कवठे येमाई, ता. ६ : शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्यांचा वावर आता रात्रीपुरता मर्यादित राहिलेला नसून, भरदिवसा शेतात काम करणाऱ्या नागरिकांसमोरच बिबटे येऊ लागल्याने परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जांबुत परिसरात तीन ते चार बिबटे एकत्र फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मंगळवारी (ता. ६) पिंपरखेड येथील आंबेवाडी परिसरात भरदुपारी बिबट्या मुक्तसंचार करताना दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
पिंपरखेडच्या आंबेवाडी परिसरात दिवसाढवळ्या बिबटे फिरत असलेले ठिकाण हे नोव्हेंबर २०२५ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी रोहन बोंबे यांचा मृत्यू झालेल्या घटनास्थळापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. बिबट्याचा वाढता वावर पाहता वनविभागाने केवळ पिंजरे लावण्यापुरती उपाययोजना न करता तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरखेड, जांबुत व परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यांत जवळपास नऊ नागरिकांना जीव गमवावा लागल्याने या भागातील नागरिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पिंपरखेड परिसर अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. रोहन बोंबे, तसेच शिवण्या बोंबे या चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरात विशेष मोहीम राबवत ५०हून अधिक बिबटे जेरबंद केले होते. मात्र, आता जांबुत, पिंपरखेडसह लगतच्या परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बिबट्या आढळल्यानंतर वनविभागाकडून पिंजरे लावून त्यामध्ये कोंबडीसारखे भक्ष्य ठेवले जाते. मात्र, बिबटे पिंजऱ्याला हुलकावणी देत आजूबाजूने निघून जात असल्याने पारंपरिक पद्धतीने पिंजऱ्यांची उपाययोजना कितपत प्रभावी ठरत आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. अनुचित घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच वनविभागाने वाईल्ड लाइफ टीमच्या माध्यमातून अत्याधुनिक उपाययोजना राबवून बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
अतिसंवेदनशील भागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेत आहोत. शेतकरी, शेतमजूर व शालेय विद्यार्थ्यांनी एकट्याने फिरू नये. विशेषतः नागरिकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. बिबट्यांच्या हालचाली निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी.
- प्रशांत खाडे,
उपवनसंरक्षक, जुन्नर
पिंपरखेड (ता. शिरूर) : आंबेवाडी परिसरात भरदुपारी फिरत असलेला बिबट्या.
जांबुत (ता. शिरूर) : रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात असलेले बिबटे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.