कळस, ता. ८ : यंदा इंदापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तालुक्याची ओळख मुख्यत्वे ‘रब्बीचा तालुका’ म्हणून असली, तरी यंदा पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
विंधन विहिरींची पातळी खालावली
दरवर्षी ऑगस्टअखेर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यात दमदार पाऊस पडतो. असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र, यंदा याच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पाऊस गायब झाला असताना दुसरीकडे दिवसभर उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. यामुळे तालुक्यातील ओढे, नाले आणि तलाव कोरडे ठाण पडले आहेत. कडक उन्हामुळे विहिरी आणि विंधन विहिरींची (बोअरवेल) पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाची पेरणी केली होती. मात्र, आता ही पिके जगवण्यासाठी पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. विहिरी आणि तलाव कोरडे पडल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
अशी आहे स्थिती
- पेरणी केलेली बाजरी, तूर आदी पिके जळून जाण्याच्या मार्गावर
- खडकवासला कालव्याच्या लाभार्थ्यांना पाण्याच्या उपलब्धतेची शाश्वती नाही
- यंदा शेतकरी उसाची लागवड करण्यास धजावत नाहीत
चाऱ्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर
पावसाने दिलेली हुलकावणी आणि वाढत्या उन्हामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही आगामी काळात गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
लोकप्रतिनिधी आणि शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन इंदापूर तालुक्यात त्वरित उपाययोजना कराव्यात आणि दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- विजय गावडे, अध्यक्ष, बळिराजा प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.