बारामती, ता. १६ : बारामतीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. येथील उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर म.ए.सो.च्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते. तसेच, बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी संचालक दीपक वीरा, कॅप्टन शिवाजीराव तावरे आदी उपस्थित होते. खंडू गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
नागरिकांची शिस्त व कर्तव्ये विषयावर कार्यक्रम
बाळासाहेब देवळे फाउंडेशन संचलित इरा इंटरनॅशनल स्कूल, बारामती येथे किशोर देवळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी नागरिक शिस्त व नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर कार्यक्रम झाले. डॉ. संजय पुरंदरे व मंगेश खंडागळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या संचालिका पूजा देवळे, नेहा देवळे आदी उपस्थित होत्या.
वीरमाता व पत्नींचा सत्कार
स्क्रिबल कराओके स्टुडिओतर्फे जयहिंद फाउंडेशनच्या बारामती शाखेतर्फे वीरमाता व वीरपत्नींच्या सन्मानार्थ ‘भारत हम को जान से प्यारा है…’ या देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम झाला. परिसरातील १५ वीरमाता व वीरपत्नींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक माधव जोशी यांचा ‘संगीत उपासक’ गौरव करण्यात आला.
माजी नौसैनिक राजेश बडवे व राष्ट्रीय छात्रसेना फर्स्ट ऑफिसर तुषार टांकसाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. निवेदन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. प्रांजली खटके, नाझनीन पठाण, प्रज्ञा पंड्या आदींनी देशभक्तिपर गीते सादर केली.
विद्यार्थ्यांचा सन्मान
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यालयाचे प्राचार्य जी. आर. तावरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाची मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देशाप्रति असलेल्या जबाबदारीविषयी मनोगते व्यक्त केली. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.
माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजवंदन
म.ए.सो.च्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी सैनिक नंदकुमार पिसाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तिपर नृत्य व गीतांचे सादरीकरण केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजय पुरोहित, डॉ. गोविंद कुलकर्णी, मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.