सीमेवरील शांतता गरजेची
जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेत मोदींनी मांडली भूमिका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १२ : भारत आणि चीनच्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीसाठी सीमेवरील शांतता व स्थैर्य नितांत गरजेचे आहे. सीमेशी संबंधित सर्व मुद्द्यांवर यापूर्वी झालेले करार आणि सहमतीचे दोन्ही देशांनी पालन करायला हवे, अशी भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठकीमध्ये मांडली. तर, मतभेदांचे रूपांतर वादात होता कामा नये, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त करताना सीमाप्रश्नावर उभयमान्य तोडगा काढण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले असून, मोदींबरोबर त्यांची स्वतंत्र द्विपक्षीय बैठक झाली. अलिकडेच शांघाय सहकार्य संघटनेच्या व्यासपिठावर मोदी आणि जिनपिंग यांच्याची भेट झाली होती. मात्र, दोन्ही देशांमध्ये गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचा सात वर्षानंतरचा हा पहिला भारत दौरा होता. त्यामुळे भारत मंडपममध्ये मोदी यांनी जिनपिंग यांचेतामिळनाडूच्या रामनाथस्वामी मंदिरातील दगडी खांबांचे चित्र असलेल्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर केलेले स्वागत उल्लेखनीय होते. द्विपक्षीय बैठकीत मोदी यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाला चीनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही मानले.
मोदी आणि जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक तब्बल ५० मिनिटे चालली. या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले तसेच दोन्ही देशांनी आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहावे. मतभेदांचे रूपांतर वादात होता कामा नये, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.दोन्ही देशांच्या संबंधांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जावे आणि दोन्ही देशांच्या जनतेच्या दीर्घकालीन हितांचा विचार करून हा तोडगा काढला जावा, यावरही उभय नेत्यांनी सहमती व्यक्त केली. दरम्यान, भारत आणि चीनदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यावसायिक संबंध आणि अधिक सुलभ प्रवास व संपर्क वाढविण्याची आवश्यकता मोदी-जिनपिंग बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
जिनपिंग यांचे सहकार्याचे आवाहन
द्विपक्षीय चर्चेत बोलताना शी म्हणाले, ‘‘भारत आणि चीनने मोठी ‘जागतिक भूमिका’ बजावावी, अशी त्यांची इच्छा आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सामर्थ्यातून शिकावे आणि सामायिक विकास साधावा. उभय बाजूंनी दर्जेदार विकासासाठी आणि अधिक ‘ब्रिक्स’ सहकार्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना चीनने भारत-चीन संबंधांच्या विकासाकडे नेहमीच सामरिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले आहे. दोन्ही देश परस्परांना पाठिंबा देऊ शकतात आणि समान विकास साधू शकतात.’’ पंतप्रधान मोदींसोबत २१ वेळा भेट झाल्याची, तसेच मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील त्यांच्या मूळ गावी आमंत्रित केल्याची आठवणही जिनपिंग यांनी बोलून दाखविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.