एडन, ता. ५ (पीटीआय) : इराणचे पाठबळ असलेल्या हौथी बंडखोरांनी येमेनमधील नैर्ऋत्य भागातील आणखी एका गावाचा ताबा घेत आपले वर्चस्व वाढविले आहे. लाल समुद्रावरील आपली पकड मजबूत केलेल्या हौथींनी आता ताइझ या महत्त्वाच्या शहराच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. हौथींच्या या कारवायांमुळे सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीला मात्र धक्का बसला आहे. येमेन सरकारने हौथींविरोधात मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा करत त्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत त्यांना मागे लोटण्याचा प्रयत्न केला.
हौथींनी रविवारी रात्री तुर्बा या गावावर पूर्ण ताबा मिळविला. एडन बंदर आणि प्रांतिक राजधानी ताइझ यांना जोडणाऱ्या महामार्गावर हे गाव आहे. येमेनची राजधानी सानावर बंडखोरांचे अंशत: वर्चस्व असल्याने मागील काही वर्षांपासून आंतरिम सरकारचा कारभार एडन येथूनच चालतो. तुर्बावर हौथींचे नियंत्रण प्रस्थापित झाल्याने एडन आणि ताइझ ही दोन्ही महत्त्वाची शहरे बंडखोरांच्या टप्प्यात आली असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच, सौदी अरेबिया आणि हौथी यांच्यातील संघर्ष वाढल्याने येमेनमधील अंतर्गत यादवीला चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा जोर आला आहे. हौथी बंडखोरांनी ताइझ शहराच्या आजूबाजूची अनेक गावे आधीच ताब्यात घेतली आहेत.
मागील महिन्यापासून हौथींनी वेगवान हालचाली करत लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील बराच मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यांनी या समुद्रातील अनेक बेटे आणि मोखा शहराचा ताबा घेतल्याने बाब अल मंदेब सामुद्रधुनीवर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. जागतिक तेल वाहतुकीपैकी १२ टक्के वाहतूक या सामुद्रधुनीतून होते. होर्मुझ बंद असल्याने बाब अल मंदेबवर अवलंबून असलेल्या सौदी अरेबियाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी हौथींवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हौथींच्या ताज्या हल्ल्यानंतरही त्यांनी येमेन सरकारला पाठबळ देत सैन्याला कारवाई करण्याची सूचना केली आहे.
हौथींवर क्षेपणास्त्रांचा मारा
हौथींच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने लाल समुद्राच्या किनारपट्टीवरील हौथींच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले. येमेन सरकारने पुढाकार घेत सुरू केलेल्या या कारवाईला शंभर लढाऊ विमाने पाठबळ देत असून किनारपट्टीवर एक हजारहून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा आघाडीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या हल्ल्यात हौथींचे मोठे नुकसान झाले असून बाब अल मंदेब सामुद्रधुनीची हवाई हद्द सुरक्षित केल्याचाही दावा करण्यात आला आहे. हौथींविरोधात जमिनीवरील कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.