शी, धाराशिव या सर्वच भागामध्ये ३ -४ दिवस पावसाची शक्यता आहे. या सर्व भागांत पुन्हा करपा वेगाने वाढण्याची शक्यता आहे. या भागात जास्त सामू असलेले बोर्डो मिश्रण फवारले जाते. सर्वसाधारणपणे या विभागातील अनुभवी शेतकऱ्यांच्या निरीक्षणानुसार उदासीन किंवा आम्लधर्मीय बोर्डो मिश्रणामुळे जिवाणूजन्य करपाचे नियंत्रण होते. पण त्याचबरोबर पावसाच्या दिवसात पाने जास्त करपतात. या उलट जास्त सामू असलेले बोर्डो मिश्रण वापरलेल्या बागांमध्ये जिवाणूजन्य करपा बऱ्यापैकी नियंत्रित राहून पावसात पाने करपत नसल्याचे दिसून येते. या निरीक्षणानुसार येत्या रविवारआधी (ता.२३) ८ ते ९ सामू असलेले बोर्डो मिश्रण सर्व जास्त तापमान असलेल्या भागात फवारल्यास फायदा होईल असे वाटते. सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीतील बागेत जिवाणूजन्य करपा जास्त दिसतो. अशा बागेत या फवारणीचा फायदा होईल. येत्या आठवड्यातील संभाव्य पावसात केवडा, बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य करपा या तिन्ही रोगांचा कमी जास्त प्रमाणात धोका वाढेल. धोक्याचे प्रमाण किती पाऊस पडेल आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान किती राहील यावर अवलंबून राहील. या तिन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी उपयोगी पडेल.
पानांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअमची आवश्यकता
हिरवीगार व मजबूत पाने असलेल्या बागेत जिवाणूजन्य करपा जास्त वाढत नाही. प्रत्यक्षात बागेत फिरून या दृष्टिकोनातून पाहणी करावी. अनुभवी शेतकऱ्यांनी आपले अनुभवही माझ्याकडे मांडायला हरकत नाही. पाने मजबूत होण्यासाठी कॅल्शिअम आणि सिलिकॉन महत्त्वाचे असते. पूर्वीच्या काळात शेणखत घालत असताना त्यामध्ये भरपूर सिंगल सुपर फॉस्फेट मिसळले जायचे. त्यामुळे वेलींना पुरेसे कॅल्शिअम मिळायचे. आता विद्राव्य खतांच्या वाढत्या वापराच्या काळात सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) वापरले जातेच असे नाही. जर ते वापरले गेले नसल्यास कॅल्शिअम फवारणीद्वारे देणे आवश्यक वाटते. सॅलिसिलिक ॲसिडची फवारणी सुद्धा पाने मजबूत करतील. जिवाणूजन्य करपा रोगासाठी एकच असा रामबाण उपाय नाही म्हणूनच झाडाच्या आंतरिक प्रतिकारशक्ती वाढीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
------------
हिरवळीचे खत
मागील आठवड्यात हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा लावण्याच्या कल्पनेला दुजोरा दिला होता. पुढे सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस होणार नाही, असाच अंदाज पुढे येत असल्यामुळे या संबंधी अधिक माहिती घेऊ. ताग व धैंचाला चांगल्या वाढीसाठी पाणी किंवा पाऊस लागतो. विशेषतः ताग पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. यावर पाण्याचा ताण पडल्यास त्यावर रस शोषक किडी वाढतात. म्हणूनच त्यावर पाण्याचा ताण पडू देऊ नका. हिरवळीचे खत म्हणून ज्वारी, बाजरी किंवा मका लावणे शक्य आहे का? यावर माझे मित्र प्रताप चिपळूणकर यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. त्यांनी कमी पाण्यात बाजरी लावता येईल असे सांगतानाच द्विदल वनस्पतीपेक्षा एकदल बाजरी केव्हाही चांगली असल्याचा जोरदार पुरस्कार केला. त्यांच्या मते, एकदल वनस्पतींमध्ये नायट्रोजन कमी असतो व त्यांचे कर्ब नत्र गुणोत्तर (C:N रेशो) जास्त असल्यामुळे ती मातीमध्ये गाडल्यास जास्त काळ टिकणारे सेंद्रिय कार्बन मिळते. त्यामुळे हिरवळीच्या खतांचा खरा फायदा मिळू शकतो.
----------------
हिरवळीचे खत म्हणून बागेत लावलेले धैंचा पीक.
हिरवळीचे खत ताग या पिकाला थोडे अधिक पाणी लागते. ते कमी पडल्यास त्यावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.