पुणे

ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन

CD

पान ८ - १६ साठी
----------------------------------------------
आम्ही स्वयंसेवी
-------------------------------------------------
पर्यावरण संतुलन साधणारे
ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन
----------------------------
पर्यावरण संतुलनाचे भान असलेल्या लातूर शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन ‘ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन’ची महूर्तमेढ रोवली. या माध्यमातून रुक्ष शहराचे रुपडे हरित लातूर करण्याचा विडा उचलला. वृक्ष लागवड आणि संगोपनात एक दिवसही खंड पडू दिला नाही. प्रदूषण, स्वच्छता, पर्यावरण संतुलनासाठी निःस्वार्थ भावनेतून आचारसंहिता ठरवून काम केले. या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल साडेतीन लाख वृक्षांचे संगोपन झाले आहे, याचे चांगले परिणाम शहरात दिसून लागले आहेत.
---------------------------------
विकास गाढवे
-----------------------------------
राष्ट्रीय वननीतीनुसार भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असावे लागते. या प्रमाणात राज्यात लातूर जिल्ह्याचा क्रमांक नेहमीच शेवटी राहिला आहे. पाच लाख लोकसंख्येच्या या शहराला २०१६ मध्ये रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. लातूरला लागलेला हा कलंक पुसून काढण्यासाठी ‘ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन’ने सात वर्षांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. झाडाची लागवड करून त्याचे संगोपन करणे हे जिकिरीचे आणि कंटाळवाणे काम वाटते. सामूहिक पातळीवरील प्रयत्नांना तर अनेक अडचणी येतात. प्रत्यक्ष कामापेक्षा संघर्षच वाट्याला येतात. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून फाऊंडेशनच्या सदस्यांनी सात वर्षांपासून पर्यावरण संतुलनाचा यज्ञ अखंड सुरू ठेवला आहे. २०१६ मध्ये आमदार अमित देशमुख यांनी लातूर वृक्ष चळवळ सुरु केली. ती पुढे नेत असतानाच ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन तयार झाले. काही तरी साध्य करून दाखवण्याच्या उमेदीने काही नागरिकांनी एकत्र येऊन काम सुरू केले, तो दिवस होता १ जून २०१९. या दिवसापासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. शहरातील ग्रीन बेल्ट व मोजक्या जागी वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाचे काम सुरू झाले. अनेक अडचणी व संघर्ष वाट्याला आले. मात्र त्याला महत्त्व न देता सदस्यांनी काम सुरूच ठेवले.
उठा उठा पहाट झाली... झाडे लावण्याची... झाडांना पाणी देण्याची वेळ झाली...या व्हॉट्‍सॲप ग्रुपवरील संदेशाने कामाची सुरुवात होते. व्हॉट्‍सॲपच्या माध्यमातूनच उपक्रमाचे संचलन केले जाते. एक दिवस आधी सायंकाळी सहा वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी करावयाच्या कामाचे ठिकाण व कामाचे स्वरूप निश्चित होते. यात वृक्ष लागवड, संगोपन, झाडांभोवती आळे करून पाणी देणे, स्वच्छता करणे आदी कामांचे नियोजन केले जाते. चिमण्यांसाठी घरटे, पेटवलेल्या कचऱ्याला विरोध करणे, जनजागृती, पोस्टर फ्री लातूरसाठी कामे केली जातात. फाउंडेशनचे १४० सक्रिय सदस्य आहेत. रोज पंधरा ते वीस जणांना कॉल केला जातो. ग्रुपवर नियोजन टाकल्यानंतर इच्छुक सदस्यांकडून सहभागासाठी प्रतिसाद दिला जातो. सव्वासहा वाजता कामाला सुरुवात होते. किमान तीन तास काम केले जाते.
जास्त संख्येने लोक एकत्र आले की काम बिघडते, असे म्हणतात. हे ओळखूनच फाउंडेशनच्या सदस्यांनी कामात व्यत्यय येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यासाठी एक आचारसंहिता निश्चित केली असून, ती ग्रुपवर प्रसिद्ध केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणचे सदस्य एकत्र आल्यानंतर केवळ आणि केवळ झाडाच्या आणि कामाच्या विषयावर चर्चा केली जाते. यामुळे कामावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टी ठरवून टाळल्या जातात.

उपक्रमासाठी सुखदुःखाचे निमित्त ः
उपक्रमासाठी दानशूर व्यक्तिंच्याकडून वाढदिवस व अन्य निमित्ताने मदत घेण्यात येते. त्यासाठी एक दिवस आधी किमान दहा व्यक्तींना मेसेज पाठवून वृक्ष लागवडीसाठी रोपे, झाडांना देण्यासाठी किमान पाच टँकर पाणी किंवा विशिष्ट रक्कम देण्याची विनंती केली जाते. त्यासाठी फाउंडेशनचा बँक खाते क्रमांक आणि क्यूआर कोड दिला जातो. एक किंवा कधी जास्त व्यक्ती पुढे येऊन मदत करतात. सुखदुःखाच्या प्रसंगातही वृक्ष लागवडीचे निमित्त साधले. यामुळे एक दिवसही कामासाठी पैसा कमी पडत नाही. यामुळे सध्या शहरातील मुख्य रस्ते, बाह्यवळण रस्ते, दुभाजक, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा कारागृह, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालय, चौक, पोलिस स्टेशन, कारागृह, धार्मिक स्थळे, स्मशानभूमी, कबरस्तान आदी ठिकाणी दिमाखाने झाडे उभी राहिली आहेत. भिंतींवरचे पोस्टर्स व जाहिराती शहराचे सौंदर्य बिघडवत होत्या. फाउंडेशनने पोस्टर फ्री लातूर उपक्रमातून भिंती स्वच्छ केल्या आणि त्यावर संदेश रंगवले. प्लॅस्टिकविरुद्धच्या लढाई कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन करून इको-ब्रिक्सचे बेंच तयार केले.

तापमान, पाणी पातळीमध्ये आमूलाग्र बदल ः
दररोज तापमानासाठी लातूर शहरामध्ये ‘येलो अलर्ट’ दिले जातात. मात्र एकही दिवस ३९.९ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले नाही. अपवादात्मक कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस झाले आहे. लातूर शहराचे २०१५ च्या आधीचे ग्रीन कव्हर ०.७८ टक्के होते. आता गुगलच्या माहितीनुसार १.२२ ते १.२५ च्या दरम्यान आले आहे. शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स २०१६ मध्ये ३९४ च्या पलीकडे होता. सध्या हा इंडेश ६५ ते ७० दरम्यान आहे. मे २०२४ मध्ये शुद्ध हवेच्या शहरात लातूरचा देशात दुसरा क्रमांक होता. शहरातील भूजल पातळी वाढली. पक्ष्यांचा किलबिलाटही वाढला आहे. शहराचा रुक्षपणा खूप कमी होत आहे.

झाड, स्वच्छता व प्रदूषण संवेदनशील ः
फाउंडेशनच्या सदस्यांकडून नागरिकांना कचरा जाळू दिला जात नाही. तो कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यासाठी नियमित महानगरपालिकेशी समन्वय साधला जातो. कचरा जाळलेल्या, झाड किंवा झाडाच्या फांद्या तोडलेल्या ठिकाणी जाऊन विरोध केला जातो. त्याचे फोटो काढून प्रसिद्ध दिली जाते. महापालिकेला माहिती देऊन झाडे तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडले जाते. रस्ता किंवा दुभाजकामध्ये टाकलेला कचरा काढून स्वच्छता केली जाते. चुकीच्या ठिकाणी कचरा टाकू नये, यासाठी प्रवृत्त केले जाते. फाउंडेशनचे सदस्य दिवसातून दहा ठिकाणचा पेटवलेला कचरा विझवतात. त्याचे फोटो काढून समाज माध्यमावर टाकले जातात. यामुळे कोणी झाड तोडत असेल किंवा कचरा जाळत असेल, त्याची माहिती तातडीने फाउंडेशनला मिळते.

आता प्रत्येक गल्लीत झाड लावणार
चहाच्या कागदाच्या कपालाही सदस्यांचा विरोध आहे. फाउंडेशनचे सदस्य अपवाद सोडला तर अशा कपात चहा पित नाहीत. पन्नास डझन काचेचे ग्लास चहावाल्यांना भेट दिले आहेत. कचरा कुंड्या देऊन त्यात कचरा टाकण्यास प्रवृत्त केले आहे. एक जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन पर्यावरण वर्षापासून शहरातील एकही गल्ली झाडांशिवाय असणार नाही, असे नियोजन केले आहे. प्रत्येक गल्लीत किमान दहा झाडांची लागवड करून त्याचे संगोपन केले जाणार आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जिरविण्यासाठी ते जमेल तिथे चर खोदण्याचे काम हाती घेतले आहे. या वर्षी हे काम व्यापक प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. क्षमतेप्रमाणे दोन ते तीन फूट खोलीचा चर खोदला जात आहे. कामामुळे रोज व्यायाम करण्याची गरज पडत नाही. शरीर निरोगी राहते व पर्यावरण संतुलनासाठी दिलेल्या योगदानाचे समाधान सदस्यांना मिळते.
--------
इन्फो ः
फाउंडेशनची ठळक कामे ः
- ३.५० लाख लहान, मोठी, मध्यम झाडांची लागवड.
- वृक्ष संगोपनात उन्हाळ्यात दररोज पाच टॅंकरद्वारे झाडांना पाणी देण्याचे नियोजन.
- दुर्मीळ ११० कॅक्टसचे गार्डन, वीस हजार फुलझाडांचा प्रकल्प, अमृत उद्यान, ग्रीन आयुर्वेदिक ऑक्सिजन पार्क.
- १८ ठिकाणी घनदाट वन प्रकल्प, ४८ ठिकठिकाणी बगीचे, १६० दुर्मीळ आयुर्वेदिक वनस्पतीचे ग्रीन हर्बल गार्डन.
- पाच वर्षांपासून झाडाचा गणपती. इको फ्रेंडली गणेशमूर्ती विसर्जन. गणपती विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव.
- दिवाळीत झाडांना आकाशकंदील. मैत्री दिनानिमित्त झाडांना मैत्रीचा धागा.
- दरवर्षी तीन लाख बीजगोळ्याची निर्मिती. वीस हजार तुळस बियांच्या पॅकेटचे वाटप.
- धार्मिक कार्यक्रमात प्रसाद स्वरूपात बियांचे वाटप. वाढदिवसानिमित्त प्रसाद स्वरूपात पालेभाज्या बियांचे वाटप.
- १६ ठिकाणी वृक्षाचे पुनर्रोपण. दुभाजकात सूर्यफूल लागवड.
- चिमण्यांसाठी तीनशे लाकडी घरांचे वाटप. शहरात ९०० कचरा पेट्यांचे मोफत वितरण.
----------
संपर्क ः
पवन लड्डा, ९३२६५११६८१
ॲड. वैशाली यादव-लोंढे, ८१०८१५९११०
डॉ. भास्कर बोरगावकर, ९४०४३७९३८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT