विवाहबाह्य संबंधाच्या
संशयावरून पत्नीचा खून
गुवाहाटीत पतीला अटक; शीर फ्रीजमध्ये लपविले
गुवाहाटी, ता. ७ (पीटीआय): गुवाहाटीतील बेलटोला परिसरात एका महिलेची हत्या करून तिचे शिर फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. रिया तालुकदार असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती रामानुज गोस्वामी याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिची हत्या केल्याची कबुली गोस्वामीने पोलिसांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून रिया आणि रामानुज यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हाटीगाव पोलिस ठाण्याचे पथक त्यांच्या बेलटोला येथील सदनिकेत पोहोचले. घराचा दरवाजा उघडा होता. घरात रियाचा मृतदेह आढळला. तिचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. तपासादरम्यान तिचे शिर प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये लपविल्याचे आढळले. गोस्वामीने पोलिसांसमोर शरण येत गुन्ह्याची कबुली दिली. तीन सप्टेंबरला दोघांमध्ये वाद झाला. हा वाद दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू होता. त्यावेळी रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केल्याचे त्याने सांगितले. हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेले धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. रिया अलीकडे एका बुटीकमध्ये काम करीत होती, तर रामानुज हा कॅबचालक आहे. दोघांचा विवाह होऊन वर्षही पूर्ण झाले नव्हते. रामानुज हा धुबरी जिल्ह्यातील, तर रिया गुवाहाटीची रहिवासी होती. दोघे रामानुजच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीवर बांधलेल्या सदनिकेत राहत होते. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप रामानुजने केला असून, या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. या प्रकरणातील परिस्थिती आणि हत्येमागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.