ॲप चालत नसल्याने
हेळगावात पीक पाहणी ठप्प
मसूर, ता. ४ : हेळगाव (ता. कऱ्हाड) येथे शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पीक पाहणीला हेळगाव परिसरात तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसला आहे. संबंधित पीक पाहणीचे ॲप चालत नसल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी अद्याप होऊ शकलेली नाही.
कऱ्हाड तालुक्यातील हेळगावमध्ये तिन्ही बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला अनेक शेतकऱ्यांची जिरायत शेती आहे. त्यामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, मका, चवळी, उडीद, मूग, घेवडा आदी पिके अनेक शेतकऱ्यांनी घेतली होती. ती पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. त्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे येथील पीक पाहणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे ॲप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पीक पाहणीसाठी शासनाकडून शासकीय पदाधिकारी तसेच संबंधित प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पीक पाहणी करण्यासाठी आवश्यक असलेले ॲपच व्यवस्थित सुरू होत नसल्याने नियुक्त प्रतिनिधींनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक पाहणी व नोंदणी करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. हेळगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पीक पाहणी करण्यासाठी संबंधित प्रतिनिधींशी संपर्क साधला असता ॲप सुरू होत नसल्यामुळे पाहणी करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने केवळ प्रतिनिधी नियुक्त न करता त्यांना आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
.........................................................
हेळगाव येथे पीक पाहणीचे काम सुरू असताना ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांची पीक पाहणी प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल.
- वीरकर, तलाठी, हेळगाव
...................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.