पळसदेव, ता. २१ : इंदापूर तालुक्यात सर्व शिक्षा अभियानाच्या मोफत गणवेश योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गणवेश पुरवून चार महिने उलटले तरी व्यापाऱ्यांची देयके थकली आहेत, तर दुसरीकडे निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थी दुसऱ्या गणवेशाच्या आणि बुटांच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाच्या पोकळ दाव्यांची पोलखोल झाली आहे.
शाळा सुरू होताना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याच्या घोषणा हवेतच विरल्या असून, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मोफत गणवेश योजनेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांकडून गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित केले. मात्र, या घटनेला चार महिने उलटूनही गणवेश पुरवठादारांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी प्रशासनाकडे आणि मुख्याध्यापकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
गणवेशासाठी स्वतःच्या पदरचे पैसे गुंतवलेले व्यापारी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. बिलाची रक्कम कधी मिळणार, यावर कुणाकडेही ठोस उत्तर नसल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. व्यापारी पैशांसाठी मुख्याध्यापकांकडे तगादा लावत आहेत, पण निधीअभावी मुख्याध्यापक हतबल झाले आहेत. प्रशासकीय दिरंगाईचा फटका मात्र व्यापारी, विद्यार्थी आणि पालक या सर्वांनाच बसत आहे. शासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विद्यार्थी प्रतीक्षेत, पालक संतप्त
निम्मे शैक्षणिक वर्ष संपून दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना अद्याप स्काऊट-गाईडचा दुसरा गणवेश आणि बूट मिळालेले नाहीत. एकाच गणवेशावर शाळेत यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे, तर दुसरा गणवेश कधी मिळणार या पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षक आणि मुख्याध्यापकांची दमछाक होत आहे.
श्रेय कोणाचे? अपयशाचे धनी कोण?
शाळा सुरू होताना गणवेश व पुस्तके वाटपाचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य असल्याचे चित्र आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून योजनेच्या यशाचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे का? व्यापारी पैशांसाठी फिरत आहेत आणि विद्यार्थी सुविधांपासून वंचित असताना या अपयशाची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सध्या गणवेशाच्या बिलापोटी अदा करण्यात येणारी रक्कम स्पर्श प्रणालीद्वारे वितरित होणार आहे. मात्र, यामध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने इंदापूरसह काही तालुक्यांतील बिले जमा होण्यास विलंब झाला आहे. यावर सध्या काम सुरू असून, वरिष्ठ पातळीवर तांत्रिक समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
- पांडुरंग कोळेकर, गट शिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.