अभिनेता इम्रान खानची बिनशर्त माफी
उच्च न्यायालयाने फटकारले; परकी नागरिकाला निदर्शनाचा अधिकार नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुख्य निवडणूक आयुक्तांविराेधात झालेल्या निदर्शनात सहभागी झालेला अभिनेता इम्रान खान याला साेमवारी न्यायालयाने फटकारले. परकी नागरिक असलेल्या व्यक्तीला अशा निदर्शनांत सहभागी हाेता येत नाही. निदर्शने करण्याचा मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करून माफीनामा सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार इम्रान याने बिनशर्त माफी मागतानाच पुन्हा अशी चूक हाेणार नाही, अशी हमी न्यायालयात दिली.
परकी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून परकीय क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) बजावलेल्या नोटिशीला इम्रानने आव्हान दिले होते. त्या याचिकेवर सोमवारी मुख्य न्या. महेशचंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ओसीआय कार्डधारकाला भारतात निदर्शने करण्याचा अधिकार नाही. एखाद्या भारतीयाने अन्य देशात असे कृत्य केले असते तर ते सहन केले असते का? अमेरिकेने तर त्या व्यक्तीला लगेच विमानाने भारतात पाठवले असते. भारताची उदारता पाहा. अमेरिकन नागरिकत्व असूनही थेट हद्दपार करण्याऐवजी त्याला देश सोडून जाण्याची नोटीस बजावली, अशी टिपणी न्यायालयाने केली. इम्रानला माफीनामा सादर करण्याचे तसेच अशी चूक पुन्हा करणार नाही अशी हमी देण्याचे आदेश दिले. त्यावर इम्रानच्या वतीने वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी त्वरित एक हमीपत्र सादर केले. पुढील सुनावणी सात डिसेंबरला हाेणार आहे.
...तर भारतीय नागरिकत्व घ्यावे!
इम्रानने हमीपत्र सादर करताच निदर्शनांत सहभागी होण्याची इतकीच इच्छा असेल, तर त्याने भारतीय नागरिकत्व घेण्याचा विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने दिला. तसेच इम्रान माफी मागायला तयार असून, बालपण भारतातच गेले आहे. आपणही थोडी उदारता आणि मोठेपणा दाखवायला हवा. आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेचे पालन करायला हवे, असे नमूद करून न्यायालयाने बिनशर्त माफी सादर करण्याचे आदेश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.