द्राक्ष बागांना पावसाचा फटका
फवारण्यांबरोबर उत्पादन खर्चातही वाढ
नारायणगाव, जि.पुणे : जुन्नर तालुक्यात पडलेल्या पावसाने सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसला आहे. फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये घडकूज होण्याचा व द्राक्ष वेलींवर तुडतुडे, रस शोषक किडी, डावणी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढीचा धोका निर्माण झाला आहे.
जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (ता.३०) रात्रीच्या सुमारास सरासरी ८.४ मिलिमीटर पाऊस झाला. मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसणार आहे. कीड व रोग प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी दुपारनंतर फवारणीची कामे सुरु केली.
जुन्नर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरी ५६. ३ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यावर्षी सरासरी ८.९ (१५ टक्के ) मिलिमीटर पाऊस झाला आहे. यापैकी शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी तालुक्यात सरासरी ८.४ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वात जास्त १६ मिलिमिटर पाऊस पिंपळगाव जोगे धरण परिसरात झाला आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे यांनी दिली.
--- चौकट ---
सुमारे तीन हजार एकर क्षेत्र
जुन्नर तालुक्यात द्राक्ष पिकाखाली सुमारे तीन हजार एकर क्षेत्र आहे. २५ सप्टेंबर २०२६ पासून फळ छाटणीची कामे सुरू झाली. ऑक्टोबर अखेर फळ छाटणीची कामे पूर्ण झाली आहेत. छाटणीच्या वेळापत्रकानुसार द्राक्ष बागा फूट, पोंगा, घड निर्मिती, फुलोरा अशा विविध अवस्थेत आहेत. ज्या द्राक्ष बागांची छाटणी २५ सप्टेंबर दरम्यान झाली त्या द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत असून १५ ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या बागा पोंगा अवस्थेत आहेत.
------------
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे घडकूज होणार असून द्राक्ष वेलींवर विविध कीड व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शनिवारीही (ता. ३१) ढगाळ वातावरण होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील दोन-तीन दिवस सलग फवारणी करावी लागणार आहे. यामुळे एकरी दहा ते पंधरा हजार रुपयांचा फवारणीचा खर्च वाढला असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक हरिभाऊ वायकर, अवधूत बारवे यांनी दिली.
मागील वर्षी घड निर्मिती अभावी बहुतेक द्राक्ष बागांचा हंगाम वाया गेला होता. यावर्षी द्राक्ष बागांमध्ये समाधानकारक घड निर्मिती झाली आहे. मात्र यावेळी पाऊस, ढगाळ वातावरण व वातावरणातील आद्रता द्राक्ष पिकाला मारक ठरत आहे.
-------
नारायणगाव (ता. जुन्नर ): द्राक्ष उत्पादक हरिभाऊ वायकर यांच्या बागेत शनिवारी दुपारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कीड व रोग प्रतिबंधक फवारणी करताना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.