AKK26B06425
अक्कलकोट : तालुक्यातील हैद्रा येथील ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा देवस्थान येथे उभारण्यात आलेला सौरऊर्जा प्रकल्प.
---
हैद्रा दर्ग्याला अन्नछत्र मंडळाकडून सौरऊर्जेची भेट
२० किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प; वीजबिलातून मिळणार मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट शहर, ता. १३ : सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हैद्रा येथील ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा देवस्थानाला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात देण्यात आला आहे. सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकीतून उचलला आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष रफिक मुजावर यांनी दिली.
हैद्रा देवस्थानला दरमहा सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल येत असल्याने व्यवस्थापनावर आर्थिक भार पडत होता. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वीजखर्चात मोठी बचत होणार असून, बचत झालेला निधी देवस्थानच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी वापरणे शक्य होणार आहे.
देवस्थानच्या वाढत्या वीजखर्चाची माहिती नागनहळ्ळी आश्रमशाळेचे सचिव जावेद पटेल यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना दिली होती. त्यानंतर हैद्रा दर्गा व्यवस्थापनाच्या विनंतीची दखल घेत भोसले यांनी सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली. कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या सहकार्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
---
सामाजिक सलोख्याचा संदेश
तालुक्यातील धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना सातत्याने मदत करणाऱ्या अन्नछत्र मंडळाच्या या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचा संदेश दिला जात आहे. हैद्रा देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, विविध समाजांतील भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. तालुक्यातील विविध महत्त्वाच्या उपक्रमांची सुरुवात या देवस्थानातून करण्याची परंपराही आहे. या प्रकल्पासाठी उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर व सचिव वकील मुजावर यांनी परिश्रम घेतले. अन्नछत्र मंडळाच्या या मदतीबद्दल हैद्रा देवस्थानच्या वतीने मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.