उरुळी कांचन, ता. ५ : निलंबनाचा आदेश धुडकावून बेकायदेशीरपणे बियाणे विकणारे उरुळी कांचन येथील ‘साई शेती भांडार’ आणि मुदत संपलेला परवाना वापरून अनधिकृत ठिकाणी विक्री करणारे शिंदवणे येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दोन दुकानदारांविरोधात उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उरुळी कांचन येथील ‘साई शेती भांडार’ या दुकानाची १६ जुलै २०२६ रोजी तपासणी केली होती. त्यावेळी साठा नोंदवही न ठेवणे, परवान्यात उत्पादक कंपनीचा समावेश नसणे आणि इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.
याप्रकरणी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी २२ जुलै रोजी सुनावणी घेऊन ‘साई शेती भांडारा’चा बियाणे विक्री परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला होता, असे असतानाही दुकान सुरूच होते. दरम्यान, रविवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजता भरारी पथकाचे धनंजय पाटील, कृषी अधिकारी अशोक वेताळ आणि मोहीम अधिकारी विनय कदम यांनी दुकानाची पाहणी केली. त्यावेळी दुकान सुरू असल्याचे आणि २८ जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत पालक, मका, काकडी व शेपूच्या बियाणांची बेकायदेशीर विक्री केल्याचे बिल पुस्तकावरून उघडकीस आले.
शासकीय आदेशाचा भंग करून विनापरवाना बियाणे विक्री केल्याप्रकरणी दुकानाचे मालक बाळासाहेब उल्हास साळुंखे (वय ४५, रा.गुळवंची, ता. जत, जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
पुणे जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी विनय दिलीपराव कदम (वय ४६, रा.पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिंदवणे (ता. हवेली) येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दुकानाची रविवारी (ता. २) दुपारी १२ वाजता भरारी पथकाने तपासणी केली. यावेळी दुकान चालक पोपट तुकाराम महाडीक (वय ५०, रा. शिंदवणे, ता.हवेली) यांच्या बियाणे व खते विक्री परवान्याची मुदत २३ नोव्हेंबर २०२५ रोजीच संपल्याचे निष्पन्न झाले. तरीही कोणतीही नूतनीकरण प्रक्रिया न करता ते विनापरवाना खते व बियाण्यांची विक्री करत होते तसेच कीटकनाशक विक्रीचा परवाना उरुळी कांचन-जेजुरी रोड (कॅनाल शेजारी) या जागेचा असताना, त्यांनी परस्पर ‘वळती फाटा’ (मिळकत नं.२८६ ब) या अनधिकृत ठिकाणी साठवणूक व विक्री सुरू ठेवली होती. याप्रकरणी विविध कलमान्वये दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.