पुणे

-डॉ. दीप्ती सिधये

CD

झुक झुक झुक झुक हरितगाडी...
-डॉ. दीप्ती सिधये

हायड्रोजन ट्रेन ही पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ही केवळ एका नवीन रेल्वेगाडीची सुरुवात नाही; हा भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या नव्या युगाचा पहिला मोठा टप्पा आहे.
....................................................

"झुक झुक झुक झुक आगीनगाडी...
धुरांच्या रेषा हवेत काढी..."
ग. दि. माडगूळकरांच्या ‘मामाच्या गावाला जाऊया’... कवितेच्या या ओळी म्हणजे जणू काही लहानपणी प्रत्येकाच्या मनात असलेली रेल्वेची प्रतिमाच ! या शब्दांमधून डोळ्यासमोर उभी राहते जुन्या प्रकारच्या इंजिनासवे रुळांवरून वेगाने धावणारी रेल्वे, कानावर पडणारी शिट्टी, इंजिनातून बाहेर पडणारा धूर आणि आकाशात विरत जाणाऱ्या धुराच्या रेषा. एकेकाळी औद्योगिक प्रगतीचे प्रतीक मानला जाणारा हा धूर हळूहळू हवामानबदल, प्रदूषण आणि आरोग्याविषयीच्या समस्यांची नांदी असल्याचे लक्षात येऊ लागले आणि विकासाचा वेग कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या पर्यायी इंधनांचा शोध सुरू झाला.
धुरांच्या रेषांनी आकाश रंगवण्याचा काळ मागे टाकून रेल्वेचे तंत्रज्ञान बदलू लागले. काळाची गरज आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील बदलाच्या आधारे रेल्वेच्या तंत्रज्ञानाचा प्रवास अविरत सुरूच आहे. वाफेच्या इंजिनापासून डिझेलपर्यंत आणि डिझेलपासून विद्युत रेल्वेपर्यंत भारतीय रेल्वेने काळानुसार स्वतःला बदलले आहेच. आज याच अनुषंगाने मैलाचा दगड ठरेल, अशा ऐतिहासिक बदलाच्या टप्प्यावर भारत देश उभा आहे.
या बदलाचे वैशिष्ट्य म्हणजे या बदलाचा आधारभूत केंद्रबिंदू ‘वाढता वेग’ हा नसून ‘पर्यावरण संवर्धन’ हा आहे.
भारतीय रेल्वे आता देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही रेल्वे धुराच्या रेघांविना, इंजिनाच्या कर्णकर्कश आवाजाविना स्वच्छ ऊर्जेच्या शक्तीवर, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या आधारावर शाश्वत विकासाच्या दिशेने वेगाने धावणे अपेक्षित आहे.

नव्या तंत्रज्ञानाची गरज
भारत जगातील सर्वात मोठ्या रेल्वेजाळ्यांपैकी एक असलेल्या देशांत गणला जातो. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. लाखो टनाची मालवाहतूक होते. अशा परिस्थितीत रेल्वेच्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचा परिणाम केवळ वाहतुकीवर होत नाही, तर अर्थव्यवस्था, पर्यावरण, ऊर्जा, सुरक्षा आणि देशाच्या विकासाच्या दिशेवरही होतो. त्यामुळे भारताच्या पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’कडे केवळ तांत्रिक करामत म्हणून पाहणे अपुरे ठरेल. गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना आजच्या घडीला जग करत आहे. काही दशकांपूर्वी हवामानबदल हा केवळ वैज्ञानिकांच्या चर्चेचा विषय होता; आज तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे.
या संकटात वाहतूक क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून रोज मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म धूलिकण वातावरणात मिसळतात. यामुळे केवळ पृथ्वीचे तापमान वाढत नाही, तर आरोग्याचे प्रश्न वाढतात. म्हणूनच जगभरात वाहतुकीची नवी व्याख्या तयार होत आहे. रस्त्यांवर विद्युतवाहने वाढत आहेत, जैवइंधनावर चालणाऱ्या बस विकसित होत आहेत, सौरऊर्जेचा वापर वाढत आहे आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या कार, बस, जहाजे तसेच रेल्वे विकसित करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहेत.
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही या जागतिक परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. ही केवळ अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची कामगिरी नाही, तर आर्थिक विकास आणि पर्यावरणसंवर्धन यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे. हे पाऊल ''हरित वाहतूक'' आणि ''शाश्वत वाहतूक'' या संकल्पनांच्या अंतर्गत येते.
''हरित आणि शाश्वत वाहतूक'':
''हरित वाहतूक'' ही अशी व्यवस्था आहे जी पर्यावरणावर होणारा परिणाम शक्य तितका कमी करते, ऊर्जाकार्यक्षम असते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते.''शाश्वत वाहतूक'' ही संकल्पना त्याही पुढे जाते. ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी, सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूकव्यवस्था निर्माण करण्यावर भर देते. आजच्या गरजा पूर्ण करताना उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यावर गदा येऊ नये, हा तिचा मूलभूत विचार आहे.
''हरित आणि शाश्वत वाहतूकीसाठी हायड्रोजनसारखे स्वच्छ इंधन रेल्वेक्षेत्रासाठी गेम-चेंजर ठरू शकते.

स्वच्छ भविष्याचा नवा साथीदार
हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या अंतर्गत हायड्रोजनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हायड्रोजन हे विश्वाच्या अफाट पसाऱ्यात सर्वात आधी जन्माला आलेले आणि विश्वात सर्वाधिक मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. हायड्रोजनच्या प्रत्येक अणूमध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. हे ‘आवर्त सारणी’तील पहिले मूलद्रव्य असल्याने त्याचा अणुक्रमांक एक असून ते वजनाने सर्वात हलके मूलद्रव्य आहे. तारे, सूर्य आणि विश्वातील अनेक पदार्थांच्या निर्मितीत हायड्रोजनची महत्त्वाची भूमिका आहे. पृथ्वीवर तो स्वतंत्र स्वरूपात कमी आढळतो; मात्र पाणी (H₂O), सेंद्रिय संयुगे आणि अनेक खनिजांमध्ये तो आढळतो. हायड्रोजन वायू म्हणजे हायड्रोजनचे नैसर्गिक वायुरूपातील स्वरूप. निसर्गात हायड्रोजनचे अणू स्वतंत्र स्वरूपात स्थिर राहत नाहीत. दोन हायड्रोजन अणू एकत्र येऊन एक रेणू तयार करतात.
H + H → H₂ म्हणजेच हायड्रोजन वायू हा दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला रेणू आहे. याचे रासायनिक सूत्र H₂ असे आहे. हायड्रोजन वायू रंगहीन, गंधहीन, अत्यंत हलका आणि ज्वलनशील असतो. मुख्य म्हणजे तो ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
भारताच्या हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये:
बाराशे किलोवॅट क्षमतेच्या हायड्रोजन फ्युएल-सेल प्रोपल्शन (प्रणोदन) प्रणालीने सुसज्ज असलेली ही दहा डब्यांची ट्रेन हरियानातील जिंद–सोनीपत मार्गावर धावणार आहे. तिचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर असेल.
"प्रणोदन म्हणजे चालना देणारी शक्ती किंवा पुढे नेणारी यंत्रणा." हायड्रोजन ट्रेनच्या संदर्भात "हायड्रोजन फ्युएल-सेल प्रणोदन प्रणाली" म्हणजे ‘हायड्रोजनच्या मदतीने वीज तयार करून ट्रेनला पुढे जाण्यासाठी चालना देणारी यंत्रणा.’
हायड्रोजन फ्युएल-सेलमध्ये हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार होते. ही वीज रेल्वेच्या मोटरना चालना देते. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड तयार होत नाही; केवळ पाण्याची वाफ निर्माण होते. त्यामुळे हायड्रोजन हे जवळपास शून्य प्रदूषण करणारे इंधन मानले जाते. रेल्वेमार्गालगतच्या गावांमध्ये हवेची गुणवत्ता व त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय हायड्रोजन ट्रेन डिझेल इंजिनांच्या तुलनेत कमी आवाज निर्माण करते. त्यामुळे ध्वनिप्रदूषणही कमी होऊ शकते.

आहे मनोहर तरी...
कोणतेही नवीन तंत्रज्ञान पूर्णपणे आव्हानमुक्त नसते. ‘हायड्रोजन ट्रेन’चे पर्यावरणीय फायदे मोठे असले तरी तिच्या वापरासोबत काही तांत्रिक, आर्थिक, सुरक्षिततेशी संबंधित आव्हाने आहेत. उदाहरणार्थ, हायड्रोजन हा ज्वलनशील वायू असल्याने त्याचे निर्मिती, साठवणूक, वितरण तसेच वापर करताना सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. आपण पेट्रोलसारखी ज्वलनशील इंधनेही सुरक्षित पद्धतीने वापरतो. योग्य तंत्रज्ञान आणि सुरक्षा नियम वापरल्यास त्याचप्रमाणे हायड्रोजनचाही सुरक्षित वापर शक्य आहे.

आज आपल्याला अशा वाहतूक व्यवस्थेची गरज आहे जी योग्य तंत्रज्ञान, दूरदृष्टी आणि नवकल्पनांच्या मदतीने प्रगतीबरोबरच पृथ्वीचे आणि पृथ्वीवासीयांचे हित या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करेल. यादृष्टीने हायड्रोजन ट्रेन ही पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ही केवळ एका नवीन रेल्वेगाडीची सुरुवात नाही; हा भारताच्या हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या नव्या युगाचा पहिला मोठा टप्पा आहे.

(लेखिका विज्ञानाच्या अध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून राहुल गांधी दूर का? काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेत धक्कादायक दावा! पदोन्नती नाकारण्यासाठी लाखोंची डील? कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला! आणखी एका वारकरी महिलेचा मृत्यू, आकडा पोहोचला 4 वर

Kolhapur : वंशाच्या दिव्याचा हट्ट अन् विवाहितेचा अंत! कणकेतून गूळ खाल्ल्याने मुलगा होत नाही, हे सांगण्याची आली वेळ; गर्भवती महिलांमध्ये दिसणारं 'सायकॉसीस' काय आहे?

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

SCROLL FOR NEXT