हुमगाव- बावधन रस्त्याला
प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा
४० वर्षांची प्रतीक्षा संपली; ग्रामीण दळणवळणाला नवे बळ
भाऊसाहेब जंगम : सकाळ वृत्तसेवा
हुमगाव, ता. २४ : जावळी तालुक्यातील बहुप्रतीक्षित हुमगाव बावधन रस्त्याला अखेर दर्जोन्नती देऊन या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याने दोन्ही तालुक्यांतील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
१९८० च्या दशकात रोजगार हमी योजनेतून या रस्त्याला मंजुरी मिळून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती. दोन तालुके जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या रस्त्याकडे पाहिले जात होते. दोन्ही बाजूंनी त्याकाळी डोंगरापर्यंत या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, मध्ये असणारा डोंगर हा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने त्याला वन विभागाची तांत्रिक मान्यता मिळत नव्हती. वेळोवेळी शासनाकडे प्रयत्न करूनही यातून मार्ग काढण्यात अडचणी येत होत्या. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात या रस्त्यासंदर्भात पुन्हा प्रयत्न करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा-जावळीचे आमदार व बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राधान्याने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केल्याचे आज दिसून आले.
सदर रस्ता हा हुमगाव, वाघजाईवाडी, झगडेवस्ती, बावधन बगाड असा असून, त्याला दर्जोन्नती दिल्यानंतर त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त होणार आहे. पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या प्रस्तावानुसार तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार सदर मार्गाच्या दर्जोन्नतीचा विचार करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या मार्गावरील वाढती वाहतूक, परिसरातील गावांची संख्या, व लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार बांधकाम विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार या रस्त्याला प्रमुख मार्ग क्रमांक १८१ असा क्रमांक देण्यात आला आहे. त्याची लांबी १२.८०० किलोमीटर असून, त्याचा लाभ वाई व जावळी तालुक्याला होणार आहे. प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याची दुरुस्ती, मजबुतीकरण व विस्तार या कामांना गती मिळेल. या रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर असल्याची खात्री करून पुढील विकासकामे करण्यात येणार आहेत. हा रस्ता पूर्णत्वास गेल्यास दोन तालुक्यांतील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध होण्यासोबतच शेतीमाल वाहतूक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास, आरोग्य सुविधा तसेच पर्यटनाला चालना मिळणार आहे.
हुमगाव-बावधन या रस्त्यासंदर्भात बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेला पाठपुरावा निश्चितच स्वागतार्ह आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवून शिवेंद्रसिंहराजे जावळीतील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे.
- संदीप परामणे, अध्यक्ष, जावळी-भाजप
दृष्टिक्षेपात..
रस्ता हुमगाव, वाघजाईवाडी, झगडेवस्ती, बावधन बगाड असा असणार
- या रस्त्याला प्रमुख मार्ग क्रमांक १८१ असा असणार
- लांबी १२.८०० किलोमीटर
- वाई व जावळी तालुक्याला होणार फायदा
- शेतीमाल वाहतूक, विद्यार्थ्यांना प्रवास, आरोग्य सुविधा तसेच पर्यटनाला मिळणार चालना
चौकट
गेल्या वर्षीच दै. ‘सकाळ’ने या रस्त्यासंदर्भात मालिका प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. आज या रस्त्याला मान्यता मिळाल्याचे समजताच अनेकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.