माण नदीपात्रात अवैध
वाळू उपशावर कारवाई
दोन वाहनांसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ९ : वाढेगाव (ता. सांगोला) येथील फुले फार्म हाउसजवळ माण नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असताना सांगोला पोलिसांनी गुरुवारी (ता. ८) सकाळी कारवाई केली. यावेळी वाळूने भरलेले आणि वाळू भरण्यासाठी उभे असलेली दोन डंपिंग वाहने आढळून आली. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह १२ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अक्षय आप्पासो भोसले (वय २६, रा. मिरज रोड, सांगोला) याला ताब्यात घेतले असून, दुसरा चालक पसार झाला.
पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी गुरुवारी वाढेगाव बीट हद्दीत अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदाराकडून फुले फार्म हाउसजवळ माण नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सकाळी सुमारे ६.२० वाजता घटनास्थळी धाव घेतली. तेथे दोन डंपिंग वाहने उभी असल्याचे दिसले. एका वाहनात अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली होती, तर दुसऱ्या वाहनात वाळू भरण्याचे काम सुरू होते. पोलिसांना पाहताच एका वाहनाचा चालक पसार झाला; तर दुसऱ्या वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव अक्षय आप्पासो भोसले असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत सुमारे ६ लाख ७ हजार रुपये किमतीचे वाळूसह एक डंपिंग वाहन आणि ६ लाख रुपये किमतीचे दुसरे डंपिंग वाहन, असा एकूण १२ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही वाहनांना नोंदणी क्रमांक नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. शासनाची रॉयल्टी न भरता आणि आवश्यक परवानगी न घेता वाळू उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी अक्षय भोसले आणि एका अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी धीरजकुमार दिलीप लवटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.