आळेफाटा, ता. २८ ः जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व आळेफाटा परिसरातील राजुरी, आळे, वडगाव आनंद, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, संतवाडी, कोळवाडी आणि आगरमळा या गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरी बुद्रुक येथे मंगळवारी (ता. २७) रात्री कामावरून घरी परतणारे रखमा रामभाऊ शिंदे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. याच गावातील गावठाण परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी जयश्री पवार या सतरा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले होते. तसेच, वडगाव आनंद येथील पांढरमळा परिसरात शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळली होती. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या परिसरात ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऊस शेतीत लपून बसलेले बिबटे बाहेर पडून मानवी वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
नागरिकांनी पहाटे आणि रात्री एकट्याने फिरणे तसेच व्यायामासाठी बाहेर पडणे टाळावे. शेतात काम करताना आणि खाली वाकताना विशेष काळजी घ्यावी. पायी चालताना सोबत काठी ठेवावी. लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांना एकटे बाहेर पाठवू नये. अंगणवाडीतील मुलांना पालकांनी स्वतः सोडावे आणि घराबाहेरील परिसरात पुरेसा प्रकाश राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
‘‘भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी आणि बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.’’
-स्नेहल शेळके, माजी सदस्या, पुणे जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.