PNE26W40904
श्रीरामपूर ः डी. पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी व्हॉलिबॉल प्रशिक्षक गौरव डेंगळे, फादर फ्रांको, सिस्टर ब्लेसा, रवी लोंढे आदी.
शिक्षणासोबत क्रीडेलाही समान महत्त्व द्या
गौरव डेंगळे : डी. पॉल स्कूलमध्ये शालेय उपक्रम
श्रीरामपूर, ता. ८ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेलाही समान महत्त्व देणे आवश्यक आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, संघभावना, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. या गुणांचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही सकारात्मक परिणाम होतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल प्रशिक्षक गौरव अरविंद डेंगळे यांनी केले.
येथील डी. पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डेंगळे म्हणाले, पालकांना आपल्या पाल्याने अभ्यासात चांगली कामगिरी करून परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही महत्त्व दिले पाहिजे.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईल, ऑनलाइन गेम्स आणि सोशल मीडियावर एक ते दोन तास घालवतात. त्याऐवजी हा वेळ नियमित खेळासाठी दिल्यास विद्यार्थ्यांना चांगले खेळाडू होण्याची संधी मिळू शकते. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचे प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
शाळेत अभ्यासासोबतच क्रीडा, कला, सांस्कृतिक व शालेय उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन व सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेले कौशल्य ओळखून त्याला योग्य व्यासपीठ देणे ही शाळा, शिक्षक आणि पालकांची संयुक्त जबाबदारी आहे, असेही डेंगळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तसेच नव्याने नियुक्त क्रीडा प्रशिक्षकांचा गौरव डेंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास फादर फ्रांको, प्रिन्सिपल सिस्टर ब्लेसा, कार्यालयीन अधीक्षक रवी लोंढे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.