AKK26B06477 : कवयित्री गुंजन पाटील
प्रेम, स्त्री स्वातंत्र्यावर गुंजन पाटील यांचे भाष्य
अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट शहर, ता. २ : प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी प्रेम, प्रेमभंग, स्त्री स्वातंत्र्य, पुरुषी मानसिकता, महिलांचे स्वावलंबन यांसह विविध सामाजिक विषयांवरील कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कवितांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
प्रारंभी तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. गुंजन पाटील यांनी आपल्या खास शैलीत प्रेम, तरुणाई, वृद्धत्व, विवाहित-अविवाहित जीवन तसेच महिला-पुरुषांच्या भावविश्वावर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. स्त्रीचे सौंदर्य केवळ बाह्य रूपात नसून आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केल्यावर तिचे खरे सौंदर्य खुलते, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला.
‘ज्या नजरेने करतात घायाळ, त्या कधीच कुणाच्या नसतात; वरून फुलपाखरू दिसणाऱ्या, आतून मधमाशा असतात!’ या कवितेला रसिकांनी जोरदार दाद दिली. तसेच ‘तू इतका रोखून पाहू नकोस, मी वितळणार नाही; माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही’ आणि ‘प्रेमाचा सिल्याबस फारच अवघड, जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत अर्ज करीत राहणार’ या कवितांनीही उपस्थितांची मने जिंकली.
स्त्रियांचे स्वावलंबन, पुरुषी मानसिकता, स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीवर पाटील यांनी कवितांतून भाष्य केले. त्यांच्या सादरीकरणाने सभागृहात हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनिक वातावरण असे विविध रंग पाहायला मिळाले.
कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, अविनाश महागावकर, मल्लिनाथ स्वामी, राजशेखर हिप्परगी, प्रकाश घिवारे, निळकंठ कापसे, प्रशांत लोकापुरे, चंद्रकांत दसले, अशोक येणगुरे, निनाद शहा, शिवशरण जोजन, अतुल कोकाटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह चेतन जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.